श्री सुनील देशपांडे
विविधा
☆ कृष्णावस्था – भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆
श्रीकृष्णाचं चरित्र हे लहानपणापासूनच मला अत्यंत अद्भुत आणि मोहक वाटत आलं आहे. श्रीकृष्णाच्या चरित्राचा सगळ्यांनाच मोह पडतो, तो त्यातील अद्भुततेमुळेच. अलीकडच्या काळात ज्याला आपण ‘फँटसी’ (Fantasy) म्हणतो, ती फँटसी श्रीकृष्णाच्या चरित्रात पुरेपूर भरलेली आहे. त्यातलं खरं काय आणि कल्पित काय हे समजणं अवघड असलं, तरी आपण श्रीकृष्ण या व्यक्तिमत्त्वाकडे महर्षी व्यासांच्या ‘महाभारत’ या महाकाव्यातील अत्यंत प्रभावी पात्र किंवा व्यासांच्या प्रतिभेने रंगवलेलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून पाहू शकतो.
खरं म्हणजे राम आणि कृष्ण ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे लहानपणापासूनच आपल्याला (विशेषतः हिंदू धर्मियांना) अत्यंत जवळची वाटत आली आहेत. घरातील ज्येष्ठ व्यक्तींपासून ते मित्रमैत्रिणींपर्यंत, वेगवेगळ्या लोकांकडून आपण राम-कृष्णाच्या चरित्राचे इतके पैलू ऐकलेले असतात की नकळत त्यांच्याशी आपल्या मनाचं एक घट्ट नातं जुळतं. हे नातं इतकं जिव्हाळ्याचं असतं की ही माणसं आपल्यापेक्षा वेगळी आहेत असं वाटतच नाही. म्हणूनच राम आणि कृष्ण यांचा उल्लेख आपण औपचारिक आदरार्थी न करता सहसा एकेरी, आपुलकीने करतो. ती दोन्ही व्यक्तिमत्त्वे आपल्या वैयक्तिक जीवनाशी अत्यंत जवळून निगडित झालेली असतात.
श्रीकृष्णाच्या चरित्रातील चमत्कारांचा किंवा फँटसीचा भाग बाजूला ठेवला, तरी एक माणूस म्हणून, एक अलौकिक नेतृत्व म्हणून आणि व्यासांनी रेखाटलेलं महान चरित्र म्हणून जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा मनात नितांत कुतूहल आणि आदर निर्माण होतो. हे चरित्र माणसावर सर्वांगाने संस्कार करणारं आहे, अशी माझी ठाम भावना आहे. मी याबाबतीत श्रीकृष्णाचा ‘देव’ म्हणून कधीही विचार केला नाही. किंबहुना सावरकरांप्रमाणेच विज्ञानवादी आणि नास्तिक दृष्टिकोन असल्यामुळे, देवभावनेतून एखाद्या व्यक्तीकडे पाहणं मला जमत नाही. तरीही एक आदरणीय, प्रगल्भ आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व म्हणून मला कृष्णाच्या चरित्राने नेहमीच भुरळ घातली आहे. या चरित्राचा सखोल अभ्यास करावा, जास्तीत जास्त वाचन करावे असे मला सातत्याने वाटत आले आहे. त्यातूनच, ‘प्रत्येक मानवाच्या आयुष्यातील उत्तमावस्था म्हणजे कृष्णावस्था’ अशी माझी धारणा झाली.
कृष्णाच्या चरित्राचं परिशीलन केलं, तर ही ‘कृष्णावस्था’ नेमकी काय आहे ते स्पष्ट होतं. जन्मतःच कृष्णाचा त्याच्या जन्मदात्या आई-वडिलांशी संपर्क तुटला आणि त्याचे बालपण दत्तक माता-पित्यांकडे गेले. आपल्याकडे देवाबद्दल पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक संकल्पनांना छेद देतच श्रीकृष्णचरित्राची सुरुवात होते. श्रीकृष्ण जन्मतःच गडद काळ्या वर्णाचा होता. हा वर्ण केवळ सावळा किंवा काळसर नव्हता; तर अंधारात उभा राहिला तरी ओळखू येऊ नये इतका तो कृष्णवर्णीय होता. चित्रकार किंवा चरित्रकार त्याला काळ्याऐवजी निळ्या रंगात रंगवतात, हा एक विरोधाभास आहे. जन्मतःच काळा असल्यामुळे गोकुळात त्याला ‘कृष्ण’ म्हणून संबोधले गेले आणि पुढे तेच नाव रूढ झाले. महाभारतातील वर्णनानुसार, कृष्ण काही उंचपुरा नव्हता; तो काळ्या वर्णाचा आणि उंचीनेही कमी होता. त्यामुळे गोकुळात त्याची थट्टा उडवली जाई. उंची कमी असल्यामुळे शिंकाळ्यावर ठेवलेले दूध-दही चोरून खाण्यासाठी त्याला स्वतःच्या उंचीचा काही उपयोग होत नसे. म्हणून सहकाऱ्यांच्या खांद्यावर चढून, मानवी मनोरे रचून शिंकाळी उतरवण्याचा खोडकर मार्ग त्याने शोधून काढला असावा; ज्यातून पुढे दहीहंडीची परंपरा निर्माण झाली. यासाठी त्याने यशोदेचा पुष्कळ मार खाल्ल्याची वर्णनेही आढळतात.
श्रीकृष्णाचे बालपण अगदी सुखात गेले असे म्हणता येत नाही. एक तर तो जन्मदात्या आई-वडिलांपासून दूर होता; तरीही नंद आणि यशोदेने त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे अत्यंत प्रेमाने वाढवले हे खरे. तरीही खोडकरपणातून अनेक संकटे उभी राहिली. त्या प्रसंगांमधून त्याचे शौर्य आणि धैर्य प्रकट झाले. त्या काळात नक्की काय घडले हा भाग वेगळा, परंतु संकटांना न डगमगता सामोरे जाण्याची वृत्ती मात्र त्यातून स्पष्टपणे दिसून येते.
श्रीकृष्णाचे गोकुळातील वास्तव्य केवळ वयाच्या आठव्या वर्षापर्यंतच होते. नवव्या वर्षी त्याचे स्थलांतर वृंदावनात झाले. याचाच अर्थ रासक्रीडा, गोप-गोपी आणि राधा यांच्याशी संबंधित सर्व कथा आणि दंतकथा या त्याच्या वयाच्या केवळ आठ-दहा वर्षांपर्यंतच्या काळातील आहेत, हे ऐतिहासिक व तार्किक दृष्टीने लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. वृंदावनातील मुक्कामही वयाच्या दहा-अकराव्या वर्षापर्यंतच मर्यादित होता. वयाच्या अकराव्या वर्षी श्रीकृष्णाने मथुरेला जाऊन जुलमी कंसाचा वध केला आणि आई-वडील देवकी-वसुदेवांची तुरुंगातून सुटका केली. त्याचे मूळ राज्य त्याला परत मिळाले, पण त्यानंतर त्याचे आयुष्य संघर्षाच्या नव्या आव्हानांमध्ये अडकले.
बालपणी पूतनेचा वध आणि दहाव्या वर्षाच्या आत घडलेले कालियामर्दनाचे प्रसंग हे त्याच्या अद्भुत धैर्याची साक्ष देतात. विशेष म्हणजे, कृष्णाने कालियाचा वध केला नाही; तर त्याला नमवले, त्याचे विष निष्प्रभ केले आणि त्याचे हृदयपरिवर्तन केले. “जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो” हे संत ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान श्रीकृष्णाने प्रत्यक्ष कृतीतून त्या काळात राबवले होते, असे म्हणायला हरकत नाही.
अकराव्या वर्षी राज्य सुरक्षित झाले तरी त्यानंतर संपूर्ण आयुष्यात श्रीकृष्ण पुन्हा कधीही वृंदावनात परत गेला नाही. मथुरेत स्थिरावल्यानंतर त्याला जरासंध आणि कालयवन या दोन आक्रमक राजांच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. जरासंधाचा पराभव झाला तरी त्याचा समूळ नायनाट झाला नव्हता आणि कालयवनाच्या उपद्रवामुळे प्रजा अत्यंत त्रस्त झाली होती. प्रजेला युद्धाच्या आणि विनाशाच्या आगीत होरपळू न देण्यासाठी श्रीकृष्णाने मथुरेवरून थेट द्वारकेला स्थलांतर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आपली राजधानी एक-दीड हजार किलोमीटर लांब, समुद्रकिनारी असलेल्या नव्या भूमीवर स्थापन करणे, तेथे राज्याची घडी बसवणे आणि सुशासनाची व्यवस्था निर्माण करणे हे प्रचंड दूरदृष्टीचे काम होते.
द्वारकेची धुरा ज्येष्ठ बंधू बलरामांवर सोपवून, वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत औपचारिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या श्रीकृष्णाने शिक्षणासाठी उज्जैनच्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमात प्रवेश केला. तल्लख बुद्धी आणि प्रचंड सामर्थ्य असलेला राजा असूनही प्रत्यक्ष गुरूकडे जाऊन शिक्षण घेण्याची त्याला गरज काय होती? त्या काळात महालात येऊन शिकवणारे अनेक गुरू मिळाले असते; कौरव-पांडवांसाठी महालातच आचार्यांची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, सर्वसामान्य मुले जिथे शिकतात तिथेच मीही सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षण घेईन, हा क्रांतिकारक निर्णय श्रीकृष्णाने घेतला. आश्रमात तो कधीही राजाच्या थाटात वावरला नाही. विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरांतील विद्यार्थ्यांशी त्याने सख्य जोडले आणि सर्वांमध्ये एकरूप होऊन राहिला. आजच्या युगातही वरिष्ठ अधिकारी अथवा लोकप्रतिनिधींची मुले सामान्य शाळांमध्ये जात नाहीत; अशा काळात एका राजाने सामान्य आश्रमात जाऊन, सर्वांशी समभावाने राहून शिक्षण घेणे ही किती क्रांतिकारक गोष्ट होती! सांदीपनी ऋषींच्या आश्रमात त्याने दोन-तीन वर्षे अभ्यास केला आणि आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर शिक्षण पूर्ण केले. हा आदर्श आजही डोळे उघडवणारा आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यावर पांडवांच्या पहिल्या वनवासाची माहिती त्याला मिळाली. हेरांच्या माध्यमातून गुप्त माहिती मिळवून, दुर्योधनाने रचलेले पांडवांच्या हत्येचे अनेक कट श्रीकृष्णाने आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाने हाणून पाडले. पांडवांचा रक्षक, मार्गदर्शक आणि सोबती म्हणून त्याने आयुष्याची पुढील अनेक वर्षे खर्ची घातली.
– क्रमशः भाग पहिला
© श्री सुनील देशपांडे
पुणे, मो – 9657709640 ईमेल : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





