श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ९२ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- प्रकाशन समारंभाची सांगता झाली पण त्या आठवणी मात्र इतकी वर्ष उलटून गेल्यानंतर मनात आजही तितक्याच ताज्या आहेत! कारण त्या कार्यक्रमाचं चोख नियोजन जसं, तसंच या समारंभाच्या निमित्ताने माझ्या उर्वरित आयुष्याला मिळालेलं एक अनोखं वळणसुद्धा! ते वळण म्हणजे त्या दिवशीच्या पहाटे मला पडलेल्या स्वप्नाचं ‘त्या’च्या कृपेने अकल्पितपणे सत्यात होणारं परिवर्तनच होतं!!)
आणि याला सुरूवात होणार होती मी सोमवारी बॅंकेत पोचल्यानंतर लगेचच!
सोमवारी मी बँकेत गेलो तेव्हा याच सर्क्युलरच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यसाठी वखरेसाहेबांनी मला आणि माझ्या असिस्टंटना तातडीने केबिनमधे बोलावून घेतलं. मी डायरीत सर्व महत्त्वाचे मुद्दे त्या रात्री व्यवस्थित लिहून ठेवले होतेच. त्यामुळे सुरूवातीलाच मी या योजनेचे सर्व नियम व अटीं यांची थोडक्यात माहिती सांगितली. या स्वेच्छानिवृत्ती योजनेला प्रतिसाद म्हणून स्वेच्छानिवृत्ती साठी आता स्टाफमेंबर्सकडून येणाऱ्या अर्जांची अक्षरश: रीघ लागणार होती. त्यामुळे मुदत संपेपर्यंतचा पुढचा संपूर्ण महिना आम्ही याच कामाच्या चक्रात फिरत रहाणार होतो!
या स्वेच्छानिवृत्ती योजनेतून मिळणारे आर्थिक लाभ आणि त्यामुळे उर्वरीत आयुष्यात मिळणारी निश्चिंतता यांचा विचार केला तर कुणालाही मोह पडावा अशीच ही योजना होती. कमीतकमी वीस वर्षे सर्व्हिस झालेलं कुणीही या योजनेचा लाभ घेऊ शकणार होतं. आर्थिक लाभ म्हणजे उर्वरीत सर्व्हिस मुदतीच्या ५०% मुदतीचा पगार अतिरिक्त लाभ म्हणून मिळणार होता!
असं असूनही ज्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत ते मात्र इच्छा असूनही या योजनेचा लाभ घेण्याचं धाडस करणं शक्य नव्हतं. तसंच ज्यांच्या विरूध्द कामामधील अनियमिततांमुळे अंतर्गत चौकशी सुरू आहे तेही या योजनेच्या लाभापासून वंचित रहाणार होते. अशा केवळ नाईलाजाने मागे रहाणाऱ्यांना अचानक निर्माण होणारं स्टाफ शाॅर्टेज, बॅंकांमधे लगेचंच सुरू होणाऱ्या काॅम्प्युटरायझेशनमुळे नवीन भरतीची फारशी शक्यता नसणे या सगळ्यामुळे बॅंकेतलं रूटीन मॅनेज करण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागणार होती! आणि अर्थातच माझी तेव्हा अजून नऊ वर्षे सर्व्हिस शिल्लक असल्याने मीही मागे रहाण्यातलाच एक असल्याने मलाही त्या तारेवरच्या कसरतीची मानसिक तयारी आत्तापासूनच करायला हवी होती,.. पण त्याचं आत्तापासून दडपण घेण्यात अर्थ नव्हता.
या सर्क्युलरबद्दलची आमची चर्चा पुढे तासभर सुरू होती आणि मग चहा येईपर्यंत आपल्या प्रत्यक्ष झोनल आॅफिसमधून कोण कोण स्वेच्छानिवृत्ती स्विकारू शकेल याविषयीचे अंदाज बांधणं सुरू झालं. कारण त्याचा थेट नकारात्मक परिणाम आमच्यापैकी मागे रहाणाऱ्या मोजक्या स्टाफलाच सहन करावा लागणार होता! याचं दडपण आमच्यापैकी इतर कुणाला त्याक्षणी फारसं जाणवलं नसलं तरी संपूर्ण झोनल आॅफिसचे सर्वेसर्वा म्हणून वखरे साहेबांना जाणवलं असणारच. कारण याच अनुषंगाने त्यांची आलेली प्रतिक्रिया प्रथमदर्शनी तरी मला बुचकळ्यात टाकणारीच होती.
“खरं सांगू कां? .. मला शक्य असतं ना, तर या योजनेनुसार पहिला अर्ज मी स्वत:च केला असता… ” ते वरवर हसत गंमतीने बोलावं तसं म्हणाले होते!
मीटिंग संपवून मी केबिनमधे आलो ते मनात तरंगत राहिलेले हे सगळे विचार सोबत घेऊनच. अर्थात मी त्यात फार वेळ गुंतून पडणं योग्य नव्हतं. समोरच्या कामांचा निपटारा अधिक महत्त्वाचा होता!
त्यादिवशी सगळी कामं आवरून मी ड्राॅवर लॉक केला आणि ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा मात्र दुर्लक्ष करून मी दूर सारलेले तेच सगळे विचार मनात पुन्हा डोकावू लागले. त्या विचारांचं दडपण नव्हतं, फारशी उत्सुकता नव्हती, चलबिचल नव्हती, तरीही ते विचार झटकून टाकावेत असंही वाटेना. ‘मला शक्य असतं तर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्यासाठी मीच पहिला अर्ज केला असता.. ‘ असं वखरे साहेब म्हणाले होते. पण आपल्याला ते त्यांच्याइतकं अशक्य कुठं आहे? आजवर मी आणि आरती दोघांनीही आमच्या संसाराची गरज म्हणून तिची नोकरी कधीच गृहीत धरलेली नव्हती. जेव्हा जेव्हा वेळ आली, तेव्हा आरती नोकरी सोडून त्या क्षणीच्या कर्तव्यभावनेने घरी राहिली होतीच. आता यावेळी तिची नोकरी आहे म्हणून स्वतः स्वेच्छानिवृत्ती घेणं मलाच योग्य वाटत नव्हतं. अर्थात या योजनेमुळे निर्माण झालेल्या असंख्य व्हेकन्सीज् पैकी थोड्या फार जागा तरी तातडीने भरण्याची निकड निर्माण होणार असल्यामुळे पुढचं प्रमोशन प्रोसेस तात्काळ सुरू व्हायची शक्यता होतीच. आणि अर्थातच प्रत्येक स्टेटमधे उच्चाधिकार पदांच्या जागा मोजक्याच असल्याने आऊट ऑफ स्टेट पोस्टिंग देखील अपरिहार्यच होतं! थोडक्यात आमच्यापैकी मागे रहाणाऱ्या जवळजवळ सर्वच अधिकाऱ्यांच्या आयुष्यांत या आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजनेमुळे प्रचंड उलथापालथ होणार होती!!
मनातले हे सगळे उलट सुलट विचार दूर सारून मी दारावरची बेल वाजवली. घरी आई होतीच आणि आरती आणि सलिलही प्रकाशन समारंभाला येताना दोन-तीन दिवसांची सवड घेऊनच आले होते. दार सलिलनेच उघडले. जेवायला बसण्यापूर्वीपर्यंत गप्पांचे सगळे विषय कालच्या प्रकाशन समारंभाबद्दलचेच होते आणि ते अपेक्षितही होतं. या तिघांसाठीही तो एक वेगळा आणि आनंददायी अनुभव होताच!
रात्रीची जेवणं आवरली. गप्पागोष्टी झाल्यावर आई झोपायला गेली. आरती/सलिलला आता लवकरच घडू शकणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींची अंधूक कां होईना कल्पना देणं मला आवश्यक वाटलं.
“तुम्हा दोघांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय.. ” मी म्हणालो. दोघांनीही प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं.
“कां? काळजी करण्यासारखं आहे कां कांही? ” आरतीनं विचारलं.
“आज नाही पण पुढं लवकरच थोडं फार काळजी करण्यासारखं घडू शकेल.. “
“तुम्ही क.. कशाबद्दल बोलताय? “
“बँकेत बरेच फेरबदल होऊ पहातायत. कोणत्याही क्षणी कांहीही घडू शकेल. माझ्यापुरतं बोलायचं तर आमचं प्रमोशन प्रोसेसही लवकरच सुरू होईल आणि त्यानंतरचं पोस्टिंग मात्र आऊट ऑफ स्टेटच असणार हे ठरलेलंच आहे. मला कुठेही जावं लागेल आणि त्यासाठी आपल्या तिघांचीही तयारी हवी. म्हणूनच आज बँकेत याविषयी बोलणं सुरू झाल्यापासून एकच विचार माझ्या मनात येतोय. त्याबद्दलच बोलायचंय. तशीच वेळ आली तर आरती, तू जॉब रिझाईन करून माझ्याबरोबर येशील? ” मी विचारलं. याआधी प्रत्येक वेळी मी कांहीं दिवस एकटा राहून निभावत आलो होतो पण यापुढे वय आणि जबाबदाऱ्या वाढत जातील तेव्हा मला ती ओढाताण नको होती. तिला सौम्य शब्दांत मी कल्पना दिली ती यासाठीच.
आरतीने चमकून माझ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा खरकन् उतरलेला होता न् नजरेत हातून कांहीतरी निसटून जात असल्याची भावना!
” तुम्हाला लगेच कुठं जावं लागणार नाहीये ना? तशीच वेळ आली, तर तेव्हा ठरवूया ना आपण. आत्ताच त्याची चर्चा कशाला? ” बोलतानाही तिचा आवाज भरून आला होता.
” कां? तुला कंटाळा नाही आला नोकरीचा? ” मी विचारलं.
“नाही. मला आवडतो हा जाॅब. पण तरीही वेळ येईल तेव्हा सोडेन ना मी. ” ती त्याच भिजल्या आवाजात म्हणाली.
“पण मला कंटाळा आलाय आता नोकरीचा. मी सोडू? ” मी दोघांचा अंदाज घेत गंमतीने विचारलं.
” होs.. कंटाळा आला असेल तर खरंच सोडा. ” आरतीचा चेहरा खुलला. ती अगदी मनापासून म्हणाली.
आता मात्र त्यांना अधांतरी ठेवणं मला योग्य वाटेना. मी त्यांना नवीन स्वेच्छा निवृत्ती योजनेची सविस्तर माहिती दिली. ते ऐकून तोवर कांही न बोलता लक्षपूर्वक सगळं ऐकत राहिलेला सलिल म्हणाला, “बाबा, तुम्ही ही चांगली संधी खरंच सोडू नका. तुमचं सगळं व्यवस्थित आर्थिक नियोजन आहे, त्यामुळे निवृत्त व्हायचं ठरवलंत तर पुढं तुमचे आत्तापर्यंत शक्य न झालेले सगळे छंद जोपासत रहायचं आणि अर्निंग साठी कांहीही करायचं नाही. तसं असेल तरच.. ” तो म्हणाला. ते ऐकलं आणि मी पूर्ण निश्चिंत झालो. आता जे कांही करायचं ते आरतीची नोकरी आणि पगार गृहीत न धरता जे शक्य असेल तेच करायचं. आणि तेही पूर्ण विचारांती..!
हे मी मनाशी ठरवलं आणि पुढं अल्पावधीतच जे कांही घडलं ते आपसूकच घडत जावं तसंच सगळं.. आणि मी कधी कल्पनाही केली नव्हती अशा अनपेक्षित वळणापर्यंत मी येऊन थबकलो! इथे वळायचं कीं आहे त्याच रस्त्याने पुढं चालत रहायचं? .. माझी क्षणकाळाची ही द्विधा मनोवस्था ओळखल्या सारखा ‘तो’ स्वत:शीच हसत उभाच असणार तिथंच कुठंतरी.. माझ्याजवळ. कारण पुढं जे जे घडत गेलं ते सगळं त्यानेच घडवल्यासारखं! प्रत्येकवेळी मला दिलासा देणारं आणि बरंच कांही एरवी मी कधी कल्पनाही केली नसती असं सगळं..!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





