सुश्री सुलू साबणे जोशी
इंद्रधनुष्य
☆ ‘मुन्नीची कथा…’ – लेखक : श्री दीपक कणगलेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
(नाव बदलले आहे.)
न्यायदेवतेच्या दरबारात न्यायाची चक्रे फार मंद गतीने फिरत असतात. भारतात तर ती कायम स्लो मोशनमधेच फिरतात. पोलीसखाते देखील त्यांच्यावरच्या भ्रष्टाचार, कोठडीतील मृत्यू आणि खोटे साक्षीदार अशा आरोपांमुळे मलीन झाले आहे. या अशा पार्श्वभूमीवर मुन्नीची ही कथा तुमच्या मनाला अस्वस्थ तर करेलच, पण त्याबरोबर कुठेतरी थोडासा दिलासा पण देऊन जाईल.
चार डिसेंबर २०२५ ला सात वर्षाच्या मुन्नीचे, ती तिच्या मैत्रिणीबरोबर खेळत असताना एका नराधम मानवी राक्षसाने अपहरण केले, तिला निर्जन स्थळी नेऊन लोखंडाच्या कांबीने निर्घृणपणे मारहाण केली आणि त्या कोवळ्या जिवावर बलात्कार केला. गुन्हेगाराचा शोध लावण्यासाठी मुन्नीची साक्ष घेणे महत्वाचे होते. पण तिच्यावर झालेला अत्याचार, त्यानंतरचे इस्पितळ आणि ऑपरेशन्स यामुळे झालेल्या शारिरीक आणि मानसिक इजेमुळे ती शॉकमधे गेली होती. तिचे बोलणे बंद झाले होते. कोणीही जवळ आले की थरथर कापत ती भयभीत होत होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू ओघळत होते. पोलिसांची खाकी वर्दी आणि वकीलांचा काळा डगला बघून ती आणखीनच विड्रॉलमधे जाऊ लागली.
असे सहा दिवस गेले. अपर पोलीस अधीक्षक ASP सिमरन भारद्वाज हिने यावर एक तोडगा काढला. तिने तिची खाकी वर्दी उतारून साधा पोषाख धारण केला. दररोज मुन्नीला भेटून तिच्याशी गुन्हा सोडून इतर अनेक विषयांवर गप्पाटप्पा केल्या. तिच्याबरोबर खेळ खेळली, तिचा चॉकलेटचा हट्ट पुरवला. काही दिवसातच मुन्नीची भीति आणि अबोला हळूहळू कमी होत गेला. ती अधेमधे बोलू लागली आणि एके दिवशी तिने सर्व घटनाक्रम सांगितला. आरोपीचे वर्णन केले, आपण त्याचे केस कसे ओढले, तेही सांगितले. पोलीसांनी लगेच घटनास्थळावरून ते केसही हस्तगत केले आणि या सर्व पुराव्याच्या आधारावर आरोपी _रामसिंग_ (वय ३२) याला अटक केली.
पण आता खरी अडथळा शर्यत तर पुढे होती. नवीन _भारतीय नागरिक सुरक्षा संहिता_ BNSS प्रमाणे पोलीस अधिकाऱ्यासमोरची साक्षीदाराची साक्ष न्यायालयात ग्राह्य धरली जात नाही. (Section 183- Record of confessions & statements). त्यासाठी ती साक्ष _न्यायदंडाधिकाऱ्यासमोरच_ (Judicial Magistrate) व्हावी लागते. मुन्नीच्या डोळ्यासमोर परत जज्ज, काळे डगले, खाकी वर्दी आली असती, तर ती परत विड्रॉलमधे गेली असती.
या वेळी सिमरनने एक नवी युक्ती केली. तिने मुन्नीला सांगितले की आता आम्ही तुला एका छान शाळेत घालणार आहोत, आणि त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी तुला बोलावले आहे. सिमरनने तिच्या दोन महिला कॉन्स्टेबल साधे कपडे घालून तयार केले. त्यांनी मुन्नीला कारमधून फिरवले, शाळेसाठी तिच्या पसंतीचे शॉपिंग केले, स्कूल बॅग आणि वह्या, पुस्तकांची पण खरेदी झाली. एवढेच नव्हे तर शाळेला योग्य अशी केशरचना पण केली. मुन्नी आता खूष होती, शाळेत जायला उत्सुक होती.
साक्षीच्या ठरलेल्या दिवशी न्यायदंडाधिकारी मुख्याध्यापकाच्या भूमिकेत शाळेत बसले. नवीन सर खूपच प्रेमळ, हसरे व रिलॅक्स दिसत होते. ते अधूनमधून जोक्स पण मारत होते. त्यांनी मुन्नीबरोबर बर्याच इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. तिला भूक लागली तेव्हा त्यानी चक्क शाळेच्या शिपायाला पाठवून तिच्या आवडीची पाणीपुरी मागवली. संध्याकाळ होता होता दंडाधिकाऱ्यांनी सर्व साक्ष रीतसर रेकॉर्ड केली. मुन्नी तर खूषच होती. तिला नवी शाळा खूप आवडली होती. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला!
मात्र अजून शेवटची एक बाजी मारणे बाकी होते आणि ते म्हणजे _ओळख परेड_! पोलीसांनी कोर्टाच्या परवानगीने एक _स्पेशल वीटनेस डिपोझिशन सेंटर_ स्थापन केले. परेड रूमला एकतर्फी काच (one way mirror) लावण्यात आली. पाच सहा गुंडासारखे दिसणारे चेहरे एकत्र बघून मुन्नी परत गप्प झाली असती. या धोक्याची शक्यता पत्करायला सिमरन तयार नव्हती. तिने रामसिंग आणि इतर इसमांना हातात खेळणी (stuffed toys) घेऊन उभे रहायची आज्ञा केली. मुन्नीने क्षणार्धात आरोपीला ओळखले!
खटला उभा राहिला आणि FIR दाखल केल्यापासून एक्केचाळीसाव्या दिवशी, १७ जानेवारी २०२६ ला (पाचच दिवसापूर्वी) कोर्टाने रामसिंगला अल्पवयीन बालिकेचे अपहरण, शारिरीक इजा व बलात्कार प्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली!
लेखक : दीपक कणगलेकर
मो 9822281018
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





