डॉ. धनंजय देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ अडगळीत गेलेले शब्द — ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆
‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की अडगळ हा शब्दच अडगळीत गेला आहे. पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. सगळ्या नको असलेल्या, परंतु कधीतरी कामास येणार्या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.
.
पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते.
.
जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.
.
माळा (आताच्या मराठीत अँटिक, पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण) ही पूर्वी अभ्यासाची जागा पण असायची.
.
तसंच आता व्हेंटिलेटर फक्त हॉस्पिटल किंवा थिएटर मधेच दिसतो. दरवाज्यावर एक झरोकावजा खिडकी असायची हवा खेळती रहाण्यासाठी, तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहीत असेल.
.
‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा.
.
घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.
.
पागोळं म्हणजे काय? वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी ‘पन्हळी’ तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न येता इकडून तिकड़ून खाली येतात – ती पागोळी.
.
‘फडताळ’… फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द.
.
जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.
.
गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली.
.
लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला
‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.
.
स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल, वैल, निखारे हे शब्दही गेले.
.
स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले.
.
ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला.
.
पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले.
.
देवघराबरोबर सहाण, गंधाची थाटी गायब.
.
‘काथवट’ हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.
.
कपड्यांचा विचार करताना तठव, जाजम, बसकर, सुताडे सगळे हरवून गेलेले. सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,
.
पण उत्तरवस्त्र पाभरी’ हरवून गेली.
.
सोवळ्यात नेसण्याची ‘धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.
.
सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.
.
कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या, ढोल्या – ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे – त्या गडप झाल्या.
.
सूप खुंटीवरून बाउल मधे आलं.
.
एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.
.
जेवण्याची पितळी, वाटकावन, बसकर, माडक्यांची उतरंड, फुंकणी, उखळ, मुसळ, खल आणि बत्ता, जातं, खुंटा, पावशेरा, शेर, मण, गुंज, आतपाव, छटाक वगैरे गायब झाले.
बदलत्या काळाबरोबर पिकदानी सोडून सगळीकडे बिनधास्त आणि बिनदीक्त पान, पणपराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे.
‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.
उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा त्याला चोप म्हणत असत.. घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला बैठक असायची, तिला ढाळज किंवा ढेळज म्हणत.. हे पण अडगळीतील नावे आहेत…
.
लाइट आले आणि अनेक तर्हेचे दिवे गडप झाले. काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात. भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे, फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच, इतकेच…
संकलक / लेखक : डॉ. धनंजय देशपांडे (dd)
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
मो न. ९४२२३०४३४४
1) Global Cyber Crime Helpline National Award winner
2) Digital Hero of the year National Award winner
3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State
4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




