श्री नागेश शेवाळकर
अल्प परिचय
सेवानिवृत्त शिक्षक. राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे.
गेली तीस वर्षांपेक्षा अधिक काळ साहित्य लेखन सुरू आहे. धार्मिक, कादंबरी, कथा, बालकथा नि कादंबरी, चरित्र, पत्र, पुस्तक परिचय, विविध विषयांवरील लेख अशा लेखन विभागात पन्नासपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत.
कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेषु कदाचन याप्रमाणे साहित्य सेवा सुरू आहे.
जीवनरंग
☆ स्वर्गीय निर्भया… ☆ श्री नागेश शेवाळकर ☆
हळूहळू तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न करुनही डोळे किंचितही उघडले नाहीत. कसेतरी मोठ्या मुश्किलीने डोळे किंचितसे उघडताच तिने इकडेतिकडे पाहिले. सारेच कसे नवीन होते. सुकलेल्या अश्रूंचा एक थर गालावर दिसत होता. असह्य वेदना होत होत्या. मूक आक्रोश कुणाला ऐकू जात नव्हता. तिला अचानक काहीतरी आठवले. ती जीवाच्या आकांताने ओरडली. परंतु तिचा आवाज तिलाच ऐकू आला नाही.
“म… म… मम्मी… ” तिच्या आवाजाला ‘ओ’ मिळाला नाही. ती पुन्हा पुन्हा ओरडत होती. तिथे तिची मम्मी नव्हतीच तर तिला प्रतिसाद कसा मिळेल?
कुणीतरी तिच्या अंगाला स्पर्श केला. पण तिला हवा असलेला तिच्या मम्मीचा तो स्पर्श नव्हता. स्पर्श कोमल असला तरीही तिला तो स्पर्श अनंत यातना देत होता. तशाही परिस्थितीत ती स्पर्श ओळखत होती. तरीही त्या हातांनी तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. जे हात तिला सावरण्याचा प्रयत्न करीत होते, त्या शरीराचेही भूतकाळात कधीतरी निर्दयपणे लचके तोडले होते. त्या जखमा पुरत्या कोरड्या होत नव्हत्या. वासनांकिताच्या घाणेरड्या कृत्याला बळी पडलेली कुणीतरी ‘निर्भया’ दररोज येतच होती. तिचे ओरबाडलेले शरीर पाहून अगोदर पोहोचलेल्या निर्भयाच्या आठवणी ताज्या होऊन जखमा ठसठसत, डोळे पाझरत असले तरीही त्यात संतापाची आग धगधगत होती. हाताच्या मुठी आवळल्या जात परंतु दुसऱ्याच क्षणी स्वतःची, आलेल्या नवागत बालिकेची, तरुणीची नि अधूनमधून येणाऱ्या वृद्ध महिलेची हतबलता लक्षात येताच शरीर जणू निष्प्राण होत असे. डोळ्यातील अंगार अश्रू रुपाने वाहत असत, थरथरणारे हात लकवा झाल्याप्रमाणे स्थिर होत.
नुकतीच आलेली ती बालिका… नव्हे निर्भया केवळ तीन वर्षांची होती. अनेक दिवस उपाशी असलेल्या एखाद्या व्यक्तिसमोर अन्नाचे ताट येताच ती व्यक्ती जशी त्या अन्नावर तुटून पडते तसा तो नराधम (खरंतर नराधम, राक्षस, दानव, गुंड इत्यादी विशेषणं थिटी पडावीत) त्या बालिकेवर तुटून पडला होता. अजून जगाची सोडा परंतु स्वतःच्या शरीराचीही ओळख न झालेल्या त्या कन्येचा आक्रोशही त्याने दाबून टाकला होता.
तशाच जखमी अवस्थेत, त्या जखमा शरीरावर घेऊन त्या साऱ्या ज्यांना समाजाने ‘निर्भया’ ही पदवी बहाल केलीय त्या तिथे वावरत होत्या. स्वर्ग म्हणवणाऱ्या ठिकाणी त्या नरकाप्रमाणे राहत होत्या. पृथ्वीवर नरकीय यातना भोगल्या नंतर थेट स्वर्गात प्रवेश मिळाला होता. सुदैव म्हणावे की दुर्दैव? कदाचित पृथ्वीवर जे भोगले होते कदाचित ते नरकयातनेपेक्षा अधिक होते.
तिथे अनेक निर्भयांच्या जखमा त्या नवागत चिमुकल्या बालिकेला पाहून ठसठसत होत्या. आपापसात चर्चा सुरू झाली. एकजण म्हणाली,
“अजून बिचारीच्या ओठांवरचे दुध सुकले नाही तर त्या कोवळ्या ओठांनी राक्षसी, विखारी दंश कसे सहन केले असतील? बिचारीची दशा पाहवत नाही. “
“अगं, तिकडे पृथ्वीवर हिच्या आईच्या छातीतील दुधही बाहेर पडण्यासाठी तळमळत असेल. दुर्देव, दुर्भाग्य, ससेहोलपट, कमनशिबी असे शब्दही कमी पडावेत अशी अवस्था झाली आहे बाळाची. “
“जखमा त्या जखमाच, अत्याचार ते अत्याचारच परंतु वयाप्रमाणे सहनशक्ती महत्त्वाची असते. आपली प्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे आपण सुरुवातीला विरोध तरी केला असेल दुर्दैवाने तो यशस्वी झाला नसेल परंतु ही बिचारी तर सुरुवातीला ओरडण्याशिवाय काहीही करू शकली नसेल. “
“बरोबर आहे. आताही ती फक्त मम्मीच म्हणत आहे… ” असे म्हणत ती त्या बालिकेजवळ पोहोचली. तिने बालिकेच्या चेहऱ्यावरील जखमा आणि त्यावर सुकलेले अश्रू पाहताच तिचे स्वतःचे डोळे पाझरू लागले. तिने हलकेच तिच्या गालावर बोट ठेवले. ती चाहूल लागताच त्या मुलगी दचकली. त्या अनिष्ट गोष्टीची तिला आठवण आली असावी. तिने शरीर आकसून घेतले. तिचे शरीर थरथरत होते. ओठही हलत होते. त्यातून थकलेला आवाज निघत होता. ती ‘मम्मी… मम्मी… ‘ असे म्हणत होती. तिला आधार देऊ पाहणाऱ्या निर्भयाने बाजूला पाहिले. इतर निर्भया तिला ‘थांब… ‘ असा इशारा करत होत्या.
“थांब! थोडा वेळ होऊ देत. सावरेल ती… “
“सावरेल? असं झालं असतं तर किती छान झालं असतं? अत्याचाराला बळी पडून आपल्यापैकी कुणाला पाच वर्षे, दोन वर्षे, कुणाला सात… कुणाला दहा वर्षे झाली आहेत. किती जणी सावरल्या आहेत? किती जणींच्या जखमा भरल्या आहेत? … “
“कसं सावरावं? जखमा भरतीलच कशा? रोज इथे कुणीतरी नवीन निर्भया येतीय, तिच्या शरीरावरील जखमा पाहिल्या की, आपल्या वेदना तीव्र होतात. आपल्या डोळ्यासमोर आपण अनुभवलेला प्रसंग जशास तसा उभा राहतो. डोळे पाणावतात, अंग थरथरते. शरीरात संतापाचा आगडोंब उसळतो. पण, तेव्हाही आपण काही करू शकलो नाही. आताही काही करू शकत नाही ही जाणीव होताच आत्मा निष्प्राण होतो. “
“हो ना. तो अत्याचारी एकदा अत्याचार करून मोकळा होतो, कदाचित तो विसरूनही जात असेल की, आपण कुणावर, किती जणींवर शारीरिक, मानसिक हल्ले केले आहेत. होय, ते हल्लेच असतात. किती जणींचे विकृत वासनेच्या हव्यासापोटी बळी घेतले आहेत. इथे आपण तर त्याच जखमा शरीरावर घेऊन वागत असतो… “
“एक गोष्ट आपण सगळ्या जणींनी अनुभवलेली आहे. आपला छळ करून तो दानव निघून जाताच आपल्या जखमांवर मीठ नव्हे तीखट टाकण्याचे काम आपले कुटुंब, नातेवाईक, परिचित, समाजकारणी, राजकारणी करतात… “
“माझ्या मनातील बोललीस बघ. तो नराधम निघून जाताच पीडितेला तासनतास पोस्टमार्टमसाठी दवाखान्यात खितपत ठेवले जाते. बाहेर आपले कुटुंबीय हतबल, सर्वस्व गमावलेल्या अवस्थेत बसून असतात. तेव्हा कुणीतरी पुंगी वाजवतो, अपराध्याला पकडल्याशिवाय अंत्यसंस्कार होऊ द्यायचे नाहीत… “
“अगदी बरोबर आहे. मी हे अनुभवलं आहे. तीन दिवस माझा मृतदेह बेवारशी अवस्थेत पडून होता. तेव्हा एका मोठ्या राजकीय व्यक्तिशी संबंध असलेला तो नीच कुठेतरी लपून बसला होता. तीन दिवसांनंतर माझे अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी मला करकचून बांधून ठेवले होते. ना मला आईबाबा, भाऊ बहिणी यांचे दर्शन झाले ना त्या कुणाला माझा चेहरा पाहता आला… “
“हेच दुर्दैव माझ्याही नशिबी आले. दुसरे म्हणजे त्या दुष्ट माणसाच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मेणबत्ती मोर्चे निघाले. माझे फोटो आणि त्याभोवती पेटविलेल्या मेणबत्त्या! त्या मेणबत्त्यांच्या प्रकाशाने माझ्या जखमांची आग अजून धगधगत होती. अनन्वित छळ माझा झाला, मी विकृत वासनेची बळी ठरले आणि राजकारणी लोक माझ्या भळभळत्या जखमांवर स्वतःच्या मतांची पोळी भाजून घेण्यासाठी सरसावत होते. माझे कुटुंबीय सांगून सांगून थकत होते. माझी आई त्याच त्याच गोष्टी वारंवार सांगून, इतर कुणी सांगत असताना चक्कर येऊन पडत होती. पण तिचा कुणी विचार करत नव्हते… “
“हो ना. तिकडे तो क्रुरकर्मी मोकळा हिंडतो किंवा पोलीस ‘संरक्षणात’ असतो. नावाला तुरुंगात असतात. तिथे तो ऐषो आरामात लोळत असतो. त्या अत्याचारानंतर आपल्या देहाची विल्हेवाट लावली जाते. आत्मा इथे येतो. तो म्हणे अमर असतो. काय करायचे अशा अमरत्वाला? आत्मा जसा अमर असतो तशा आपल्या जखमाही अमरच असतात, म्हणून तर आपण त्या जखमा मिरवत जगत असतो. खरंतर आपल्यासारख्यांच्या आत्म्याला ‘अमर’ हा शापच असावा, उःशाप नसलेला! “
“किती स्वप्नं पाहिली असतील हिच्या कुटुंबाने त्यातही आईनं! एका क्षणात स्वप्नांचे इमले ध्वस्त झाले असतील. “
“का गं? पुनर्जन्म असतो का गं? “
“कशाला पुनर्जन्मचा विचार करतेस? या जन्मी जे भोगलं ते विसरतेस का? “
“ते विसरता तर येत नाही ना, जर खरेच पुनर्जन्म असेल तर पुन्हा जन्म घेऊन त्या राक्षसाला अद्दल घडवताना त्याचे डोळे बाहेर काढले असते, त्याचे लिंग छाटले असते त्यामुळे ना त्याने पुन्हा दुसऱ्या महिलेसोबत सोड पण स्वतःच्या बायकोकडेही सात जन्मं पाहिले नाही पाहिजे… “
“हे तुझे स्वप्नं आहे. तेही बरोबर आहे म्हणा, अशी स्वप्ने पाहिले की, क्षणभर का होईना पण, गिधाडाने कुस्करलेले मन शांत होते… “अशी चर्चा होत असताना तिथे एका यमदूताचे आगमन झाले. त्याने एक आत्मा खाली उतरवल्याचे पाहून अनेक जणी किंचाळल्या,
“पुन्हा एक निर्भया.. बालिका? “
“निर्भया नाही… निर्भय म्हणा! मुलगा आहे… तीन वर्षांचा! एका राक्षसाच्या विकृत वासनेचा बळी… ” असे सांगून तो यमदूत स्वर्गातील ‘निर्भया’ दालनातून बाहेर पडला…
© श्री नागेश शेवाळकर
पुणे
मोबा. ९४२३१३९०७१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




