अर्चना मुळे
इंद्रधनुष्य
☆ पाळणा हलणार की नाही? ☆ अर्चना मुळे☆
– एक सामाजिक प्रश्न
एक काळ असा होता की, आई होताना सामाजिक, कौटुंबिक सक्ती असायची. ‘मुलगाच हवा’ हा हट्ट अनेक तरूणीना जाळणारा, विहिरीत ढकलणारा, माहेरी परत पाठवणारा, निराशा, औदासिन्य, ताणतणाव देणारा होता. मूल हवंच आणि मुलगाच हवा यामधल्या ‘च’ ने त्या काळातील मूल न होणार्या किंवा मुलगा न होणार्या तरूणींचा प्रचंड मानसिक छळ केला. त्या काळातील ‘मूल हवंच’ या विचारामागे शेतात आणि घरात राबण्यासाठी हात हवे असणे. वृद्धापकाळासाठीचा आधार तयार करणे. मृत्यूनंतर मुलाकडून अग्नी मिळाला तरच मोक्षप्राप्ती होते या कल्पनेनुसार सद्गती मिळवणे. अशी काही कारणं होती. मुलांचा सांभाळ हा सहज व्हायचा. तेव्हा एकल पालकत्व, द्विपालकत्व असा काही प्रकार नव्हता. एकत्र कुटुंबपद्धतीत मुलं हसत खेळत मोठी व्हायची. सामाजिक पालकत्व असायचं. मुलांचा खर्च एकत्रितपणे केला जायचा. त्यामुळे पालकत्व निभावताना तणाव नसायचा. मुलांची संख्या कितीही वाढली तरी फारशी अडचण नसायची. ‘ज्याने दिली चोच तो भरेल पोट’ असंही म्हटलं जायचं. मूल नसणं म्हणजे पाप होतं. शाप होता. त्यापेक्षा मुलांना जन्म देऊन सन्मानपूर्वक जगणं किंवा स्वत:ची सामाजिक प्रतिष्ठा टिकवणं यालाच महत्त्व दिलं जायचं.
काळ बदलला. मानवी संस्कृती – मानवी मूल्ये बदलली. जगण्याची व्याख्या बदलली. सावित्रीच्या लेकी शिकू लागल्या. कर्तृत्वाने मोठ्या होऊ लागल्या. ‘मुलगी झाली तर चालेल’ हा विचार समाजात रुजायला लागला. पूर्वीचा ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव! ‘ हा आशीर्वाद मागे पडायला लागला. आताच्या जोडप्यांच्या कुटुंबाच्या उंबरठ्यावर ‘मूल नकोच’ हा शांतपणे, जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय स्तब्ध उभा आहे.
काही वर्षापूर्वी ‘मूल का नाही’ हा प्रश्न विचारला जायचा. आता ‘कशासाठी मूल हवंय’ असा प्रश्न विचारला जातो. मूल नको हा काही नगण्य लोकांचा विचार नाही. तो सामाजिक कल बनला आहे. या विचाराकडे गांभीर्याने बघणं अपेक्षित आहे.
विवाहानंतर दीप आणि निला दोघं पुण्यात स्थायिक झाले. दोघंही आय टी कंपनीत नोकरी करत आहेत. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी त्यानी अजून मुलाचा विचार केलेला नाही. ते म्हणतात, “शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडणं, स्वत:चं छोटंसं घर घेणं यात १०-१२ वर्षे निघून गेली. आता बाळाचा विचार केला तर नैसर्गिकपणे गर्भधारणेत अडचणी आहेत. डाॅक्टरनी सुचवलेले इतर पर्याय शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रासदायक आहेत. त्यातूनही बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतलाच तर आम्ही बाळाला वेळ देऊ शकणार नाही. त्याला पाळणाघरात ठेवणं आम्हाला पटत नाही. नातेवाईकानी आम्हाला स्वार्थी म्हटलं. जबाबदार्या नको आहेत असंही म्हटलं. पण आम्ही ठरवलं. लोक म्हणतात म्हणून आम्ही बाळाला जन्म देणार नाही. त्याला उत्तम असं आयुष्य आम्ही देऊ शकत नाही. तर जन्माला घालून त्याच्यावर अन्याय करण्याचा आम्हाला अधिकार नाही. म्हणून आम्ही बाळाला जन्म न देण्याचा निर्णय जबाबदारीने, दोघांच्या विचाराने जाणीवपूर्वक घेतला आहे. “
– – अशी ही पिढी.. या विषयावर जेन झी मोकळेपणाने बोलतात. त्यानी आणखी काही कारणं सांगितली.
नोकरी व्यवसायात खंड पडण्याची भीती – आर्थिक स्वावलंबनाच्या हेतूनेच प्रचंड मेहनतीने शिक्षण पूर्ण केलेलं असतं. नोकरी मिळालेली असते. त्यानंतर थोडं स्थिरस्थावर होतं न होतं तो लगेच बाळाचा विचार करू शकत नाही. नोकरीमुळे बाळाची जबाबदारी नीट पार पाडू शकत नाही. नोकरी तर सोडूच शकत नाही. कारण एकदा खंड पडला तर प्रगती खुंटेल. आणि पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करावी लागेल. अशी भीती या पिढीला वाटते.
आर्थिक ओझं – एक चांगला पालक होऊ शकतील की नाही याची भीती असते. उत्तम शिक्षण, उत्तम भौतिक सुखं देण्यात ते कमी पडतील असं त्याना सतत वाटत असतं. मुलांचं संगोपन हे आर्थिक ओझं वाटतं. चोवीस तास पालकत्वाची जबाबदारी पेलणं खूप कठीण आहे. या चिंतानीच पालक न होण्याचा निर्णय घेतला जातो.
दूषित पर्यावरण – स्वच्छ हवा, पाणी, अन्न मिळणं अशक्य आहे. आपण मुलाना कोणत्या प्रदूषित वातावरणात ढकलत आहोत याची जाणीव तरूणाना आहे. आम्हालाच जे मिळत नाही, ते आम्ही मुलाना कुठून देणार असाही विचार ही जोडपी करताना दिसतात.
शारीरिक – मानसिक आरोग्य – आजूबाजूचं वातावरण, शैक्षणिक ताण, मित्रांचा दबाव या सगळ्यात मुलं कितपत आरोग्यपूर्ण जगतील ही शंका येते. मुलांना निरोगी आयुष्य देणं ही जबाबदारी पालकांची असते.
उशिरा होणारी लग्नं – आजकाल लग्नाचं सर्वसाधारण वय तीस वर्षे झालं आहे. त्यानंतर गर्भधारणा किंवा प्रसूती यामधली गुंतागुंत वाढू शकते. धोका पत्करायला नको म्हणूनही अपत्यहीन राहण्याचा निर्णय घेतला जातो.
‘मुलगाच हवा’ पासून ‘मूलच नको’ हा प्रवास म्हणजे आधुनिक दर्जेदार जीवनशैली, बदलत जाणारी कौटुंबिक, सामाजिक मूल्ये आणि आर्थिक स्थैर्य याचा प्रभाव असं म्हणावं लागेल. सामाजिक नियमांची चौकट कधीच ओलांडली गेली. आता ‘पाळणा हलणं’ हा वैयक्तिक निर्णय झाला आहे. आधी आपण तर नीट जगू, मग नव्या जीवाला या जगात आणायचं की नाही ते ठरवू असं म्हणणारी ही पिढी आहे.
अपत्यप्राप्तीचा बदलता दृष्टिकोन-
पूर्वीचा काळ – या काळात अपत्य प्राप्तीचा मुख्य उद्देश वंश वाढवणे.. हे कौटुंबिक, सामाजिक कर्तव्य आहे असं मानलं जायचं. मुलांना भविष्यातील आर्थिक आधार समजलं जायचं. तेव्हा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकत्र कुटुंबात विभागली जायची. मातृत्व हेच स्री जीवनाचं सार्थक मानलं जायचं. अपत्यप्राप्ती न होणं हा सामाजिक अपमान होता. लग्नानंतर मूल होणं नैसर्गिक पण अनिवार्य होतं. अपत्याकडे म्हातारपणाची काठी म्हणजेच आधार म्हणून बघितलं जायचं.
आधुनिक काळ – या काळात अपत्य प्राप्तीचा उद्देश हा वैयक्तिक आनंद मानला जातो. मूल होऊ देण्याचा निर्णय हा स्वेच्छेने घेतलेला असतो. जबाबदारीची जाणीव असते. मुलांच्या संगोपनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. संगोपनाचा खर्च मोठा असतो. विभक्त कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाचा ताण पालकांवर असतो. पालक स्वत:चं करिअर, आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वत:ची ओळख निर्माण करण्याला महत्त्व देतात. स्वेच्छेने मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतात. स्वत:च्या म्हातारपणाची काठी स्वत:च होतात. त्यासाठी आर्थिक तरतूद करूनच निर्णय घेतात.
पूर्वी नशीबाने, देवकृपेने मुलं व्हायची. आज निश्चयाने मुलं होतात. आधुनिक जोडपी सर्व आव्हानांचा विचार करतात. मानसिक तयारी करतात. मूल होणं ही आजच्या जोडप्यांची गरज नाही. मूल होऊ देण्यात कोणतीही जबरदस्ती ते ओढवून घेतच नाहीत. नवीन जोडप्याना बाळ न होण्यात अपूर्णत्व वाटत नाही. बाळाला जन्म देण्याचा निर्णय म्हणजे जाणीवपूर्वक स्वीकारलेलं पूर्णत्व असं त्यांना वाटतं. जबाबदार्या नको आहेत. स्वातंत्र्य हवंय असं काही नाही. न जन्मलेल्या बाळाचा ते प्रामाणिकपणे विचार करतात. त्यांच्या घरातला पाळणा रिकामा राहिला तरी त्यांचं जग अनेक सुखानी भरलेलं असतं. हेच आधुनिक सामाजिक सत्य आहे. जबाबदारीच्या जाणीवेतून स्वेच्छेने पालकत्व स्वीकारणे ही सजगतेची नांदी आहे. पण मूल होऊच न देणार्यांची संख्या वाढते आहे. म्हणूनच ‘पाळणा हलणार की नाही? ‘ हा सामाजिक उंबरठ्यावरचा प्रश्न झाला आहे.
© अर्चना मुळे
समुपदेशन तज्ज्ञ, सांगली
संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415
फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





