श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २७ आणि २८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. २७ – – –
भवाच्या भये काय भीतोस लंडी ।
धरी रे मना धीर धाकासि सांडी ।
रघुनायका सारिखा स्वामि शीरी ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ।।२७।।
अर्थ : हे मना, एखाद्या भित्र्या माणसासारखा तू प्रपंचाला का घाबरतोस? भीती सोडून धैर्य धारण कर. कारण तुझ्या पाठीशी रघुनायकासारखा स्वामी असताना घाबरण्याचे काहीच कारण नाही. अगदी यमाचा कोप झाला तरी तो तुला कधीही सोडणार नाही, तुझी उपेक्षा करणार नाही.
(भव – प्रपंच, लंडी – भित्रा/कमजोर मनाचा, दंडधारी – यम)
विवेचन : मानवी जीवन हे अनेक अनिश्चिततांनी भरलेले आहे. उद्या काय होईल याची चिंता, नोकरीची काळजी, मुलाबाळांचे भविष्य, आरोग्य, आर्थिक स्थिती अशा असंख्य विचारांनी मन व्यापलेले असते. त्यामुळे माणूस आतून अस्वस्थ आणि भयग्रस्त होतो.
प्रपंचाची काळजी वाटणे स्वाभाविक आहे, पण त्या भीतीने खचून जाणे योग्य नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी आपल्या मनाला धीर देतात…
“धरी रे मना धीर, धाकासि सांडी”
… हे मना, तू भीती झटकून टाक आणि धैर्याने उभा रहा.
आपले जीवन हे जर एक रणांगण मानले, तर या रणांगणावर शूरवीराप्रमाणे लढणे आवश्यक आहे. हातात तलवार किंवा बंदूक आहे पण हात पाय कापताहेत, तर लढाई कशी लढणार ? शत्रूसाठी मग तुम्ही सोपे लक्ष्य असाल. मनात भीती असेल तर विजय शक्य नाही.
संकटेही अशीच असतात. आपण त्यांना जेवढे घाबरतो, तेवढी ती अधिक मोठी वाटतात. धैर्याने सामना केला, तर ती हळूहळू नाहीशी होतात.
या संदर्भात स्वामी विवेकानंद यांच्या बालपणातील प्रसंग अत्यंत बोलका आहे. त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्र. ते अत्यंत अवखळ आणि खोडकर होते. ते झाडावर चढत. आईला असे वाटले की झाडावर चढून हा खाली पडला तर त्याला इजा होईल. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना झाडावर चढू नकोस. तिथे ब्रह्मराक्षस राहतो असे सांगितले. पण नरेंद्राने आईला विचारले, “ब्रह्मराक्षस ? कुठे आहे तो मला त्याला पाहायचेच आहे. ?” ब्रह्मराक्षस प्रत्यक्षात नव्हताच. आपली मनच अशा गोष्टींची निर्मिती करते. म्हणूनच भित्यापाठी ब्रह्मराक्षस असे आपण म्हणतो.
समर्थ पुढे आपल्याला एक मोठा आधार देतात…
… रघुनायकासारखा स्वामी आपल्या पाठीशी आहे.
राम म्हणजे केवळ एक ऐतिहासिक किंवा पौराणिक पात्र नाही, तर तो धैर्य, धर्मनिष्ठा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. वाल्यासारख्या बलाढ्याला संपवणारा, रावणासारख्या अहंकारी व्यक्तीचा नाश करणारा हा राम सज्जनांचा त्राता आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात
प्रत्यक्ष यम जरी कोपला, तरी राम तुला कधीही सोडणार नाही. तुझी उपेक्षा करणार नाही. याचा अर्थ असा नाही की की श्रीरामांना शरण जाण्यामुळे आपला मृत्यू टळणार आहे. मृत्यू तर अटळ आहे परंतु श्रीराम आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास जेव्हा आपल्या मनात निर्माण होतो तेव्हा मृत्यूची भीती कमी होते. संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते.
शेवटी, भय, आनंदी आणि धैर्याचे जीवन जगण्यासाठी समर्थांचा स्पष्ट संदेश आहे की श्रीरामावर (भगवंतावर) श्रद्धा ठेवा, धैर्य धरा आणि निर्भयपणे जगायला शिका. श्रीराम तुमच्या पाठीशी आहेतच.
स्वसंवाद ::
- मी माझ्या आयुष्यातील समस्यांना धैर्याने सामोरे जातो का, की त्यांना घाबरून जातो?
- माझी भीती वास्तव आहे की ती माझ्या मनाने निर्माण केली आहे ?
- संकटांच्या वेळी मला ईश्वरावर खरोखर विश्वास वाटतो का?
- माझ्या मनातील श्रद्धा आणि धैर्य वाढवण्यासाठी मी काही प्रयत्न करतो का?
– – – –
श्लोक क्र. २८ – – –
दिनानाथ हा राम कोदंडधारी |
पुढे देखता काळ पोटी थरारी |
जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |२८|
अर्थ: श्रीराम हा दीनांचा कैवारी/रक्षणकर्ता आहे. धनुर्धारी रामाला समोर पाहिल्यानंतर प्रत्यक्ष काळ म्हणजे यमराजाला देखील धडकी भरते. हे वाक्य सत्य समजा की भगवंत आपल्या भक्ताचा अभिमान बाळगणारा आणि त्याचे रक्षण करणारा आहे. तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही.
(कोदंडधारी म्हणजे धनुष्य धारण केलेला, वाक्य – वचन, नेमस्त – निश्चितपणे)
विवेचन : मागील श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात की भवाच्या भये काय भीतोस लंडी म्हणजे प्रपंचाच्या भीतीने हे मानवा तू का घाबरतोस ? या श्लोकात ते भगवंत आपला रक्षणकर्ता कसा आहे आणि तो आपल्या भक्तांची उपेक्षा कशी करीत नाही हे समर्थ निरनिराळ्या प्रकारे आपल्या मनावर बिंबवतात. त्यासाठीच भगवंत आपल्या दासाची/भक्ताची उपेक्षा करीत नाही हे सांगणारे (नुपेक्षी कदा राम दासाभिमानी)हे पालुपद असलेले बरेच श्लोक आहेत.
मनुष्य अनेक अर्थाने दुबळा किंवा परावलंबी असतो. संकटप्रसंगी त्याला कोणाचा तरी आधार हवा असतो. कधी कधी हा आधार तो आपल्या नातलगांमध्ये किंवा मित्रांमध्ये शोधत असतो. परंतु या सगळ्याच गोष्टी बेभरवशाच्या असतात. परिस्थिती फिरली की ही मंडळी सुद्धा पाठ फिरवतात. पैसा सुद्धा सर्वप्रसंगी उपयोगी पडेलच असे नाही. म्हणून संत आपल्याला कळकळीने सांगतात की आधार हा एकमेव परमेश्वराचाच असला पाहिजे कारण सर्व परिस्थितीत तोच आपल्याला साथ देईल. तो दीनानाथ आहे.
आपल्याला नुसता कोणाचातरी आधार आहे ही जाणीव सुद्धा खूप मानसिक बळ देणारी असते. स्वामी समर्थांच्या फोटोखाली, ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असे वचन लिहिलेले असते. हे वचन लाखो भक्तांना जगण्याची शक्ती देते. स्वामी प्रत्यक्ष आपल्या पाठीशी आहेत या भावनेतून भक्त कठीण प्रसंगातूनही तरुन जातो. गीतेतील नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात – –
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।
– – जो भक्त निष्ठेने आणि माझ्यावर श्रद्धा ठेवून माझी उपासना करील त्याचे मी रक्षण करतो.
आजकाल बरीच शिकलेली मंडळी माझा देवावर विश्वास नाही असे म्हणत असतात आणि त्याचे निरनिराळ्या प्रकारे समर्थन करीत असतात. आपण आस्तिक म्हणून जगायचे की नास्तिक म्हणून जगायचे हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. परंतु अशा मंडळींनी आस्तिक लोकांचा बुद्धिभेद करून त्यांच्या जगण्याचा आधार काढून घेऊ नये. ईश्वराला विज्ञानाच्या कसोटीवर अनुभवता येत नाही. त्याची अनुभूती श्रद्धेच्या कसोटीवर घेता येते ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी. परमेश्वराची अनुभूती येण्यासाठी त्याच्यावर दृढ श्रद्धा असावी लागते, निष्ठा असावी लागते. त्या भावनेने जोपर्यंत आपण त्याची भक्ती करीत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव येणार नाही.
समर्थांना प्रिय असलेला आणि त्यांचे आराध्य दैवत असलेला राम हा कोदंडधारी म्हणजे धनुष्य धारण केलेला आहे. त्याच्या नुसत्या धनुष्याच्या टणत्काराने काळ देखील थरारतो. तो दीनांचा, दुःखितांचा रक्षण करणारा आहे. तो आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. फक्त आपली त्याच्यावर दृढ श्रद्धा हवी.
संकटातून परमेश्वर आपले रक्षण करतो असे समर्थ जे म्हणतात त्याचा अर्थ संकटांशी सामना करण्याची शक्ती तो आपल्याला देतो आणि त्याच्या कृपेनेच हा भवसागर आपण तरुन जातो असा आहे. तेव्हा हे मना, तू अन्य सगळे आधार सोडून केवळ एका रामावर श्रद्धा ठेव. तोच तुझे कल्याण करील. जेव्हा आपल्याला आतून जाणवते की एक दिव्यशक्ती आपल्या सोबत आहे, तेव्हा चिंता, राग, भविष्याची भीती यासारख्या गोष्टी आपोआपच कमी होतात. परमेश्वर आपल्या हृदयात आहे, आपल्याजवळ आहे ही अनुभूती आली की माणूस कोणत्याही संकटांना सहजपणे तोंड देऊ शकतो.
स्वसंवाद ::
१) मी खरोखरच परमेश्वराला अंतिम आधार मानतो का ? की पैसा, मित्र नातेवाईक हेच अंतिम प्रसंगी उपयोगी पडतील असे मला वाटते ?
२) संकटसमयी देवावरील माझा विश्वास डळमळतो का की अधिक दृढ होतो?
३) “राम दासाभिमानी आहे” या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे का ?
४) मी परमेश्वराला केवळ सुखात आठवतो की दुःखातही त्याच्यावर भार टाकतो ? (क्रमशः)
– क्रमशः श्लोक २७ आणि २८.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







