श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०७ आणि १०८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. १०७ – –
मना कोप आरोपणा ते नसावी ।
मना बुधि हे साधुसंगी वसावी ।
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी ।
मना होई रे मोक्षमार्गी विभागी ।।१०७।।
अर्थ : हे मना, क्रोधाला आपल्यावर स्वार होऊ देऊ नकोस. आपल्या बुद्धीचा वापर साधुसंतांच्या सहवासात राहण्यासाठी कर. हे मना, दुष्ट किंवा वाईट लोकांच्या संगतीचा त्याग कर. (आणि अशा रीतीने) मोक्षमार्गाचा वाटेकरी हो.
(कोप – क्रोध/राग, आरोपणा – आरोहण करणे /स्वार होणे, नष्ट – दुष्ट /वाईट, चांडाळ – कर्माने किंवा वागणुकीने नीच मनुष्य, विभागी – वाटेकरी)
विवेचन : साधकासाठी अत्यंत महत्वाचा उपदेश समर्थांनी या श्लोकात केलेला आपल्याला आढळतो. व्यवहारात आणि परमार्थात क्रोध अपार हानी करतो. ज्याला आपल्या क्रोधावर ताबा ठेवता आला, त्याला आपल्या मनावर ताबा ठेवता आला असे म्हणायला हरकत नाही. व्यावहारिक जीवनात क्वचित प्रसंगी क्रोध येणेही जरूर असते. पण त्याला आपल्या डोक्यावर किती स्वार होऊ द्यायचे हे आपल्याला ठरवता आले पाहिजे. साधकाने तर क्रोधरहित व्हायला शिकले पाहिजे. कारण अति क्रोधामुळे सर्वनाश होऊ शकतो. क्रोधाचा भर ओसरल्यावर होणाऱ्या पश्चातापाचा मग काही उपयोग होत नाही.
त्यासाठी समर्थ म्हणतात की आपली बुद्धी साधुसंगी वसावी. म्हणजे संत किंवा सज्जन व्यक्तींच्या सहवासात आपण राहिले पाहिजे. आपण कोणाचा संग करतो त्यावरही आपले चारित्र्य अवलंबून असते. ” Man is known by the company he keeps. ” अशी एक इंग्रजी म्हण आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात सज्जनांचा संग करा. सज्जनांच्या किंवा सद्गुरूंच्या सहवासात केवळ देहाने असता उपयोगी नाही. मनाने आणि बुद्धीने देखील त्यांच्या सोबत राहायला हवे. बऱ्याच वेळा थोर पुरुषांच्या सहवासात आलेले त्यांचे नातेवाईक किंवा अनुयायी त्यांची शिकवण न घेता, त्यांचा फायदा आपल्या प्रपंचासाठी करून घेतात. स्वामी समर्थांच्या चरित्रात त्यांचे भक्त म्हणवणाऱ्या अशा अनेक ढोंगी व्यक्तींची उदाहरणे आपल्याला वाचायला मिळतात. तेव्हा संतांच्या सहवासात मनाने आणि बुद्धीने त्यांचेच होऊन जावे.
मोरोपंत सुद्धा ” सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो ” असे म्हणतात. तर तुकाराम महाराजांनी ” न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, ” असे म्हटले आहे. थोडक्यात संतांचा सहवास हा परीस स्पर्श असतो. तो एकदा झाला की आपल्यातील अहंकार, कर्तेपणा, मी पणा गळून पडतो. क्रोधाची जी सामुग्री असते तीच त्यांच्या सहवासात नष्ट होते. प्रत्यक्ष संतांचा सहवास जरी नाही मिळाला तरी आजच्या काळात त्यांच्या ग्रंथांचे वाचन आणि त्यात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे मनापासून पालन करणे हा देखील संतांचा सहवासच आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा यासारख्या कुठल्यातरी एका ग्रंथाचे नियमितपणे वाचन करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांच्या सहवासात राहण्यासारखेच आहे असे म्हणता येईल.
दुष्ट किंवा वाईट व्यक्तींची संगत असेल तर ती जाणीवपूर्वक सोडायला हवी. त्यांच्या सहवासात त्यांचे गुण (खरे म्हणजे दुर्गुण) आपल्यालाही लागण्याची शक्यता असते. वाईटाचे, खोट्या गोष्टींचे समर्थन करण्यात मग आपल्यालाही काही वावगे वाटत नाही. ज्यांचे कर्म अत्यंत दुष्टपणाचे असते, समाजाच्या दृष्टीने घातक असते, अशा व्यक्तींसाठी समर्थांनी ‘ चांडाळ ‘ असा शब्द वापरला आहे. ज्यांना मोक्षमार्गावर वाटचाल करायची आहे, त्यांनी तर अशा व्यक्तींचा सहवास कटाक्षाने टाळायला हवा. संतांच्या सहवासात वावरताना मनाने आणि बुद्धिनेही त्यांचे आचरण आत्मसात करून त्यांच्याशी एकरूप व्हावे. क्रोधाचा जाणीवपूर्वक त्याग करावा. अशा रीतीने आपण मोक्षमार्गाचे वाटेकरी व्हावे अशी समर्थांची इच्छा आहे.
स्वसंवाद
१. माझ्या मनात येणाऱ्या क्रोधाला मी माझ्या बुद्धीवर आणि नातेसंबंधांवर स्वार होऊ देतो का? राग शांत झाल्यावर मला पश्चात्ताप होतो का?
२. संतांच्या किंवा सज्जन विचारांच्या सहवासात असताना, मी केवळ माझ्या सांसारिक ‘स्वार्थाचा’ विचार करतो, की माझ्या अंतःकरणाचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यांचे विचार बुद्धीने आत्मसात करतो?
३. मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे, “सुसंगती सदा घडो, ” हे माहीत असूनही मी माझ्या दैनंदिन व्यवहारात केवळ स्वार्थासाठी वाईट किंवा नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांची संगत बाळगतो का?
४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, संसाराच्या विवंचनेतून बाहेर पडून अंतरीची शांती मिळवण्यासाठी मी या ‘मोक्षमार्गाचा’ वाटेकरी (विभागी) होण्यास तयार आहे का?
=====
श्लोक क्र. १०८ – –
सदा सर्वदा सज्जनाचेनि योगे ।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ।
क्रियेवीण वाचाळता ते निवारी ।
तुटे वाद संवाद तो हितकारी ।।१०८।।
अर्थ : हे मना, सज्जनांच्या संगतीत राहिल्यामुळे आपल्या वागण्यात बदल घडतो. भगवंताच्या भक्तीबद्दल प्रेम निर्माण होते. एखादी गोष्ट स्वतः आचरण केल्याशिवाय त्याबद्दल बोलू नये. चर्चेतून जेव्हा एखाद्या शंकेचे निरसन होते, तेव्हा ती चर्चा परमार्थाला हितकारक ठरते.
(वाचाळता – व्यर्थ बडबड (करणे), वाद संवाद – साधकबाधक चर्चा, तुटणे – निकालात निघणे/संपुष्टात येणे)
विवेचन : मागील श्लोकाप्रमाणे या श्लोकातही समर्थांनी सज्जन संगतीचा महिमा सांगितला आहे. इथे सज्जन म्हणजे साधुसंत असाच अर्थ समर्थांना अपेक्षित आहे. कारण आपल्या वागणुकीतील जो बदल समर्थांना अपेक्षित आहे, तो साधुसंतांच्या संगतीतच होऊ शकतो. संतसंगतीचा महिमा अपार आहे. ‘ आपल्यासारखे करती तात्काळ, नाही काळवेळ तयालागी ‘ असे संतांबद्दल म्हटले जाते. संत म्हणजे परीस आहेत. त्यांच्या संगतीत राहिलो की ते आपल्याला त्यांच्यासारखेच करून टाकतात. वृत्तीत अंतर्बाह्य पालट होतो. पण त्यांच्या संगतीत केवळ देहाने राहून उपयोगी नाही. मनाने आणि बुद्धीने देखील त्यांचेच होऊन राहावे. त्यांच्याशी एकरूप व्हावे. असे झाले म्हणजे आपल्याही वागणुकीत बदल घडतो. आपल्या मनात ईश्वरभक्ती निर्माण होते. ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होते. देवाच्या अस्तित्वाबद्दल मनात जी शंका असते, ती नाहीशी होते. रामकृष्ण परमहंसाच्या सहवासात येण्याआधी स्वामी विवेकानंदांच्या मनात परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका होती. पण रामकृष्ण परमहंसाच्या सहवासात येताच ती दूर तर झालीच पण त्यांच्या वृत्तीतही अंतर्बाह्य पालट झाला. अशा प्रकारे जेव्हा बुद्धी संतांच्या चरणी स्थिर होते, तेव्हाच अपेक्षित आणि आश्चर्यकारक असे आंतरिक परिवर्तन घडून येते.
आज खरे साधुसंत कोणाला म्हणावे असा प्रश्न आपल्याला पडतो. भोंदूबाबांचा बाजार भरला आहे. पण ज्यांच्या सहवासात आपल्याला शांती आणि समाधान मिळते आणि आपली ऐहिक सुखाची ओढ कमी होऊन परमार्थाकडे मनाची प्रवृत्ती होते अशा व्यक्तींना संत, सज्जन किंवा साधू म्हणायला हरकत नाही.
संतांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अंतरात शांती आणि समाधान वास करीत असते. त्यामुळे व्यर्थ बडबड करून ते आपली शक्ती वाया घालवत नाहीत. ते अत्यंत मोजके आणि हिताचे बोलतात. त्यामुळेच त्यांच्या सहवासात आपल्यामध्ये बदल घडून येतो. ‘ बोले तैसा चाले ‘ या उक्तीचे ते मूर्तिमंत उदाहरण असतात. आपण सामान्य माणसे किंवा ज्यांना आपल्या ज्ञानाचा अहंकार झाला आहे अशी माणसे आपले ज्ञान दाखवण्यासाठी बाष्कळ बडबड करतात. पण त्याप्रमाणे त्यांचे आचरण नसल्याने लोकांना त्यांचे बोलणे ऐकताना कंटाळा येतो. म्हणूनच समर्थ म्हणतात, ” आचारल्याविण बोलू नये. ” ” क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे “ही उक्ती आपल्याला माहिती आहे. संत सोहिरोबा म्हणतात, ” अनुभवाविण मान डोलवू नको रे. ” सर्व संतांच्या सांगण्यात आणि शिकवणुकीत एकवाक्यता आहे.
श्लोक क्रमांक १०८ ते ११५ या श्लोकांची रचना एक विशेष दृष्टिकोन ठेवून समर्थांनी केली आहे असे वाटते. कारण हे श्लोक वाद आणि संवाद, किंवा चर्चा आणि निरर्थक वाद याबद्दल आपल्याला विशेष मार्गदर्शन करतात. चर्चा किंवा वाद-संवाद आपल्या मनातील शंका दूर करण्यासाठी असावा. वादासाठी वाद घालू नये. साधुसंतांच्या संगतीत चर्चेतून आपल्या ज्या शंका दूर होतात, त्या आपल्याला परमार्थ मार्गावर पुढे वाटचाल करण्यासाठी हितकारक ठरतात. अर्थात त्यांच्याकडून ज्या शंकांचे निरसन करून घ्यावयाचे त्या शंका परमार्थासंबंधी असाव्यात. कोणतीही शंका मनात ठेवून ईश्वरभक्ती करू नये. त्या शंकांचे निरसन अधिकारी व्यक्तींकडून किंवा गुरूंकडून करून घ्यावे. एकदा का मनातील शंका दूर झाल्या की निःशंक मनाने आपण हरिभक्ती करू शकतो.
स्वसंवाद
१. मी संतांचे विचार किंवा धार्मिक ग्रंथ केवळ माझे ज्ञान वाढावे म्हणून वाचतो, की त्यामुळे माझ्या वागण्यात बदल घडून यावा या हेतूने वाचतो?
२. संत सोहिरोबांनी म्हटले आहे, “अनुभवाविण मान डोलवू नको रे”, मी उगीचच मला सर्व कळते म्हणून मान डोलावतो की नामस्मरणाचा स्वतः अनुभव घेऊन माझी भक्ती दृढ करतो?
३. माझ्या रोजच्या बोलण्यात किंवा समाजमाध्यमांवरील चर्चेत मी केवळ माझा अहंकार शमवण्यासाठी ‘व्यर्थ वाद’ घालत बसतो, की शंकांचे निरसन करणारा ‘हितकारी संवाद’ साधतो?
४. तुकाराम महाराजांच्या सूत्राप्रमाणे, जर ‘बोले तैसा चाले’ हेच साधुत्वाचे खरे लक्षण असेल, तर माझे स्वतःचे जगणे माझ्याच बोलण्याशी किती प्रामाणिक आहे?
– क्रमशः श्लोक १०७ आणि १०८
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






