प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ “चर्चा…” – लेखक : डॉ. प्रज्ञावंत देवळणकर ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆
☆
जपानमधील एका छोटेखानी खेडेगावात नदीवर एक जुना पूल होता. पावसाळ्यात नदीला पूर आला की पूल धोकादायक व्हायचा. गावातल्या लोकांची त्यावरून रोज ये-जा असल्यामुळं ग्रामसभेत एके दिवशी पुलावर चर्चा सुरू झाली..
पहिला माणूस उठला, ”हा पूल धोकादायकंय ताबडतोब पाडून नवीन पूल बांधायला हवा. ”
दुसरा लगेच म्हणाला, ”पाडायची काय गरज आहे? माझे वडील चाळीस वर्षे या पुलावरून गेले. त्यांना कधी काही झालं नाही. ”
तिसरा म्हणाला, ”माझा काका अभियंता आहे, तो म्हणतो की या पुलाचं बांधकामच चुकीचं आहे. ”
चौथा म्हणाला, ”तुम्ही नवीन पूल बांधण्याची भाषा करताय म्हणजे जुन्या पुलाच्या ठेकेदाराच्या विरोधात आहात.. ”
पाचवा चिडून म्हणाला, ”नाहीऽऽ तुम्ही नवीन पूल बांधण्याच्या बाजूनं आहात म्हणजे तुम्हाला सरकारचा पैसा खर्च करायचा आहे.. ”
आता चर्चा पुलावरून सरळ राजकारणावर गेली. कुणी जुन्या पुलाचे फोटो दाखवू लागले. कुणी दुसऱ्या गावातल्या पुलाची गोष्ट सांगू लागलं..
कुणी म्हणालं, माझ्या मामाच्या गावात असाच पूल होता…”
कुणी म्हणालं, ”मी अश्या पुलाचा एक रिल बघितला त्यात तो पडला.. ”
आणि एका तासानं ग्रामसभा संपली. पुलाबद्दल मात्र एकही नवीन गोष्ट कुणाला कळली नव्हती..
दुसऱ्या दिवशी गावात एक वृद्ध झेन साधू आला. लोकांनी त्याला सगळा प्रकार सांगितला. तो काहीच बोलला नाही.
फक्त सगळ्यांना घेऊन नदीकाठी गेला. पुलासमोर उभा राहिला. त्यानं पुलाच्या एका खांबावर हात ठेवला मग नदीच्या पाण्याकडं पाहिलं आणि म्हणाला, ”काल तुम्ही पुलावर चर्चा केलीत? ”
“हो. ”
“पूल किती जुना आहे? ”
“साठ वर्षांचा. ”
“त्याची रचना कोणी केली? ”
“माहित नाही. ”
“तो सध्या किती वजन सहन करू शकतो? ”
सगळे शांत.
“पूर आला की त्याच्यावर किती ताण येतो? ”
शांत.
“खांबाची सध्याची अवस्था काय आहे? ”
शांत.
“पूल दुरुस्त करता येईल का? ”
शांत.
“नवीन पूल बांधला तर त्याची किंमत किती? ”
शांत.
वृद्ध साधू हसला..
“म्हणजे काल तुम्ही पुलावर चर्चा केली नाही.
तुम्ही पुलाभोवती असलेल्या तुमच्या मतांवर चर्चा केलीत. ”
गावकरी एकमेकांकडं पाहू लागले..
तो पुढं म्हणाला, ”एकाला स्वतःचा अनुभव होता-दुसऱ्याला वडिलांचा अनुभव-तिसऱ्याला ऐकीव माहिती-चौथ्याला संशय-पाचव्याला भावना.. सगळ्यांकडं काही ना काही होतं पण पुलाबद्दल आवश्यक माहिती कुणाकडंच नव्हती तरी प्रत्येकाला निष्कर्ष मात्र पक्का होता. ”
थोडा वेळ थांबून तो म्हणाला, ”माणसाची एक गंमतंय त्याला एखाद्या विषयाबद्दल ऐकिव-ढोबळ-पसरट-मोघम माहिती नसली तरी तो त्यावर ठाम मत बनवू शकतो-मत बनलं की त्याचं रक्षण करण्यासाठी तो आठवणी शोधतो-आठवणी कमी पडल्या की किस्से शोधतो-किस्से कमी पडले की भावना आणतो आणि तरी समोरचा प्रश्न विचारत राहिला तर शेवटी त्याच्यावरच आरोप करतो, ”तू त्याच्या विरोधात आहेस! ”
गावात शांतता पसरली. साधूनं पुलाकडं बोट दाखवलं.
“समजा मी म्हणालो हा पूल पाडू नका याचा अर्थ मी या पुलाचा समर्थक झालो का? ”
“नाही. ”
“आणि मी म्हणालो, ”हा पूल पाडून नवीन बांधा. ” याचा अर्थ जुन्या पुलाच्या विरोधात माझी वैयक्तिक वैरभावना आहे का? ”
“नाही. ”
“मग? ”
साधू म्हणाला, ”मग कदाचित मी फक्त पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न विचारत असेन. ”
प्रत्येक प्रश्नाला एखाद्या व्यक्तीची बाजू लावण्याची गरज नसते. प्रत्येक वेगळ्या मतामागं एखादा शत्रू असतोच असं नाही आणि प्रत्येक मधला विचार म्हणजे भित्रेपणा नसतो. ”
तो हसला..
“कधी कधी सत्य दोन टोकांच्या मध्ये उभं असतं आणि दुर्दैवानं “दोन्ही टोकांना त्याचं अस्तित्व सहन होत नाही. ”
आपल्याकडंही चर्चेची हीच गंमत आहे.. अर्धवट माहिती + जूजबी आकलन + तोकडा अनुभव + ऐकीव किस्सा + पसरट आकलन+भावनिक तडका = ठाम मत..
आणि मग त्या ठाम मताभोवती आपण इतकी कुंपणं घालतो की नवीन माहिती आत येण्याचा रस्ताच बंद होतो..
कुणी ‘वेगळा’ मुद्दा मांडला की आपण मुद्दा समजून घेण्याआधी त्याची भूमिका शोधतो..
“तू कुणाच्या बाजूनं.. ”
“तू कुणाच्या विरोधात? ”
“९९% लोक भ्रष्ट आहेत..? ”
“माझ्या मित्रानं सांगितलं..? ”
“माझ्या ओळखीच्या माणसाबरोबर असंच झालं होतं.. ”
आणि मूळ प्रश्न? तो तोपर्यंत कुठंतरी नदीत वाहून गेलेला असतो..
चर्चा संपते पण कुणी शिकलेलं नसतं. दुसऱ्या दिवशी नवीन विषय मिळतो. नवा विषय-नवी पोस्ट-नवा व्हिडिओ-नवा वाद-नवीन मंडळी पण पद्धत तीच..
माहिती कमी, आत्मविश्वास जास्त. समज कमी, प्रतिक्रिया जास्त. ऐकणं कमी, ठरवणं जास्त.
म्हणून कदाचित आपल्याला काय विचार करायचं यापेक्षा आधी कसं ‘चर्चा’ करायची याचं प्रशिक्षण हवंय..
समोरच्याचं मत मान्य करणं म्हणजे पराभव नाही.
त्याचा मुद्दा समजून घेणं म्हणजे त्याची बाजू घेणं नाही.
प्रश्न विचारणं म्हणजे विरोध करणं नाही आणि, ”मला माहीत नाही” म्हणणं म्हणजे अज्ञानाची कबुली नाही; ती ज्ञानाकडं जाण्याची पहिली पायरी आहे. ”
खरी चर्चा तिथं सुरू होते जिथं आपण म्हणतो, ”थांबा.. तुमचा मुद्दा मला अजून पटलेला नाही पण आधी तो नीट समजून घेऊया. ” कारण चर्चेचा उद्देश ‘कोण जिंकलं? ’हा असेल तर दोघेही काहीतरी गमावतात पण उद्देश “आपल्याला कालपेक्षा आज काहीतरी अधिक समजलं का? ” हा असेल तर कदाचित त्या चर्चेतून ‘समाज’ शिकतो नाहीतर आपण आयुष्यभर पुलावर चर्चा करत राहू आणि नदी कुठंय हेच विसरून जाऊ!
☆
लेखक : डॉ. प्रज्ञावंत देवळणकर
प्रस्तुती : प्रभा हर्षे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






