डॉ. नेहा भटकर

? मनमंजुषेतून ?

☆ नामानिराळे गाव… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधायच नाही अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. नावात काय आहे, असं कोणे एके काळी जगद्विख्यात नाटककार शेक्सपियरने म्हटलेलं पण म्हणून काही नामकरणाचा सोहळा, मग नवजात शिशुचा असेल किंवा एखाद्या वस्तीचा, प्रतिष्ठानचा वा उत्पादनाचाही असेल; याचे महत्व जराही कमी झालेलं दिसत नाही, उलट ते दिवसेंदिवस वाढतेच आहे. अतिविशिष्ट आणि सोबतच अत्यंत विरळा नाव शोधण्याची केवढी ती धडपड आणि चढाओढही कायमच दिसते. त्यासाठी जगभरातील भाषांचा धांडोळा घेण्याची भारीच मोठी उठाठेव आणि कित्येकदा तर “नाव शोधून द्या वा सुचवा” अशा स्पर्धांच आयोजन आणि तद्नुषंगाने बक्षिसिपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेमुळे म्हणे फार मोठी आर्थिक उलाढाल सुद्धा होत असते. इतकेच नव्हे तर सबंध जगभरात कधी या कारणाने तर कधी त्या कारणाने नामांतरेही चालूच असतात. हे सर्व बघू जाता, नामकरण व नामांतराचे वेगवेगळे संदर्भ लक्षात घेता नावातच सर्व काही सामावलेलं आहे की काय, असाही विचार मनाला चाटून जातो; नव्हे आपला सभोवताल याची जाणीव आपल्याला ठाई ठाई करून देत असतो. नवीन नाव, म्हणजे आधीचे बदलून मिळालेलं दुसरं नाव कधी अंगवळणी पडतं तर कधी ते केवळ कागदोपत्री अक्षर रूपातच रहातं. त्या अक्षर समूहांचा ध्वनी फार क्वचितच अगदी विशेष प्रसंगीच निनादतो. हो पण तरीही कित्येकदा आई वडील व हौशी नातेवाईकांनी कितीही हौसेने दिलेली नावं ती तशीच्या तशी वापरात असतील हे काही सांगता यायचे नाही. असाही अनुभव सर्वत्र येत असतो. जसे की आधी बेबी, बंडू, बाळू नंतर बाली, बाल्या, पिंकी, पिंट्या, रिंकी, चिंकी गुड्डू वगैरे वगैरे आणि सोबत जोडीला ताई, माई, अक्का होत्या ह्या तर कायम आहेतच. या घरी वापरातल्या नावामुळे किंवा टोपण नावामुळे पाळण्यातली खरी नावं आपली कागदावरच समाधान मानतात. यामुळे अलीकडे गुड्डी आजी किंवा पिंकी आत्या वा मावशी अशी संबोधनं ऐकायला यायला लागलीत. अरे हो प्रकरण जरा गंभीर होत चाललंय पण मला ज्या गावाबद्दल आणि तेथील नामाभिदानाबद्दल सांगायचंय ते फारसं गहन प्रकरण नाही. तर आपण आता तिकडेच वळू या. डोंगरगावामध्ये खरोखरीच कोणाचं अगदी खरं खरं नाव काय आहे याचा शोध आणि बोध व्हायला जरा बऱ्यापैकी मेहनत घ्यायला लागायची. त्याचं व्हायचं असं की अगदी वर्षानुवर्षे त्या व्यक्तीला अख्खा गाव एका कुठल्यातरी नावाने संबोधायचा आणि एखाद्या वेळी अचानक त्यांचं खरं नाव सापडायचं आणि हे असं कितीतरीदा व्हायचं व आश्वर्याचा धक्का बसायचा आणि सोबत मनोरंजनही व्हायचं. त्यापैकी या लेखाच्या निमित्ताने नावांशी निगडित जंत्रीतील काही निवडक आठवणींना जागवण्याचा मोह आवरणे कठीणच.

शाळेच्या व्यवस्थापनावर पदाधिकारी असलेले रामभाऊ पाटील शाळेमध्ये १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला होणाऱ्या झेंडावंदनाला हजर असायचे आणि बऱ्याचदा त्यांच्याही हस्ते झेंडावंदन व्हायचं. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख हा व्हायचाच, तोही रामभाऊ पाटील म्हणूनच. सर्वत्र गावभर रामभाऊ या नावाने ओळख असलेले रामभाऊ पाटील मुळात रामभाऊ नव्हतेच मुळी आणि हे कळण्याचं तसं काही प्रयोजनही नव्हतं. रामभाऊ पाटील हे संबोधन त्यांना कधीही आणि कुठेही ओळखायला पुरेसं होतं. त्याचं झालं असं की, शाळेमध्ये माझ्यापेक्षा एक इयत्ता पुढे असणारी त्यांची प्रभा नामक कन्या, त्या काळातील पद्धतीनुसार, जेव्हा मला विचारायला आली की “तुला माझी मागील वर्षीची पुस्तक हवीत का? ” आणि मी जेव्हा तिला हो म्हणून सांगितलं तेव्हा तिने तिचा आदल्या वर्षीचा पुस्तकांचा गठ्ठा सरळ माझ्या घरी आणला मग मी आणि ती आम्ही दोघी मिळून एकेका पुस्तकाची अवस्था बघत पाऊण, अर्धी किंवा पाव किंमत असे मूल्यमापन करत, एकदाची तिने सगळी पुस्तकं माझ्या हवाली केली आणि मी ठरलेल्या हिशोबानुसार पैसे. जेव्हा त्या पुस्तकांकडे कव्हर लावण्यासाठी म्हणून मी बारकाईने बघितलं तेव्हा त्या पुस्तकांवर लिहिलेलं तिचं पूर्ण नाव वाचण्यात आलं आणि कळलं की तिच्या वडिलांना आपण रामभाऊ पाटील म्हणून ओळखतो पण ते विनायकराव पाटील आहेत. नंतर इतरही पुस्तकांवर तिच्या नावाची अद्याक्षरे पी. आर. पाटील ऐवजी पी. व्ही. पाटील अशी होती आणि मग खात्री पटली की रामभाऊ नव्हे विनायकरावच.

 एकदा माझी एक मैत्रीण, ही माझ्याच वर्गातली, घरी आली असताना वडिलांनी सहज विचारलं “ही कोणाची मुलगी? ” मी पण बेधडकपणे, लहानपणच ते, सांगून टाकलं “आप्पा, ही ठोके तात्यांची”. वडिलांच्या झाला प्रकार लगेच लक्षात आला आणि म्हणाले “असं असं, तात्या बापूंची का? ” ठोके तात्या हे नाव गावभर इतकं प्रचलित होतं की आपण काही चूक करतोय याचा जराही अंदाज त्या निरागस बालपणात येणं कठीणच होतं. तसे गावात तात्या खूप होते त्यामुळे तात्या या नावासमोर वेगवेगळ्या गावकऱ्यांनी नेमकी ओळख पटण्यासाठी विशेष उपाध्या लावल्यास त्यात नवल ते काय. जसे तात्या दांडके, तात्या ढोरे, तात्या मातीखाये इत्यादी. यातील दांडके, ढोरे, मातीखाये ही त्यांची आडनाव नव्हेत तर ती तात्या मंडळींची विशेष नावे होत. हीच स्थिती गावामध्ये असलेल्या सहा ते सात अण्णा नावाच्या लोकांची होती.

अशातच नेमकं कोणाचं काय नाव असावं याच्या संपूर्ण अज्ञानामुळे एकदा अत्यंत गोंधळून टाकणारा प्रसंग उद्भवल्याचे सुद्धा मला संपूर्ण ज्ञात आहे. त्याचं झालं असं की कुठल्याशा कार्यक्रमाचं बोलावू करायचं होतं त्यामुळे गावभर फिरणे व घरोघरी जाऊन रीतसर निमंत्रण देणे हे सगळं सुरळीत चालू होतं पण निमंत्रणांच्या यादीतील एक घर नेमकं कुठे आहे ते काही केल्या कळेना, हे अनाभिज्ञपणे खुद्द त्या घरी जाऊनच विचारलं. “काकू मला पिस्तुल्यांकडे निमंत्रण द्यायचं आहे तर ते घर इकडे कुणीकडे आहे जरा सांगता का? ” तर काकू म्हणतात कशा “हो का, तू जे घर विचारतेस ते हेच आहे फक्त हे शिंद्यांच घर आहे” मी घुटमळत म्हणाले पण काकू मला तर पिस्तुल्यांकडे निमंत्रण द्यायचं आहे. काकू तितक्याच शांतपणे आणि स्मित हास्य करत मला म्हणाल्या “बाळ शिदयांनाच गावभर पिस्तुले म्हणतात. ” पिस्तुले काकूंनी त्यांच्या तोंडाच्या पिस्तुलीने माझ्यावर शब्दांच्या गोळ्या न जाता झाडता उलट दिलदारपणे मला माफ केलं मात्र इतक्या गोड लोकांना गावकरी पिस्तुले का म्हणतात हे काही मला कळेना.

बरेचदा नावापायी तारांबळ उडवणारा प्रसंग शाळेमध्ये उद्भवत असे. त्याचं व्हायचं असं की शाळेतील वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने शाळेच्या कार्यकारी परिषदेवर आणि पंचक्रोशीतील राजकारणामध्ये अग्रेसर असलेले कृष्णराव उपाख्य दादासाहेब बढे प्रमुख पाहुणे म्हणून यायचे. पण कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि कधी कधी नवख्या शिक्षकांची सुद्धा ऐनवेळी भंबेरी उडायची कारण आमचे प्रमुख पाहुणे कागदोपत्री सदाशिवराव बढे होते. शाळेच्या सूचना फलकावर सुद्धा त्यांचा नामोल्लेख “आजचे प्रमुख पाहुणे सदाशिवराव उपाख्य दादासाहेब बढे” असा अगदी स्पष्टपणे असायचा तरीही प्रचलित नाव काही तोंडातून मागे सरायला तयार होई ना. हरी आणि हर या दोन्ही देवतांना यांच्या नावासाठी स्वतंत्रपणे का बरे पाचारण केलंय; या प्रश्नाचं उत्तर सापडलं खरं पण तेव्हा मी कधीचीच शाळा सोडून महाविद्यालयीन शिक्षणासाठी दुसरीकडे गेलेले होते. दादासाहेबांचे दत्तक विधान बऱ्याच प्रौढ वयामध्ये अगदी त्यांच्या लग्नानंतर झालेलं, त्यामुळे अवघा परिसर त्यांना सवयीनुसार कृष्णराव या आधीच्या नावानेच ओळखत असे. दत्तक नाव केवळ कागदोपत्री किंवा सभासमारंभात पुरतच मर्यादित राहिलं होतं. गावामध्ये दत्तक विधानामुळे झालेले नावांचे असे मामले पुष्कळच होते हे फार नंतर कळले.

गावात दोन वाडे होते. दोन्ही वाड्यांची नाव ती तशी का आहेत हे कळायला काही मार्ग नव्हता. आठवड्या पंधरा दिवसातून धान्यादि जीनसांचे निवडण, टिपण, वाळवण आणि इतरही घरातील अनेक छोटोमोठी कामे करायला येणारी नेहमीची आमची कांताबाई एखादेवेळी बरेच दिवसानंतर उगवली की आई तिला विचारायची इतके दिवस आली नाहीस ते. या प्रश्नाला तिचं हमखास पण विचित्र उत्तर असायचं की, मांडव्यांच्या वाड्यात किंवा महितरावच्या वाड्यामध्ये जास्तीचं काम निघाल्याच. या तथाकथित मांडव्यांच्या वाड्यातील एकूण चाळीस एक लोकांपैकी एकाही बाई किंवा माणसाचे आडनाव मांडवे नव्हते तसेच महिपतरावांच्या वाड्यात देखील कोणी महिपतराव रहात नसत. गावाची नामाभिदानाची तऱ्हा जरा न्यारीच, दुसरे काय.

 गावातील मोठे जमीनदार असलेले अण्णाजी पाटील यांच्या तीनही, शाळकरी वयाच्या मुलांची पाळण्यातील नावेच मुळी दादासाहेब, भाऊसाहेब आणि भैय्यासाहेब होती. यांच्या नावांचे वैशिष्ट्य असे की पर्यायी कुठलेही नाव त्यांच्यासाठी नव्हते. त्यामुळे त्यांचा नामोउल्लेख सर्वत्र अगदी शाळेच्या वर्गात, खेळाच्या मैदानात दादासाहेब भाऊसाहेब आणि भैय्यासाहेब असाच व्हायचा. कधी कधी तर त्यांना या अवजड नावांमुळे फारच अवघडल्यासारखं वाटायचं हे स्पष्टपणे जाणवायचं. पुढे त्या तिघांनीही स्वतःची नाव दादा, भाऊ आणि भैय्या अशीच सांगायला सुरुवात केल्याचं कुठूनसं कानी आलं.

 शाळेत दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म भरायचे होते तेव्हा सरांनी आम्हा सर्वांना अगदी निक्षून सांगितले की फॉर्ममध्ये प्रत्येकाने आपले स्वतःचे खरे नाव लिहायचे. घरी भलेही तुम्हाला कुठल्याही नावाने हाक मारत असतील किंवा शेजारी आणखी वेगळ्या नावाने ओळखत असतील तरी ते लिहायचं नाही. सरांनी इतक्या स्पष्टपणे सूचना दिल्यावरही, ते स्वतः आमचा हजेरीपट घेऊनच बसले आणि प्रत्येकाला क्रमाक्रमाने हजेरीपटातील त्याचे वा तिचे नाव सांगत आणि लिहायला लावीत. हे करत असताना बऱ्याच जणांची नेहमीच्या प्रचलित नावापेक्षा जरा वेगळी नावे सापडलीत. जसे राजूचे राजेंद्र किंवा राजकुमार, नंदूचे नंदकुमार किंवा नंदकिशोर वा जयाचे जयश्री, नलूचे नलीनी. या प्रकारातील भारीच गंमत तर आम्हाला तेव्हा वाटली जेव्हा आमची एक वर्गमैत्रीण वर्गात अगदी सातत्याने माझ्या बाजूला बसणारी, जिला आम्ही नेहमीच बेबी म्हणून हाक मारायचो, ती तिच्या वह्यापुस्तकांवरती बेबी असंच नाव लिहायची मात्र आमची ही बेबी शाळेतील हजेरीपटात बॉबी होती. त्या अडनिड्या वयात हे ऐकून आम्ही सगळे अगदी उडालोच आणि बेबी तर लाजून चूर झाली. आश्चर्य, हास्याचे फवारे आणि मनोरंजन हे सगळं एकाच वेळी अनुभवलं. त्याच सुमारास राज कपूर निर्मित व ॠषी कपूर आणि डिंपल अभिनीत धमाकेदार बॉबी आपले नाव जिकडे तिकडे गाजवत होता. अर्थात ही खमंग किनार त्या नवलाईच्या गंमतीशीर प्रसंगाला लाभली हे सांगणे न लगे. एरवी परीक्षा फार्म वगैरे भरणे असल्या क्लिष्ट आणि किचकट प्रकरणात असले हलकेफुलके प्रसंग अगदी नसल्यासारखेच.

कोणे एके काळी झाडीपट्टीतील बरेच स्थलांतरीत लोक जुन्या वऱ्हाड विभागात वस्तीला आलेत. त्यापैकी बरीच कुटूंबे डोंगरगावातही रहायची. त्यांचा गावाच्या टोकाशी एक भला मोठा स्वतंत्र वेटाळ होता. पन्नास एक उंबऱ्यांच्या या वस्तीतील मात्र एकाच घराला झाडीवाल्याचं घर म्हणून संबोधायचं व इतरांसाठी मात्र त्यांचे प्रथम नाव वा आडनाव वापरायचे, हा अलिखित नियम सर्वमान्य होता. त्यामुळे नेमक्या तेवढ्या एका झाडीवाल्यांच्या उंबऱ्याच्या आत राहणाऱ्या समस्तजनांचे आडनाव ठाऊक असण्याचे काही कारणच नव्हते. त्याकाळी म्हणजे साठच्या दशकातील आम्हा बालकांना, या लोकांच्या तोंडून गोंदिया, तुमसर, नागभीड ही झाडीपट्टीतील त्यांच्या नातेवाईकांच्या गावांची नावे ऐकताना फार नवल वाटायचं. थोडं विषयांतर होईल, पण अगदी मनापासून सांगावसं वाटतं; ही अत्यंत कष्टाळू मंडळी वऱ्हाडात येऊन काही पिढ्या तर नक्कीच होऊन गेल्या असतील आणि ते वऱ्हाडच्या माती आणि माणसांशी अगदी समरसून गेलेले पण तरीही त्यांच्या वागण्या बोलण्यात झाडीपट्टीची लक्षणीय ढब अमिट होती.

 आणखी एका घराची तर वेगळीच कथा. इथे घरातील केवळ मुख्य माणसाच्या नावाचा उल्लेख करून चालत नसे तर त्यासोबत त्यांच्या दिवंगत वडिलांच्या नावाचाही उल्लेख करावा लागायचा तेव्हा कुठे नेमकेपणाने त्यांची ओळख पटायची. त्यामुळे त्यांचा नामोल्लेख सदैव भाष्करराव सहदेवराव असाच व्हायचा अर्थातच भाष्करराव ते स्वतः आणि सहदेवराव त्यांचे दिवंगत पिताजी. बरे भाष्करराव हे नाव असलेले त्यांच्या वेटाळातीलच काय तर दूर दूरपर्यंत ते एकमेव, म्हणजे नामसाधर्म्यामुळे होणाऱ्या गोंधळाची तीळमात्र शक्यता नसताना ही दुहेरी नावाची कसरत का? हे काही कळेना.

असा हा गोंधळून टाकणारा, तर कधी बुचकाळ्यात टाकून एक प्रकारचे कोडे होऊन समोर येणारा, पण वैविध्यपूर्ण व मनोरंजक एक निराळा नाम महिमा आठवताना, डोंगरगावाचे नामकरण केवळ आपल्या मनोमनी नामनिराळे गाव असे करून आपण मात्र नामानिराळे व्हावे, असं आपलं एखाद्या खट्याळ क्षणी उगाचंच वाटून जातं.

 ┉❀꧁꧂❀┉

©  डॉ. नेहा विनोद भटकर

अमरावती

मो ९९७५०३०६२७ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted