श्री अमोल केळकर
☆ तूप साखर पोळी… लेखक : केदार अनंत साखरदांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆
लहान असताना कधी भूक लागली की आई लगेच गरमागरम पोळी करायला घ्यायची. ह्याचा कॉन्ट्रास्ट असा की, आईने कधी पोळ्या करायला घेतल्या की चरचरीत भूक लागायचीच! पोळी लाटायला घेतली की आईच्या बांगड्या पोळपाटाला आपटून एक लयबद्ध आवाज व्हायचा. ह्या आवाजात इतकी मोहकता असायची की, देवळात जाऊन घंटा वाजवल्यावर जी अनुभूती येईल, तीच अनुभूती बांगड्या आणि पोळपाटाच्या एकत्रित आवाजातून जाणवायची.
ती लाटलेली पोळी आई तळहातावर वळवत तव्यावर सोडायची. थोडी उसंत मिळाली की पोलक्याच्या कोपऱ्याने कपाळावर जमा झालेला घाम टिपून घ्यायची. पण ती उसंत तेवढ्यापुरतीच बरं का! तव्यावरच्या पोळीला जास्त सूट देऊन चालायचं नाही. कळथ्याने ती पोळी उपडी करून घ्यायची. एव्हाना एका बाजूने किंचित भाजलेली पोळी लालसर तपकिरी झालेली असायची आणि तिचा सुरेख सुवास सर्वदूर पसरत जायचा. भूक लागली नसेल तर भुकेची जाणीव करून द्यायचा आणि आधीच भूक लागली असेल तर ती आणखी प्रज्वलित करायचा.
मग आई एखाद्या कपड्याने तव्यावरच्या पोळीच्या मध्यभागी मनगटाने हलकेच दाब द्यायची आणि ती पोळी कडेला किंचित फुलायची. ती सुंदरशी पोळी आईने ताटात वाढली की, त्यातून येणारी वाफ तोंड जवळ नेऊन नाकावर, गालावर झेलायची. मऊ मऊ गुदगुल्या व्हायच्या. मग त्या गरम पोळीला हाताने स्पर्श केला की, तो वाफाळलेला स्पर्श छान शेक द्यायचा.
तोपर्यंत आई तपेलीत ठेवलेले तूप त्यावर हलकेच सोडायची. ते तूप अगदी शाळा सुटल्यावर मुले मैदानावर धावत सुटतात, पटांगणभर पसरतात, तसे पोळीभर पसरायचे. पोळीवरच्या तपकिरी रंगाच्या ठिपक्यांवर ते तूप अफलातून चकचकीत दिसायचे. आई शेवटी चिमूटभर साखर घेऊन ती संपूर्ण पोळीभर भुरभुरायची. मग त्या घृतशर्करायुक्त पोळीची घडी घालून तिचे वेष्टन करायचे आणि तो वेटोळा रोल घेऊन मी घरभर उंडारत असे. त्याची चव घेत घेत घरभर धावणे, ही एक बालपणाची पद्धतच होती.
आजकाल पोळी करताना सगळे साहित्य हाताशी असते. तूप असते, साखर असते, पीठही असते. पोळीही होते. पण तरीही त्या पोळीला बालपणीच्या पोळीची सर येत नाही. कारण त्या पोळीत फक्त गहू, पाणी आणि मीठ नसायचे. त्यात आईच्या हातांचा स्पर्श असायचा, तिच्या प्रेमाचा ओलावा असायचा आणि आपल्या पोटाची खळगी भरण्यापलीकडे जाऊन आपल्याला आनंदी करण्याची तिची धडपड असायची. आज पोळी खाताना कॅलरीज किती, तूप किती, साखर किती, याचे हिशेब डोक्यात सुरू होतात. तेव्हा मात्र पोळीचा पहिला घास तोंडात पडला की, बाकीच्या जगाशी आपला काही संबंधच नसायचा. पोळी संपली की आणखी एक मिळेल का, एवढाच काय तो पुढचा विचार!
आता आईच्या हातच्या त्या पोळीची आठवण आली की मन नकळत स्वयंपाकघरात जाऊन पोहोचते. पोळपाटावर फिरणारे लाटणे, बांगड्यांची किणकिण, तव्यावर पडणारी पोळी आणि तुपाचा दरवळ या सगळ्यांची एक अदृश्य मैफल मनात सुरू होते. गंमत म्हणजे, त्या वेळी आईने केलेल्या पोळीची किंमत कधी कळलीच नाही. ती रोजची गोष्ट होती. जशी आई रोज असायची, तशी पोळीही रोज असायची. काही गोष्टींचे मोल त्या आपल्या आयुष्यात असताना कळत नाही; त्या आठवणीत रूपांतरित झाल्या की मात्र त्यांची श्रीमंती जाणवते.
आजही पोळी करायला घेतली की आईच्या काकणांचा, पोळपाट-लाटण्याचा नाद कानात रुंजी घालतो. तोच किंचित खरपूस, करपट वास नाकाशी जमा होतो. तिची गरमागरम वाफ अजूनही नाकाला, गालाला लागते. त्यावर सोडलेले तूप अजूनही डोळ्यांसमोर पसरत जाते. साखर बर्फ पडावा तशी पोळीभर पसरते. पोळीची वेटोळी माझ्यासमोर घातली जातात आणि माझ्याच बालपणाला माझ्यातला मी भोज्या करून येतो. पुन्हा एकदा त्या बालपणात रमतो आणि मग माझी सो कॉल्ड मध्यमवयीन, गंभीर, सोज्वळ आणि स्थिर, थोडक्यात बोअरिंग, झूल पांघरून बसतो.
लेखक : केदार अनंत साखरदांडे
प्रस्तुती : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





