श्री सुधीर करंदीकर
मनमंजुषेतून
☆ कल करे सो आज कर ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
कल करे सो आज कर,
आज करे सो अब l
पल मे प्रलय होएगी,
बहुरि करोगे कब ll
– संत कबीर
– – ह्या दोह्याचा अर्थ अगदीच सोपा आहे. बहुरि करोगे कब म्हणजे अचानक प्रलय आला / काही विनाश ओढवला / काही अनर्थ ओढवला, तर उद्यावर ढकललेले काम पुन्हा कधी करणार!
नागपूरला माझा एक शाळकरी मित्र आहे, व्दारकादास शर्मा. आमचं फ़ोनवर नेहेमीच बोलणं होतं. शेवटी बाय म्हणतांना तो प्रत्येक वेळा म्हणतो, सुधीर, आज तो बाते हो गई, लेकिन अगली बार बात करनेके लिये मै रहूंगा कि नही, ये मालूम नही. मग मी म्हणतो, शर्माजी बात तो सही है. चलो इस बात पे और थोडा बोल लेते है. असं म्हणून अजुन थोड्या गप्पा, हसणे होतं आणि मग फ़ोन बंद होतो.
मेघना आणि मनवा या मॉर्निंग वॉक मैत्रिणींची अधून मधून मारूति मंदीराजवळ सकाळी फिरतांना भेट होते. चहा- गप्पा होतात. बाय करतांना त्या नेहेमी म्हणतात, आज गप्पा मस्त झाल्या – मज्जा आली. आता पुन्हा भेट होणार की नाही, माहित नाही. मग मी पुष्टी जोड्तो, म्हणणे अगदी बरोबर आहे – कल हो ना हो. तो इस बात पे और एक चाय और थोडी गपशप हो जाय. मग अजून थोड्या गप्पा रंगतात, चहा होतो आणि मग बाय बाय होते. आजचा दिवस उजाडला आहे म्हणजे आज आपण आहोत हे नक्की. उद्याची मात्र काहीच शाश्वति नाही.
जो मिली है जिंदगी, उसे खुलके जियो l
क्या पता, ये कल हो ना हो ll
बरीचशी कामे आपण नेहेमीच उद्यावर ढकलत असतो. वयस्कर आई – वडिलांना आपल्याकडून काहीतरी बॅंकेचं काम करून पाहिजे असतं, काहीतरी आणून पाहिजे असतं, आणि आपण नेहेमीच, क्या फरक पडता है, असं म्हणून टाळाटाळ करत असतो आणि उद्या नक्की करतो असं म्हणत असतो. चला तर मग, आजच त्यांची सगळी कामं करून त्यांना सुखद धक्का देऊ या. ”क्या पता, ये कल हो ना हो “.
बायकोशी चार प्रेमाचे शब्द बोलायला तर आपल्याला कधीच वेळ नसतो. कौतुक करणे तर लांबच राहते. असं कर – तसं कर, हे आण – ते आण, आणि तक्रारी, एवढेच संभाषण असते, कारण “आज” आपल्याकडे कधीच तिच्याकरता वेळ नसतो. काही ठिकाणी हीच गोष्ट नवऱ्याच्या बाबतीत पण असते. चला तर मग, आजच बायकोनी केलेल्या चहाची तारीफ करू या, तिच्या सैंपाकाला दाद देऊ या. तिला गजरा घेऊन जाऊ या. “ क्या पता, ये कल हो ना हो “.
मुलांची चौकशी – त्यांच्याशी गप्पा, नातेवाईक/ मित्र यांची विचारपूस, आणि इतरहि बरच काही राहूनच गेलय्, म्हणजे आजच हे पण सगळे करायलाच पाहिजे. “क्या पता, ये कल हो ना हो “.
बँकेमध्ये सगळ्यांचीच खाती असतात / निरनिराळ्या इन्व्हेस्टमेंट्स असतात / घराची कागदपत्र असतात, अशा ठिकाणी जॉईंट नाव देणे / नॉमिनेशन देणे, अशी महत्वाची कामे आपण बरेच जण उद्यावर ढकलत असतो. वरचा दोहा वाचा, आणि हि कामे कधी करायची याचे उत्तर लगेच सापडेल.
वयस्कर व्यक्तीच्या बाबतीत मृत्युपत्र केलेले असणे फार महत्वाचे असते. हे काम पण बहुतेकांच्या बाबतीत ‘उद्या करू’ या यादीमध्ये असते. वयस्कर मंडळी दोहा वाचून म्हणतील – असा प्रलय कधी होत असतो का? यावर उत्तर असे आहे – निसर्गामधे कदाचित प्रलय होणार पण नाही, पण वयस्कर व्यक्तींच्या बाबतीत त्यांच्या शरीरामधे केंव्हाही प्रलय होऊ शकतो.
चला तर मग – आपण सगळेच जण आचरणात आणूया – काल करे सो आज कर ~~~
हे केल्यानंतर एक नविनच शोध आपल्याला नक्कीच लागणार आहे, आणि तो म्हणजे – अरे, खरा आनंद तर यातच आहे. आणि मग आज करण्याच्या कामाची यादी चांगलीच वाढणार आहे. चला कामाला लागु या.
आपल्या नशीबानी जर उद्या पण उजाड्ला तर हे सगळे उद्या पण करायचे आहे, कारण “क्या पता, ये कल (उद्याचा कल) हो ना हो “. परवा, तेरवा असे हे आनंदी चक्र सुरूच ठेवायचे आहे. कारण प्रत्येक दिवसाला ‘कल’ हा असणारच! आणि त्या “कल” ला पण पुष्टी असणारच आहे – “क्या पता, ये कल हो ना हो”.
असाच संदेश देणारं एक सुरेख गाणं आहे, ‘कल हो ना हो’, या सिनेमामधलं —
हर घडी बदल रही है रूप जिंदगी l
छाव है कभी, कभी है धूप जिंदगी l
हर पल यहा, जी भर जियो l
जो है समा, कल हो ना हो ll
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




