श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ मागणे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
☆
अंतर्यामी सदैव माझ्या
तुझा मूळचा झरा झुळझुळो
स्फटिकजळी ह्या तुझी निळाई
प्रतिबिंबासह नित्य खळखळो
*
कधीतरी मी कोणासाठी
तुझ्या नभासम दाटुन यावे
सुकू लागल्या तृणपात्यांवर
दवबिंदूंचे ओघळ व्हावे
*
तुझ्या धुक्यातुन दिसत रहावे
विरुप बोचरे सत्यहि सुंदर
एक बोडका डोंगरसुद्धा
पर्वतराणा व्हावा क्षणभर
*
तेजतत्त्व ते तुझे शुभंकर
पणतीमध्ये माझ्या यावे
कानमंत्र तू दे तिजला रे
स्वतः जळावे जग उजळावे
*
असे झाडपण लाभो जन्मा
सर्व ऋतू अंगावर घ्यावे
उंच नभांगणी जाता जाता
मातीमध्ये खोल रुजावे
*
सर्जन सिंचन संहाराचे
चक्र फिरे तव चराचरातुन
ठेव अबाधित जीवननिष्ठा
स्थितीगतीतुन कळिकाळातुन
*
तुझी भव्यता तुझी दिव्यता
नित नेमाने मला पुजू दे
तुझीच नियती होता वैरी
हाती मजला वज्र घेउ दे!
☆
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






