श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ परतीची वाट… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
डोहाचे काळे पाणी,
पायाला स्पर्शून गेले.
छळवादी कृष्णछायेने,
मन औदुंबरच झाले.
हैदोस आर्त पाखरांचा,
रडवून तरुंना गेला.
अवचित जसा की मजला,
पानगळीचा अर्थ समजला.
काळजाला पाडीत पीळ,
शीळ घालत वारा गेला.
दाटूनी अचानक मेघ,
पाऊस सुखमय आला.
दुथडी नदी ही वहाते,
दुःखांचे घेउन पाणी.
हाकेच्या अनुषंगाने,
येईन मी अनवाणी.
ओलावून पाऊस गेला,
ऐलपैलाचे आपले काठ.
शोधीन एकट्याने मी,
परतीची हरवली वाट.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




