मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ सातबारा… ☆ मेहबूब जमादार ☆
☆
आज मातीने माझ्या का बरं फारकत घ्यावी
फाटक्या आभाळानं का तिची साथ सोडावी
*
मागच्या काळी नेमक्या वेळी पाऊस यायचा
राबणारा शेतकरी हिरव्या रानाकडे पहायचा
*
आभाळानं दिल्यामुळे सारं रानच फुलून जायचं
सळसळणाऱ्या वाऱ्याने शिवार मस्त डोलायचं
*
गेला बदलून काळ, फुटल रानात आभाळ
पिकासंग माती ही नेऊन गेला रौद्र काळ
*
आला महापुर रुतुनी गेला मज काळजात सारा
शेतकऱ्यांचा कसा कोरा होईल बरं? सातबारा
☆
© मेहबूब जमादार
मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




