image_print

सौ. राधिका भांडारकर

Vinda Karandikar memorial in Chetana college | चेतना महाविद्यालयात विंदांचे राष्ट्रीय स्मारक | Loksatta

स्व विंदा करंदीकर

 ☆ काव्यानंद ☆ चुकली दिशा तरीही.. स्व विंदा करंदीकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

रसग्रहण 

“चुकली दिशा तरीही  हुकले न श्रेय सारे….”ही कविता वाचताना मनात एक आकृती आकारते. एका मुक्त, बंधनात न अडकलेल्या, स्वत:च्याच धुंदीत, बेफिकीर, अखंड चालत राहणार्‍या मुशाफिराची… हा मुशाफिर वेगळ्याच वृत्तीचा आहे.

आणि कवी या मुशाफिराची सफर एका तटस्थ दृष्टीकोनातून पहात आहेत.. समाजाने नाकारलेल्या अथवा समाजाने स्वीकारलेल्या अशा कुठल्याच मार्गावरुन वाटचाल न करणारा…भले इतरांसाठी दिशा चुकलेला अथवा भरकटलेला पण स्वत:साठी मात्र सगळेच मार्ग खुले ठेवणारा हा वेडा मुशाफिर कवीला मात्र त्याच्या याच विशेषत्वाने आकर्षित करतो.त्याच्यात एक सामर्थ्य जाणवतं…

मला नेहमी असं वाटतं की विंदांची काव्य वृत्ती ही प्रहारक आहे.प्रहार प्रस्थापित वैचारिकतेवर. प्रहार प्रचलिततेवर… म्हणूनच त्यांचे शब्द वेगळ्या वाटेवर वणव्यासारखे फुलतात…

“डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवांचे..

हे शीड तोडले की अनुकुल सर्व वारे,..”

लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल हीच भिती बाळगून जगणार्‍यांना कवी रूढी ,परंपरेचे दास मानतात.

ही गतानुगतिक माणसं त्यांना डरपोक वाटतात.भित्री,भेदरट अरुंद छातीची वाटतात…शीड तोडणारीच माणसं प्रिय  वाटतात. झपाटलेली, झोकून देणारी या मुशाफिरा सारखी माणसंच इतिहास घडवतात,

“मग्रुर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा…”

नशीबावर विश्वास ठेवणारी वा नशीबाला दोष देत जगणारी माणसं नाकर्तीच असतात.ग्रह तार्‍यांची गणितं मांडून सावधानतेने फुंकर मारत जीवन जगणारा, कवीला मर्द वाटत नाही, त्यापेक्षा, मग्रुर प्राक्तनाचा नकाशा फाडून, ईशारे झुगारणारा असा एखादा ,अधिक बलवान निग्रही,घट्ट मनोधारणेचा वाटतो.

“चुकली दिशा तरीही आकाश एक आहे….”

चुकतमाकत ,चाचपडत चालाणारा हा मुशाफिर नाही.

दिशा चुकेल याचं भय त्याला  नाही.कारण त्याच्यासाठी आकाश एकच आहे.इथे कोलंबसची आठवण येते. त्याचीही दिशा चुकली पण त्याला अमेरिका सापडली. माघार न घेता पुढे जाणं हेच सामर्थ्याचं लक्षण..

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे बेसावधास कैसे डसणार हे निखारे…?

इथे बेसावध याचा अर्थ जागरुक नसणारा असा नकारात्मक नसून ,जो बेसावध तोच शूर आणि तोच खरा वीर.कारण आशा निराशेचे निखारे त्याच्यातलं झपाटलेपण नाही जाळू शकत.

हा वेडा,दिशा चुकलेला, निराळ्या वाटेवरुन बेधडक चालणारा, बेसावध, झोकून देणार्‍या मुशाफिरांत  विंदाना एक तळपतं सामर्थ्य  दिसतं अन् ते भावतं.

त्याच्या  झपाटलेपणाला त्यांना या कवितेतून दाद द्यावीशी वाटते…

ही संपूर्ण कविता, अर्थाची ऊलगड करत, वाचत असतांना, विंदांच्या वैचारिक प्रतिभेला, पुरोगामीत्वाला, सच्चेपणाला वंदनीय दाद द्यावीशी वाटते.

एक सुंदर संदेश घेऊन ही कविता मनात रुजते…

व्हा वेडे..द्या झोकून..फाडून टाका सारे बुरखे…

शोधा वेगळे रस्ते…..नव्या वाटा तयार करा…जुन्या इतिहासातील जुन्याच चुकांना ग्लोरीफाय करण्याऐवजी,

नवा ऊज्वल इतिहास घडवा…

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
AMIT SARAF

VERY nice explaination and poem is beautiful