image_print

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ क्षण सृजनचा ☆ रिडेव्हलेपमेंट.. ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

गेल्या काही वर्षांपासून मुंबईत इमारतींच्या रिडेव्हलपमेंटची लाट आली आहे.

जुन्या इमारती बिल्डर ताब्यात घेतात. त्या पाडून त्याजागी उंच इमारती  बांधतात. जुन्या रहिवाशांना पूर्वीपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा फ्लॅट दिला जातो. उरलेले फ्लॅट बाहेरच्या माणसांना विकतात.

इमारत तयार होईपर्यंत तीन-चार वर्षं तरी जातात. तेवढ्या अवधीतील तात्पुरत्या निवासासाठी, जुन्या रहिवाशांना भाड्याची रक्कम दिली जाते.

आमच्या जवळची एक इमारत रिडेव्हलपमेंटला गेली. जुने रहिवासी मिळाला तो फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहू लागले. नवीन इमारत तयार होण्याची वाट बघत.

इमारत पाडली. नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. आणि अचानक बांधकाम बंद  पडलं. कोर्टकचेऱ्या, स्टे वगैरेंच्या भोवऱ्यात सापडून सगळं काही ठप्प झालं. हळूहळू बिल्डरकडून भाड्याचे चेक मिळणंही बंद झालं.

आठ-दहा वर्षं अशीच गेली. भाड्याच्या फ्लॅटचं नूतनीकरणही कठीण  होऊ लागलं. एकाच फ्लॅटमध्ये दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहायला द्यायला फ्लॅटचे मालक का-कू करू लागले. मग पुन्हा नवीन फ्लॅट शोधणं, सामानाची हलवाहलव वगैरे  व्याप.

या सर्व घडामोडींवरून मला ही गझल सुचली. एका स्ट्रक्चरल विषयावरील कविता स्ट्रक्चर्ड फॉर्म असलेल्या गझलमध्ये सुचावी, हा एक योगायोग.

कविता सुचली अशी :

 ☆ रिडेव्हलपमेंट ☆

एक होती कॉलनी ती, नांदती तेथे घरे

लिंबलोणही झुलत होता,गात होती पाखरे

 

दाखवी आमिष कोणी, खैरातली आश्वासने

कित्येक होते फायदे, फसवे किती काही खरे

 

झाला विरोधही तिडकीने संख्याच जिंके शेवटी

लोकशाहीचा नियम हा सत्य ते नेहमी हरे

 

गुंडाळूनी संसार सारे घेतले पाठीवरी

पांगले दाही दिशांना,सोडून गेले आसरे

 

कोण जाणे काय झाले ठप्प झाले बांधणे

गगन चुंबाया निघाले -स्वप्न होई  लत्करे

 

भोवताली पूर्ण झाली गगनचुंबी ती घरे

भोग भाळी आमुच्या का, का प्रतीक्षा सांग रे

 

लोटली कित्येक वर्षे फक्त सांगाडा उभा

एक सांगाडा उभा अन सोबतीला चौथरे

 

लागला डोळा दिसू अंत आता जीवनाचा

श्वास सरू दे ‘त्या’ घरी हीच आता आस रे

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments