सुश्री शीला पतकी
☆ क्षण सृजनाचा ☆ “वांझोटी प्रीत…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
एका सेमिनारसाठी आळंदीला गेलो इंद्रायणीचे आकर्षण खूप होतं. संध्याकाळी नदीच्या काठी बसलो पण पाणी काही स्वच्छ नव्हतं… बायका कपडे धुत होत्या… लोक आंघोळ करत होते… कोणी भांडे धुवत होतं… घाटावरची माणसं वेगवेगळ्या कृती त्या पाण्यात करत होते…. कोणीतरी सांगितलं” पुढे जा छान स्वच्छ पाणी आहे “त्या घाटावर गेल्यानंतर तिकडे पाणी चांगलं होतं. अर्थात आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो होतो. आणि त्या ठिकाणी क्रियाकर्म केले जात होते. फारशी गर्दी नव्हती पण एका कुणाचं तरी तरुण मुलाचे क्रिया कर्म होते. आणि बरीच माणसं परगावावरून आलेली होती. ज्या तरुण मुलीचा प्रियकर लग्नापूर्वीच गेलेला होता. त्याचे नुकतेच लग्न ठरवून साखरपुडा झाला होता. ती मुलगी कमालीची रडत होती आणि तिला दोघी तिघी बायका तिला खूप समजून सांगत होत्या…. बायकाही बऱ्याच आल्या होत्या… आमच्या बोलक्या स्वभावामुळे आम्ही थोडीशी माहिती काढली. त्यातील एका बाईने माहिती दिली होती. त्यानंतर त्या मुलीने जिथे त्याची रक्षा विसर्जित केली होती त्या तिथे पाण्यात जाऊन त्यातली एक ओंजळ भरून घेतली त्याच्याकडे क्षणभर तिने पाहिले.. आणि तिने ते पाणी पिऊन टाकले. तोंड धुतले डोळे धुतले आणि ती काठावर आली… हे सगळं पाहताना त्या मुलीच्या मनात काय चाललं असेल याचा सहजच विचार आला…. आणि काही ओळी सुचल्या… पुढे त्याची कविता झाली… पण ते दृश्य मी कमीत कमी दोन-चार दिवस तरी विचारू शकले नाही. खूपच अस्वस्थ करणारे ते दृश्य होते दोन एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जीवांना असं वेगळं करण्यामध्ये देवाला काय मिळत असाव..? असा प्रश्न मला नेहमी सतावतो… आणि शेवटी त्याची करणी कोण जाणतो? …. असे म्हणून आपण थांबतो ती ही कविता….!
☆ वांझोटी प्रीत ☆
*
तिन्ही सांजेच्या वेळी
बसले इंद्रायणीच्या काठी
सूर्य मावळतीला गेला
अन चंद्र पृथ्वीच्या ओठी —
*
तो दुसरा प्रकाश
भेदून तिमिर निघाला
सावल्या स्वतःच्या
हळूच कुठे हरवल्या —
*
त्या जलाशयावर
टेकवले मी तळवे
ते तरंग परिचित
उठले विरले हळवे —
*
त्या तळव्यांना हा
स्पर्श तुझा रे कळला
मी ओळखले रे
तूच त्यात विरघळला —
*
तव देहाची रे
रक्षा येथे पडली
इंद्रायणीच्या त्या
जळात ती विरघळली —
*
मग श्रद्धेने मी
ओंजळ त्याची भरली
ओठास लावता
तृप्ती एक जाणवली —
*
तो घोट तृप्तीचा
पिऊन पिऊन घेतला
अन देहामध्ये
कणकण सामावला —
*
त्या मर्त्यकणातून
उगवण काही नाही
प्रीतीला शाप रे
वांझोटी ती राही —
*
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





