सुश्री शीला पतकी
☆ क्षण सृजनाचा ☆ “काटेकरांची मुले…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
मैत्रिणीचा फोन आला,” अगं शीला आपण अगदी चुकीचं शिकवलं बघ आपल्या विद्यार्थ्यांना. आपण सांगितलं सोलापुरात खूप झाडं लावा तरच पाऊस चांगला पडेल अन्यथा आपल्याकडे दुष्काळच… पण काय ग कसला पाऊस आपण चुकीचं सांगितलं बाई…!” या विनोदावर आम्ही खूप हसलो खरंच विनोदच म्हणायचे याला सोलापुरात आम्ही कधीच एवढा पाऊस पाहिला नव्हता पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासून जो पाऊस पडतोय तो मला वाटतं थंडी सुरू झाली तरी पडत राहणार आहे असं दिसते. मग काय घरात निवांत बसणे सोलापुरातल्या माणसाला पावसाची सवय नाही त्यामुळे त्याच्याकडे रेनकोट छत्री इत्यादी साहित्य नसते पाय पाण्यात बुडाले तर त्याला सर्दी होते अशी जडणघडण झालेले आमचे शरीर मग आता या वयात तरी निवांत घरी बसलो. 45 बंगल्यांच्या आमच्या सोसायटीत पूर्ण शुकशुकाट 45 घरात मोजून 50 माणस आहेत त्यातली 25 व्यवसायाला गेलेली… काही घरे कुलूप बंद . .प्रचंड शांतता….! मोबाईल आणि टीव्हीचा कंटाळा आलेला… मी शांत पडून राहिले भिंतीवरच्या घड्याळाकडे मात्र सतत लक्ष होतं…. एकेक काटा गतीने फिरत होता…. सेकंदाचा फिरणं 60 घर… तेव्हा मिनिट काटा एक घरावर हलायचा… मग 60 मिनिटे झाल्यावर तास काटा पाच घर चालायचा… हा खेळ मी तासभर बघत होते आणि लक्षात आले याना कंटाळा कसा येत नाही तेवढ्याच गोलात चालायचा…! हे कधी थांबत नाहीत…. बरोबर आहे त्याच्या मागे त्याचा बाप बसलाय ना.. बॅटरी ….आणि मग असेच काही काही विचार येत राहिले आणि माझ्या तोंडून सहजच निघाले ,”ओ काटेकर थांबा की तुम्हाला चालताना बघून कंटाळा आलाय… आम्हाला मात्र चालता येत नाही आणि तुम्ही पळत आहात”. आणि पटकन क्लिक झाल..” काटेकरांची मुलं”…. मग भराभर कल्पना येत राहिल्या बारा वाड्या . साठ घर …आणि खूप काही जे कवितेत मांडलेल आहे ..!मग काय समोर एक पावतीचा कागद पडला होता अगदी हाताएवढा… पेन घेतला आणि त्यावर लिहायला सुरुवात केली भराभर ओळी उतरत गेल्या सहजच स्फुरलेले काव्य, ते काही कष्ट काव्य नव्हतं पंधरा मिनिटात कविता झाली. मला चांगल्या कागदावर आणि चांगल्या अक्षरात कविता करता येत नाही कागद पाठ कोरा, पावत्या, रद्दी इत्यादी मधला असेल तर कवितेला स्फुरण चढते .. !कविता तर झाली पहिला श्रोता हवा ना…? शेजारी पेइंग गेस्ट म्हणून एक एमबीबीएस ची मुलगी राहते… नीरजा तिच्या परीक्षेच्या अभ्यासातून तीला पाच मिनिट ब्रेक दिला… म्हटलं चल कविता ऐकवते… कविता ऐकून ती खुश झाली आणि फ्रेश सुद्धा झाली म्हणाली,” क्या बात है आत्या मस्त” बास एवढ्या प्रतिक्रियेवर कविता पटापट पाठवली .आता ही कविता वाचून काहींनी विचारले कसं काय सुचत हो तुम्हाला? मनात म्हणलं बाई एकटेपणाचे दुःख तुम्हाला काय माहिती आहे घरात माणसं नसली की कविता सुचतात… ही थोडी गंमत बरं मला खात्री आहे तुम्हाला ही कविता आवडेल . .चला तर मग पाहूया काटेकरांची मुलं काय म्हणतात….!!!
☆ काटेकरांची मुलं ☆
*
बारावाड्यांचा 60 घरांचा एक होता गाव
घड्याळ त्याचे नाव//
*
काटेकरांचे वेडे तीन भाऊ होते गावभर फिरणारे
मोठा ताशा बळ मधला मिंटो आणि लहान होता पळ पळ
*
तोच मोठा होता चपळ पळ पळ सतत पळायचा
बारा वाडे फिरल्यावर मिंटू एक घर चालायचा
मिंटो साठीला आला की ताशा भाऊ पाचघर हलायचा
*
पण फिरून नाही हं दमायचे
रात्र असो दिवस असो असो उन्हाळा पावसाळा
बारा घरांचा त्यांना लागला होता लळा
*
यांचं म्हणजे एक असतं वेळ म्हणजे वेळ
आणि शिस्त म्हणजे शिस्त
पाळायलाच पाहिजे ना
साऱ्या जगाची असते यांच्यावरच भिस्त
*
सगळीकडे यांचेच राज्य घर ऑफिस शाळा
रेल्वे एसटी विमान सुद्धा पाळतात यांच्या वेळा
आई-बाबांना यांचाच धाक
लोकलचतर चालते यांच्यावरच चाक
*
यांचा दर्जा कायम वरचा
भिंतीवर मनगटावर मोबाईलच्याही स्क्रीनवर
*
ग्रहावरही यांचीच हुकूमत
सूर्य ही उठतो वेळेवर
दिलेल्या कक्षेत मुकाट फिरतात
ग्रह तारे बिनदिक्कत
*
जन्म लग्न मृत्यू मुहूर्त सगळीकडे यांचाच गणित
अपरंपार महिमा यांचा भक्त यांचे अगणित
*
पण ठाऊक आहे का काय यांची गंमत
यांचे बाबा मागे बसूनपाहतअसतात जम्मत
बॅटरी वाले बाबा त्यांना देतात ऊर्जा
म्हणून वेळेवर हलतोय त्यांचा प्रत्येक पूर्जा
*
धावणाऱ्याच्याही मागे असतो दडलेला एक बाप
तो असला की नाही चिंता, धावायचं पण नसतो डोक्याला उगाच ताप
*
मागे म्हणे आजीनं गाठोड्यात याला बांधलं
एका कवीने शोध शोधलं पण त्यालाही नाही सापडलं
*
आता नको शोधा शोध नको त्याचा मनस्ताप
काटे कुटुंबाला बांधून घ्या आणि सरळ चला बिनधास्त//
*
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






