सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ क्षण सृजनाचा ☆ मुक्त.. (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
अगदी सात आठ दिवसांपूर्वीचीच गोष्ट.. सकाळी चहा पीत पीत एकीकडे पेपर वाचत होते. पहिलं पान उपभोगाच्या वस्तूंच्या अत्याकर्षक जाहिरातींनी भरलेलं .. दुसऱ्या पानावर दिवाळीनिमित्त कुठल्या शहरातल्या बाजारपेठेत गर्दीची किती झुंबड उडाली त्याच्या फोटोंची गर्दी — त्या फोटोंच्या आजूबाजूला गर्दीत झालेली चेंगराचेंगरी – कुठे खून – कुठे मारामाऱ्या – कुठे जीवघेणा पूर – मग कुणा कुणाची आत्महत्या
– मधेच राजकारणातल्या निव्वळ स्वार्थापोटी मारल्या जात असलेल्या कोलांटउड्या — थोडक्यात काय तर बहुतेक सगळीकडे चाललेली नकारात्मकतेची कुरघोडी….. पानांची बहुतेक सगळी जागा याच नको वाटणाऱ्या वास्तवाने भरलेली …..
… वैतागून पेपर दूर सारला. आणि शेजारी असलेल्या खिडकीतून बाहेर बघत एव्हाना गार झालेला चहा प्यायला लागले….. घराखाली लावलेल्या झाडाच्या फांद्या आता पहिल्या मजल्यावरच्या आमच्या खिडकीजवळ पोहोचल्या होत्या. सहज लक्ष गेलं तर एक अगदी चिमणीपेक्षाही छोटा असणारा पक्षी झोक्यावर बसल्यासारखा एका फांदीवर झुलत होता .. मधेच आपले इवलाले पंख फुलवत स्वतःभोवतीच गिरक्या घेत होता .. मधेच आनंदाने आरोळ्या माराव्या तसा आवाज करत होता – – मस्त वाटत होतं – –
– – – पण मधेच एकीकडे समोर फडफडणारा पेपर लक्ष विचलित करत होता … आणि नकळत मनात विचार भिरभिरायला लागले …. इवलीशी चोच .. इवलेसे पंख असूनही मनसोक्त आनंदाने जगत असलेलं ते इवलंसं पाखरू … आणि जवळ खूप काही असूनही कशा ना कशाला जखडून सतत उरस्फोड करणारी असंतुष्ट माणसं. — आणि मग आपोआप मनात झिरपायला लागले शब्द – – –
☆ मुक्त .. ☆
उंच उंच भरारण्यासाठी .. पाखरांना नाही लागत दिवाळी दसरा
त्यांच्या मनाचे तेच तर राजे .. कुवत जाणून खुशाल पंख पसरा .. ..
*
म्हणून आनंद साजरा करायला .. कारण त्यांना लागतच नाही
‘मी सदैव मुक्त आहे ‘ .. त्यांना नेहेमीच असते ग्वाही .. ..
*
मनसोक्त जगायलाही .. लागत नाही कुठलंच कारण
पोटापुरते दाणे मिळता .. तोच वाटतो त्यांना सण .. ..
*
हप्त्यावरती आणत नाहीत .. आनंदाचे फसवे पंख
ज्यावर असतो फासलेला तो .. समाधानाचा नकली वर्ख .. ..
*
मनापासूनचे समाधान असते .. मुद्दाम दाखवण्याची आस नसते
स्पर्धाच नाही कुणाशी कसली .. मग डामडौलाची गरजच नसते .. ..
*
गरजाच त्यांच्या मुळात माफक .. अवास्तव कुठलीच अपेक्षा नसते
म्हणून अंगापेक्षा बोंगा जड .. असे त्यांचे कधी-कुठे दिसते ? .. ..
*
म्हणून तर विहरतात मुक्तपणे .. घालत नाहीत स्वतःच्याच पायात बेड्या
ना कुणाशी स्पर्धा ना हेवेदावे .. ना आवाक्याबाहेरच्या आकांक्षा वेड्या .. ..
*
.. .. .. स्वरचित चक्रव्यूहातून बाहेर पड .. प्रयत्न तरी कर ना रे माणसा
शीक जरा पाखरांकडून .. तो मुक्त आनंद असतो तरी कसा .. ..
*
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







खूप छान साजरा झालाय सृजनाचा क्षण मंजूषा ताई!