सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
अक्षर अक्षयसे धन – चित्र एक.. काव्ये दोन
सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
( १ )
गेली दिवाळी सरून
मागे उरला फराळ
घरादारात भासतो
लेकी वावर दर्वळ
*
नातवंडे परतली
क्लास तयांचे सुरू
गोड हट्ट पुरविता
फुले देहाचाच तरू
*
स्नानगृहात अजून
उटण्याचा येई गंध
घरातल्या पसाऱ्याला
येतो दिवाळी सुगंध
*
आता मनाला देऊया
वैचारिक मेजवानी
वाचू दिपावली अंक
थोड्या शुल्कास भरूनी
*
अक्षर अक्षयसे धन
करी मनाचे पोषण
ग्रंथालये देवालय
ग्रंथ प्रसादाचे द्रोण
*
मन मेंदुचे पोषण
देई वैचारिक धन
ईशासम भक्ती करू
योग्य वाचन करून
— — — —
( २ )
वाचन अंबर
वाचन सागर
ठेवावे समोर
डोळियांच्या
*
वाचन हा गुरू
हाच कल्पतरू
पाहतो सावरू
जगण्याला
*
काय वाचतोय
कोण वाचतोय
त्याचाही संबंध
असतोच
*
देवापुढे नित्य
ठेवावे मस्तक
पुस्तक वाचत
मस्तकात
*
सारासार सारा
करतो विचार
वाचनात भर
नित्य टाके तोच
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






