सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
भरलेले ताट…
सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
साग्रसंगीत स्वयंपाक झाला
ताट भरले काठोकाठ
ग. दि. मा आणि संकर्षणच्या
कविता आठवल्या पाठोपाठ
*
पण मला मात्र असे ताट पाहून
सगळ्यांपेक्षा जरा वेगळेच वाटले
उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
.. ओठी आले ||
*
जठराच्या यज्ञासाठीच्या समिधा
तुपात न्हाऊन सजलेल्या
वेगवेगळ्या पदार्थांची
आहुती होऊन आलेल्या ||
*
मीठ चटणी लोणचं कोशिंबीर रायते
जठराग्नी चेतवण्या आले आयते ||
पापड पापड्या कुरोड्या तळलेले
प्रज्वलीत ते कुंड जाहले ||
*
साधं वरण भात तूप लिंबाने
अग्निवरती प्रोक्षण केले
पोळी भाजी वांग उसळ
जिव्हा चमच्याने यज्ञ मुखी घातले ||
*
पवित्र अशा या समिधांनी
अग्नी देवतेस उत्तेजित केले
चविष्ट वडे भजी वड्यांनी
त्यास संतुष्ट केले ||
*
आमटी कालवणाच्या गुणांनी
देवतेचे मन भारून गेले
शेवटची समिधा मिष्टानाची
देवता जीवास तृप्त केले ||
*
पियुशाचा मुखवास मिळता
ढेकर देऊन आशिर्वाद दिले
अन्नपूर्णा सुखीभव,
अन्नदात्याचे कल्याण होवो म्हटले||
*
असे षड्रस युक्त जेवण मिळता
आरोग्य चांगले लाभणार
आरोग्यम धनसंपदा
त्या घरी नांदणार ||
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





