श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
कसला दसरा अन् कसली दिवाळी !
श्री आशिष बिवलकर ☆
☆
स्वर्गात बसलेल्या वरुणदेवा,
अश्रू तुझे आता तरी ढाळ |
पावसाने ओढ दिलीय यंदा,
कोरडंठाक पडलंय आभाळ |
*
ओल्या झाल्या डोळ्यांच्या कडा,
पावसाचा ठिपूस पडत नाय |
शिक्षा दिलीस बळीराजाला,
सांग त्याचा अपराध तरी काय |
*
नऊ नक्षत्र रुसून परतली,
पावसाविना झाली आबाळ |
करपली पीकं शिवारात,
राजाने जाहीर केलाय दुष्काळ |
*
मंत्री संत्री नेते निघाले दौऱ्यावर, ,
केवळ मगरींच्या अश्रुंचा देखावा |
सरकारी दुष्काळ आवडे सर्वाना,
जसा धाड माराया येतो पाखरांचा थवा |
*
बाबू करतील सरकारी पंचनामे,
जाहीर होईल पिकांची आणेवारी |
सावकाश पानं पुसतील तोंडाला,
मयताचे कफन देखील करतील चोरी |
*
कधी ओला तर कधी सुका दुष्काळ,
शेतकऱ्यांच्या पूजलाय सदा भाळी |
जगणं झालंय मुश्किल त्यांच देवा,
कसला दसरा अन् कसली दिवाळी |
☆
(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर)
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







