श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘तो….’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी 

एस. टी. तून फाट्यावर उतरून तो गाडीवाटेने चालायला लागला. तसा तो खूप वर्षांपूर्वी, त्याच्या लहानपणी, तो चार-पाच वर्षाचा असताना इकडे आला होता पण त्यावेळी त्याचे आई-वडील त्याच्या सोबत होते. त्यावेळी ते एस. टी. तून उतरले होते, तेंव्हा फाट्यावरच्या आंब्याच्या झाडाखाली बैलगाडी त्यांची वाटच पहात होती. बॅगा घेऊन वडील उतरले तेंव्हा वाट बघत असणाऱ्या गाडीवानाने पुढं होऊन वडिलांना ‘रामराम ‘ करून त्यांच्या हातातील सामान घेतलं होतं.

“ शंकर कसा आहेस? “

वडिलांनी त्याला विचारले.

“ ब्येस हाय जी “ 

त्यांने उत्तर दिले आणि आंब्याखाली येताच तो गाडी जुंपू लागला होता. गाडी जुंपेपर्यंत सावलीत बसून चार घोट पाणी पिऊन त्यानं अवती-भवती नजर टाकली होती. गाडी जुंपल्यावर वडिलांनी त्याला उचलून गाडीत ठेवलं तसा तो पुढं सरकून गाडीवानाशेजारी बसला होता.. पहिल्यांदाच बैलगाडीत बसल्यामुळे त्याला सगळे नवीन वाटत होतं.. तो पुढं सरकून बसल्या बसल्या

‘ जरा मागं सरकून बस.. काकांना त्रास देऊ नको.. ’ नेहमीप्रमाणे आईने त्याला दटावले होते.

गाडीवान म्हणाला होता,

“ न्हाय वो वैनी.. पोराचा तरास कशाचा..? “ 

खरंतर त्याला बैलांचा कासरा हातात घ्यावा, आपण पण रुबाबात बैलगाडी चालवावी असे मनातून खूप वाटत होते.. पण त्याने आईकडे पाहून जरासे मागे सरकल्यासारखे केले होते. गाडी दुडक्या चालीने चालली होती.

बैलगाडी डोंगराजवळ येताच काहीशी खडी चढण लागली तसे मागे बसलेले वडील खाली उतरले.

“ कशापायी उतरतायसा.. बसा.. ” 

“ नको.. खडी चढण आहे.. ”

“ अवो दादा, बैलं लय दमाची हायती.. कराडास्नं गाडीभर सामान असल्याली गाडी घाटात्नं वडत्यात.. “

“ हूं.. असू दे चल… अरे त्यांनाही जीव आहेच की.. त्यात उन्हाची रणरण, डोंगरातली गाडीवाट.. ”

खिंडीतील पूर्ण चढण चढून गाडी उताराला लागेपर्यंत वडील गाडीमागून पायी चालत येत होते. उतार लागल्यावर गाडीवानाने गाडी थांबवली तसे वडील परत बैलगाडीत बसले होते..

बैलगाडीतच नव्हे तर साऱ्या प्रवासातच, वातावरणात एक प्रकारची गंभिरता होती.. वडील आई दोघेही तसे मोजकेच बोलत होते.

 “ तुझे आजोबा देव बाप्पाकडे गेलेत.. तिथं गेल्यावर हट्टीपणा, आगाऊपणा करायचा नाही. ”

असे निघताना आईने त्याला सांगितले होते. तेंव्हा त्याला काही महिन्यांपूर्वी आलेले आजोबा आठवले होते.. कसंबसं महिनाभर राहिल्यावर आजोबा बाबांच्या मागं लागले होते.

“ गावाकडे जातो.. एसटीत बसवून दे. ” 

तेंव्हा बाबा त्यांना म्हणाले होते..

“ रहा की इथंच आमच्या जवळ.. इथं आम्ही आहोत.. लागलं सवरलं तर डॉक्टर आहेत जवळ.. कशाला जाताय गावाकडे. तिथं डॉक्टर पण नाही.. मी एवढ्या लांब.. तिथं एकटं कशासाठी राहताय? काय लागलं, सवरलं तर कोण बघणार तिथं तुमच्याकडं..? “

“ आरे, आपलं गाव आहे ते.. आपली माणसं आहेत.. इथं शहरात मन नाही लागत.. आणि खरं सांगू का.. असे किती दिवस राहिलेत आता..

त्या पांढरीनं पोसलेला देह.. त्या पांढरीला परत द्यावा वाटतोय.. सारं आयुष्य तिथं गेले.. शेवटचा श्वास तिथंच सोडावा वाटतं रे…वाईट वाटून घेऊ नको पण पिकलं पान कधीतरी गळून पडायचंच.. ते त्याच मातीत गळून पडावं वाटते रे.. आणि काळजी करू नको तिथं सारी आपलीच तर माणसं आहेत.. ”

वटी बाबांनी नाईलाजाने आजोबांना गावी नेऊन सोडलं होतं…

“ महिन्या-दीड महिन्यातून मी येऊन जात जाईन.. काळजी घ्या.. ”

“ काय बी काळजी करू नगा दादा. आमी हावोत समदे… सवड घावंल तवा येत जावा…”

बाबा निघणार म्हणून भेटायला आलेल्या गावच्या पाटलांनी आजोबांच्या ऐवजी उत्तर दिले होते. त्यांनीच सकाळी शेजारच्या गावातील पोस्टातून फोन करून आजोबा गेल्याचे कळवले होते..

गाडीवाटेने त्याने चालायला सुरुवात केली तसे त्याला हे सारे आठवले. काही आठवणीतले.. काही आई-बाबांनी नंतर कधीतरी सांगितलेले..

तो चालत होता. वरून ऊन तावत होतं. गाडीवाटेचा फुफुटा तापला होता. चालून चालून तो दमला होता.. कुठंतरी सावलीला थांबावं असं त्याला वाटत होतं. त्याची नजर सावली शोधत राहिली..

त्याच्या शाळेतील विज्ञानाच्या सरांच्या तोंडात नेहमी एक वाक्य असायचे ‘ गरज ही शोधाची जननी आहे.. ‘ त्याच्या मनात आले विज्ञानतच कशाला दैनंदिन जीवनातही गरजच शोध घ्यायला भाग पाडते.. आपण सावलीची गरज आहे म्हणून तर झाड शोधतोय.. एवढं रणरणतं ऊन नसते.. तर झाड शोधले असते का? शोधायचे राहू दे..

समोर असतं तरी आपल्याला त्याची जाणीवही झाली नसती.. आपण तसेच पुढे गेलो असतो.. ’

आधी तो विचारांना पकडण्यासाठी धावायचा. आताशा विचार अनाहूतपणे येऊन त्याला पकडत होते.. विचारांबरोबर पाठशिवणी खेळत तो पुढे जात होता.

रस्त्याकडेला झुडपं होती पण त्यांची सावली त्यांच्यातच विरुन गेली होती. दूर खिंडीच्या चढावाला मोठं डेरेदार झाड दिसत होतं.. सावलीसाठी तिथंपर्यंत जाणं भाग होतं.. ‘अभावाशिवाय कुणाचे, कशाचे महत्व उमगत नाही हेच खरं.. ’ दूरच्या झाडाकडे पहात असताना त्याच्या मनात आले. तो स्वतःशीच हसला.. आणि सावलीत लवकर पोहोचण्यासाठी जरा वेगाने चालू लागला. सावलीत आल्यावर तो सुखावला. खांद्याला अडकवलेली बॅग काढून त्यातून पाण्याची बाटली काढली.. थोडेच पाणी शिल्लक होते.. ‘अजून अंदाजे दोन मैल तरी चालावं लागणार आहे.. ’ बाटलीतील पाणी पाहताच त्याच्या मनात विचार आला. पाणी काहीसे उबळ झाले होते. त्याने पाण्याचे दोन घोट घेतले आणि थोडे पाणी बाटलीत शिल्लक ठेवून बाटली बॅगेत ठेवली.. ‘आपण घरी असतो किंवा दुसरे पाणी उपलब्ध असते तर असे उबळ पाणी प्यालो असतो का? ‘ त्याच्या मनाने स्वतःलाच प्रश्न विचारला.

थोडा वेळ सावलीत काढून तो पुढे निघाला…थोडेसेच अंतर गेल्यावर घशाला परत कोरड पडली.. पण तो तसाच चालत राहिला.. गावाची शिव अली तसा तो थांबला बाटलीतले उरलेले सर्व पाणी प्याला आणि चालू लागला. तहान भागली तर नव्हतीच उलट जास्तच लागली होती. वाटेत रानातली वस्ती लागली तसा तो थबकला.. वस्तीजवळच्या झाडाच्या सावलीत बसलेल्या म्हातारीनं त्याला थबकेलेलं पाहिले आणि डोळ्यावर आडवा पंजा धरून त्याला ओळखण्याचा प्रयत्न करीत विचारले,

“ कोण हाय रं? “

“ आज्जी, पाणी मिळेल का प्यायला..? ” 

“ ये बाळा. “ 

तिनं उठून वस्तीच्या बाहेर दांडीवर असणारे बसायचे पटकुर आणून सावलीत अंथरलं.. तोवर तो तिथं पोहोचला होता. ‘ बस बाळा.. ‘ म्हणत तिने आतून आणून रांजणातल्या थंडगार पाण्याचा तांब्या त्याच्यापुढे धरला. तो घटाघटा पाणी पिणार तेवढयात तिने त्याला थांबवले..

“ लेकरा, उनातनं आल्याव असे घटाघटा पाणी पिऊने… आदी बस वाईच…”

तो निमूट बसला.

“ कवा बघितलं न्हाय तुला गावात.. पावणा आलायस व्हय? कुनाकडं? “

“ आज्जी, पाहुणा नाही गावचाच आहे मी? ”

“ गावचा? आन कवा दिसलाबी न्हाईस की,? कुनाचा ल्योक रं? “

 त्याला खरंतर आज्जीच्या चौकस वृत्तीच आश्चर्यही वाटलं होतं आणि ती ज्या पद्धतीने विचारत होती त्याचे हसूही आले होते. पण तो हसला नाही. जाणता झाल्यापासून खेडेगावात असा तो पहिल्यांदाच आला होता. शहरात अडचणीच्या वेळीसुद्धा कोण कुणाची चौकशीही करत नाही आणि इथं या वस्तीवर अनोळखी माणसाबद्दल आपुलकीने भरलेले आणि भारलेले वातावरण… ।

 “ आज्जी, मी इथं नसतो.. आप्पा खोतांचा नातू मी.. ”

 “आप्पांचा नातू व्हय..? आप्पा म्हंजी देवमानुस.. लै उपकार हायती बग गावावं त्यांचं..

आमच्यावं बी. “

 वीस, बावीस वर्षापूर्वी गेलेल्या आजोबांचे अजूनही इतकं नाव निघतंय याचे त्याला आश्चर्य वाटले.

 “ आप्पांचा ल्योक आन सून आक्शीडंटमंदी ग्येलं.. लै वाईट झालं बग.. त्येंचाच पोरगा नव्हका तू,? ”

 वर्षाभरापूर्वी अपघातात गेलेल्या आई-, वडिलांची आठवण येऊन त्याचे डोळे भरून आले..

 “ गप लेकरा.. गप. जलमाला घालणारा आन न्हेणारा त्यो वर बसलाय… त्येच्या म्होरं कुनाचं काय बी चालत न्हाय बग.. ”

 आज्जीने पुढं होऊन पदराच्या शेवानं त्याचे डोळे पुसले. आई-बाबा गेल्याचे समजल्यावर वाटेकरी येऊन गेला होता. गावात तेवढा एकच माणूस त्याच्या ओळखीचा होता. अचानक गावी यायला निघाल्यावर ‘काही कारणाने वाटेकरी भेटला नाही तर आपलं कसं होईल? ’ असा प्रश्न त्याला पडला होता.. आज्जी भेटल्यावर त्याला स्वतःला पडलेल्या प्रश्नाचे ही हसू आले होते.

 “ दुपारचा वखत हाय. दोन घास खाऊन घे.. ”

आज्जी वस्तीवरच्या घरात जाता जाता म्हणाली. खरंतर त्याला भूक लागली होती पण ओळख ना पाळख कसं जेवायचे? तो ‘नको आज्जी.. ’ म्हणाला पण त्याचे ते शब्द आज्जीच्या कानापर्यंत गेले असले तरी मनापर्यंत गेले नव्हते.

 जर्मनच्या थाळीत तो पहिल्यांदाच जेवत होता. आज्जीनं घरातून बांधून आणलेलं जेवण.. तेल चटणी, कांदा, भाकरी आन उसळ.

 ‘खा लेकरा.. ’

ते जेवण आज्जीसाठी बांधून आणलेलं आहे हे त्याच्या लक्षात आले होतं.. पुढं आलेल्या अन्नाचा आणि आज्जीच्या मायेचा मान म्हणून त्याने अर्धी भाकरी खाल्ली..

 “ आरं, लाजू नगं.. प्वाटभर खा.. ”

 “वाटेत भरपेट खाणं झालंय आज्जी.. ”

 तो उठून हात धुता धुता आज्जीला म्हणाला.

क्रमशः भाग पहिला 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted