सुश्री गायत्री हेर्लेकर
☆ जीवन रंग ☆ हातातोंडाशी आलेला घास ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆
आठवडाभर पाठपुजा, रुद्राभिषेक आणि आज समाप्तीचे होमहवन, उत्तम प्रसाद, ब्राह्मणभोजन सर्व काही अगदी मनासारखे यथासांग पार पडले. सदाशिवने कशात काहीच उणीव भासू दिली नाही. यामुळे तृप्त झालेल्या यजमानांनी भरघोस दक्षिणा, त्याला धोतर उपरणे, त्याची बायको आणि आईला साडी चोळी असा घसघशीत आहेर केला. दक्षिणेचे पैसे तृप्त भावनेने, सदाशिवने देवळात महादेवापुढे ठेवले. डोके ठेवून मनोभावे दंडवत घातला…
“देवाधिदेवा महादेवा तुझीच कृपा. माझ्यासारख्या सामान्य भक्ताची तुलाच काळजी. मोठ्या विवंचनेतुन सोडवलेस देवा.. कोटी कोटी प्रणाम केले तरी पुरणार नाहीत एवढे उपकार केलेस.” डोळे मिटून शांतपणे प्रार्थना केली.
दुर्गम भागातील डोंगरावर असलेले ते देऊळ -महादेवाचे जागृत स्थान होते. फार जाहिरातबाजी नाही आणि येणे जाणे तसे कष्टाचे म्हणुन भक्तांची वर्दळ तशी मर्यादित. या वर्षी तर तीही रोडावली.
आता पावसाळा तोंडावर आल्याने भक्तांचे येणे केंव्हाही बंद होईल अशीच परिस्थिती होती. दर वर्षीच्या मानाने यावर्षी मिळकत तर खुपच कमी झाली. वर्षभर कसे निभावायचे ही विवंचना. शहरात शिक्षणासाठी रहाणार्या दोन मुलांची फी – रहाण्याचा खर्च, देवळाच्या सुधारणेसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते. आईच्या औषधपाण्याचा खर्च. घराची थोडी डागडुजी करावी लागणार तो खर्च. सदाशिवच्या तब्येतीची पण
अधूनमधून तक्रार असायची पण पैशासाठी तपासणी करुन घेणे तो टाळत होता. सगळे कसे काय भागवायचे हीच काळजी सदाशिवच्या मनात सतत होती. जमिन गहाण ठेवुन आणखी कर्ज काढले तरी भरमसाठ व्याजामुळे फुगणारे हप्ते कसे द्यायचे?आणि जमिनीचा तुकडा विकून पैसे उभे करायचे तर म्हातारपणी काय खाणार? २, ४ यजमान येऊन जरा काम मिळाले तर ठीक. नाहीतर काही खरे नाही.
पाठपुजा, अभिषेक, प्रसाद नैवेद्य —सगळे काही अगदी शास्त्रशुद्ध विधीवत सोवळ्यात करायचे ही पारंपारिक प्रथा काटेकोरपणे करणे, यजमानांचे समाधान करणे या बाबतीत सदाशिव कधीच हयगय करत नव्हता. पदराला खार पडली तरी चालेल पण शास्त्रोक्त विधीत तडजोड तो कधीच करत नसे.
त्यामुळे त्याच्याकडे येणारे यजमानही तसे धार्मिक, कर्मठ असायचे. हातातोंडाची गाठ पडण्यास एवढी मिळकत होत असे. पण या वर्षी जरा नव्हे तर चांगलीच ओढग्रस्त परिस्थिती त्याच्यापुढे उभी होती. महादेवच निभावून नेईल असे त्याला वाटत होते.
आणि महादेवाच्या कृपेने एक चांगले यजमान आले. ७ दिवस लघुरुद्र, रोज दुग्धाभिषेक, रोज ब्राह्मण भोजन, होमहवनाने समाप्ती. –सर्व काही शास्त्रशुद्ध पध्दतीने यथासांग पार पडल्यामुळे यजमान संतुष्ट झाले. मिळकतही चांगली झाली. सदाशिवची थोडी का होईना काळजी कमी झाली आणि नेहमीच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने याचे श्रेय महादेवाला दिले. त्याच्या डोळ्यातुन घळघळ वहाणार्या पाण्याने त्याने जणु महादेवाला अभिषेक घातला.
शांतपणे, डोळे मिटून, नतमस्तक होऊन नमस्कार करणारी त्याची आई आणि भांबावलेल्या नजरेने त्या दोघांकडे बघणारी, काहीशी कावरीबावरी झालेली त्याची बायको –उमा-मागे उभ्या होत्या. उभे राहुन, डोळे पुसत सदाशिवने वळुन पाहिले. आईच्या पायावर डोके टेकुन नमस्कार केला. उमाकडे बघत, “उमा, तुमची अडचण आली नाही म्हणुन हे सर्व सुखरुप पार पडले. नाहीतर शक्यच नव्हते. हातातोंडाशी आलेला घास गेला असता. महादेवाची कृपाच. “
हातातोंडाशी आलेला घास गेला असता हे ऐकल्यावर उमाने भरल्या डोळ्याने सासूकडे बघितले. तिला जे पाप वाटत होते ते करायला लावताना काल रात्री सासू हेच म्हणाली होती. “हातातोंडाशी आलेला घास जायला नको. ” सदाशिवने ७ दिवसांचा हा कार्यक्रम पत्करला तेंव्हाच उमाला धाकधुक वाटत होती. पाळी जाण्याचे वय झाल्यामुळे आताशा ती नियमित होत नव्हती. ऐनवेळी अडचण नको म्हणुन सदाशिवच्या कानावर घालुया असे उमा सासुला म्हणाली. पण सासूने, “अग, पैशाची आपल्याला किती गरज आहे माहित आहे ना. तु गप्प रहा. महादेव आहे पाठीराखा. अडचण आली तर पुढचे पुढे बघु, ” म्हणुन सासूने तिला काही बोलु दिले नाही.
सासु-सुन दोघीही “आजचा दिवस पार पडु दे रे देवा, ” म्हणुन रोज देवाला साकडे घालत, देवावर श्रध्दा ठेवुन सर्व करत होत्या. रोजची पुजापाठाची, अभिषेकाची तयारी, १०, १५ माणसांचे चहापाणी, नाष्टा, फराळाचे, जेवणाचे –त्यासाठी सामानाची, धान्याची, दुधातुपाची जुळवाजुळव –एकंदरीत बरेच काम-त्यात दिवस कसे गेले हे समजले नाही. होता होता ६वा दिवस उजाडला. उमाला जरा थकल्यासारखे वाटत होते. तरी दुपारपर्यंत सगळे काही रेटले. पण संध्याकाळी ज्याची भिती होती तेच झाले.
सासूबाईंना सांगितल्यावर त्या आधी थोड्या चिडल्या. पण सुनेवर चिडुन उपयोग नाही. हे त्यांनी जाणले. संध्याकाळचे फारसे सोवळे नव्हते म्हणुन जे काही करायचे ते करुन त्यांनी ढकलून नेले. “उमा कुठे आहेत? “म्हणुन सदाशिवने विचारल्यावर “उद्याची तयारी करते” म्हणुन वेळ मारुन नेली.
नंतर सायंप्रार्थनेसाठी देवळात गेल्या. सायंकाळी तशा त्या गाभाऱ्यात जात नसत. पण आज जाऊन महादेवाच्या पिंडीच्या बाजुला जरा लांब बसल्या. डोके शांत ठेवुन बराच वेळ विचार केला. त्यांचे सनातन मन हो-नाहीच्या चक्रात फिरत होते. पुढील वर्षभराचे दारुण चित्र डोळ्यापुढे उभे राहिले, मुख्य म्हणजे सदाशिवची वरचेवर बिघडणारी तब्येत. पैशासाठी तो चालढकल करतो. पण त्याची तपासणी होऊन वेळेवर औषधपाणी व्हायला पाहिजे. आता उद्याची समाप्ती व्यवस्थित झाली नाही तर तो यजमानांकडुन एक पैसाही घेणार नाही. उलट प्रायश्चित्त घेणार.. त्याचा त्रास करुन घेणार. मदतीसाठी कुणाला बोलावणे त्याच्या तत्वात बसणार नाही. हा सर्व विचार त्यांनी केला. डोके टेकुन नमस्कार करुन झटक्यात उठून घाईघाईने, पण निश्चयी मनाने, त्या घराकडे परतल्या.
“उमा, उमा, तिकडली कामे पुरेत. इकडे ये — विरजण घालायचे, डाळी भिजत टाकायच्या –मीठमसाला काढून ठेवायचा, विडे करायचे – किती कामे पडलीत, आत ये आणि भराभर आवर. पाच पंचवीस माणसांचा पुरणावरणाचा स्वयंपाक म्हणजे सोपे काम नाही. लवकर उठुन कामाला लागायला पाहिजे. नैवेद्याचे ताट घेऊन तुलाच देवळात वेळेवर जायला पाहिजे. “
आत आलेल्या उमाच्या मनात सदाशिवचा विचार आला. भांबावलेल्या उमा काही बोलणार विचारणार, त्याआधीच सासू दबक्या आवाजात, “हे बघ महादेवाला मी सांगीतले, आता तुझे आढेवेढे नकोत, हातातोंडाशी आलेला घास थोडक्यासाठी घालवु नकोस. “
आता सदाशिव तेच म्हणाला –“हाता तोंडाशी आलेला घास”.
— तो आपण वाचवला खरा. पण हे बरे केले का? का पाप घडले आपल्याकडून?याची देव शिक्षा देतील. याचे प्रायश्चित्त कसे करुन घ्यावे. ? हा विचार करत ती खाली मान घालुन घराकडे निघुन गेली.
सासूने ते पाहिले, तिच्या डोळ्यात आता मात्र पाणी आले. भरले डोळे मिटून, महादेवाला नमस्कार करत ती, ” देवा महादेवा, तु सर्वज्ञ.. तुझ्यापासून काय लपून रहाणार? तिने या परिस्थितीत आज शेवटच्या दिवशी तुझ्या प्रसादाचे भोजन तयार केले. म्हणुन ती भांबावलीआहे. पण यात तिची काहीच चुक नाही. सदाशिवला चालणार नाही म्हणुन ती करायला तयारच नव्हती. पण मीच तिला हे करायला भाग पाडले. या पापाची जी काय शिक्षा असेल ती मला दे. आता निदान माझ्या मुलाला औषधोपचार करता येईल, माझ्या नातवंडांचे शिक्षण थांबणार नाही. मुलाची विवंचना थोडीफार तरी कमी होईल, यातच मला समाधान आहे”
मनातील विचार बाजुला सारून, सदाशिवच्या आईने डोळे पुसले. स्थिर मनाने देवळातून घराकडे गेली. ओटीवर रडत बसलेल्या सुनेकडे – उमाकडे कपड्याचे गाठोडे टाकत, ” हे घे,. जा आता परसदारी. घरातले बाकीचे मी आवरते. महादेवाची माफी मागुन आले. आता काळजी करु नकोस. डोळे पुस आता. ” म्हणून स्वतःचे डोळेही हळूच पुसले.
– – आपल्या सनातनी पण तितक्याच व्यवहारी, करारी सासूकडे पहात तिने भरल्या डोळ्यांना पदर लावला…. दोघीनी मंद हसत एकमेकींकडे बघितले.
© सुश्री गायत्री हेर्लेकर
201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.
दुरध्वनी – 9403862565
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




