सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ अमरकृती आणि बत्तासा – भाग १ – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆ मराठी अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
भद्रजी, स्थानीय स्तरावरील श्रेष्ठ कवी होते. त्यांच्याकडे कोणत्याही वेळी, कोणत्याही प्रकारची कविता तयार असायची आणि तयार नसेल, तर ऑर्डर ‘प्लेस’ करताच चोवीस तासाच्या आत वृत्तपत्राच्या कार्यालयात ती पोच केली जायची. त्यांची अशी ‘प्रॉम्प्ट सर्व्हिस आणि ‘होम डिलिव्हरी’ यामुळे शहरातील एखादंच अपावादात्मक वृत्तपत्र असेल, की ज्यात त्यांची कविता छापली गेली नसेल. असं असलं, तरी एक दु:ख भद्रजींना सलत असायचं. गल्ली-बोळातल्या नाव असलेल्या, नसलेल्या वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता छापल्या जात असल्या, तरी अजून कोणी माईचा लाल प्रकाशक त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित करत नव्हता. पुस्तकरूपात काही प्रकाशित न झाल्यामुळे कुणी साहित्यिक संस्था भद्रजींना साहित्यिक मानायला तयार नव्हती. अखेर एक दिवस भद्रजींनी ‘काला अक्षर भैंस बराबर’; साहित्यिक समज असणार्या आपल्या बायकोशी याबाबत चर्चा केली आणि आपलं पुस्तक आपण स्वत:च काढायचं असा निर्णय घेतला.
श्री भगवान वैद्य `प्रखर’
दुसर्या दिवसासून भद्रजींचा ‘ पुस्तक प्रकाशन यज्ञ’ सुरू झाला. भविष्य निर्वाह निधी आणि सोसायटीतून घेतलेल्या कर्जाची त्यात आहुती पडू लागली. दुकान-न्- दुकान स्वत: बघत त्यांनी कागद खरेदी केले. डोळ्यात तेल घालून प्रूफ रीडिंग केलं. बाईंडिंग करताना हात काळे करून घेतले आणि आपल्या बारकाईने केलेल्या देखरेखीखाली, ‘अमरकृती’ नावाने आपला अनोखा काव्यसंग्रह तयार केला.
भद्रजींना खात्री होती, की त्यांचा कविता संग्रह छापला जाताच सगळ्या शहरात खळबळ उडेल. लोकांची गर्दीच गर्दी होईल. सगळ्या वर्तमानपत्राचे वार्ताहर बगलेत फोटोग्राफरना घेऊन, घराच्या दरवाजाशी धूळ खात उभे रहातील. पुस्तकाची पहिली प्रत तयार होताच, प्रेसवाला स्वत:च पळत पळत वर्तमानपत्राच्या कार्यालयात ही गुप्त बातमी पोचवून येईल, की शहरात एका महान कवीच्या महान कविता संग्रहाने, ‘न भूतो न भविष्यति’ असा जन्म आत्ता आत्ता एवढ्यातच घेतलाय. पण झालं काही वेगळंच. पुस्तकांचे गठ्ठे रिक्षावर लादताच, प्रेसवाल्याने भद्रजींच्या चालणार्या कमी पण हलणार्या जास्त मार्का सायकलीत आपली तंगडे अडकवले आणि म्हणाला, ‘महाशय आपली पुस्तके छापली गेली आणि आपण त्याच्या सगळ्या प्रती रिक्षावर चढवल्यातसुद्धा, पण माझे बील काही दिले नाहीत. आधी बील चुकते करा. मगच रिक्षा पुढे जाईल. भद्रजींनी आपली दुचाकी मागे घेत घेत म्हंटलं, ‘यार, जरा लाज बाळग. ही तुझ्या छापखान्यात छापलेली निवडणुकीची पोस्टर्स किंवा साड्यांच्या रीडक्शन सेलची पॅम्प्लेट्स नाही आहेत. ही साहित्यातील सर्वोत्तम विधा ‘कवितांची’ पुस्तके आहेत आणि तीही माझ्या कवितांची. थोडा धीर धर. ही पुस्तके तुला एवढी कीर्ती मिळवून देतील, जेवढी वीस वर्षात तुला हजारो टन कागद छापून मिळाली नसेल. केवळ तूच नाही, तर तुझ्या सात पिढ्यांना सांगताना अभिमान वाटेल, की ‘अमरकृती’ पुस्तक तुझ्या छापखान्यात छापले होते. राहता राहिली गोष्ट बिलाची. तर मी या महिनाअखेरीपर्यन्त तुझे बील चुकते करीन. पुस्तके दुकानात ठेवायचाच अवकाश. प्रती हातोहात खपतील. सहा महिन्यात जर दुसरी आवृत्ती नाही निघाली, तर माझं नाव भद्र नाही, अभद्र ठेव. ‘
प्रेसवाला म्हणाला, ‘तुझं साहित्य गेलं खड्ड्यात आणि हवं तर तू पण जा. जाण्यापूर्वी माझं बील मात्र चुकतं करून जा. अरे, तुम्ही कविता छापून घेणार्या लोकांपेक्षा छात्रसंघाच्या मतपत्रिका छापणं चांगलं. हजार-पाचशे छापल्या आणि गठ्ठा फेकला की पैसे हजर. छात्रसंघाच्या मतपत्रिकांच्या तूलनेत कविता छापणं किती महत्वाचं आहे, हे सांगण्यासाठी भद्रजींनी त्याच्यापुढे डोकं फोडलं, पण त्यांना वाटलं, सारी गीता म्हणजे म्हशीपुढे बीन वाजवण्यासारखं आहे. तेव्हा त्यांनी संतापून, आपल्या एकुलत्या एका बायकोची, तर्जनीत अडकवलेली अंगठी आणि आपल्या मनगटात बांधलेलं घड्याळ काढलं आणि प्रेसवाल्याकडे जवळ जवळ फेकत म्हणाले, ‘आज तुला या भद्रची कद्र नाही. पण बघ. पुस्तक मार्केटमध्ये जाण्याचाच उशीर. आठ दिवसात माझ्या प्रेमाची ही निशाणी तुझ्याकडून सोडवून घेऊन जाईन, तेव्हा तुला कळेल, भद्र नावाचीही कुणी चीज आहे. ‘
पुस्तके रिक्षावर लादून नेता नेता भद्रजींना शंका आली, की प्रेसवाल्याशी वाद घालता घालता लोकांना कुणकुण लागली की भद्रजी पुस्तक रुपात छापले गेले आहेत. लोकांनी हातांनी पैशाची बरसात करत, ते रिक्षावर तुटून पडले आहेत आणि घरी पोहोचे पोहोचेपर्यंत रिक्षा पुस्तकांच्या जागी नोटांनी भरलीय. पण असं काही अघटित घडलं नाही. नेहमीप्रमाणे रस्त्यावर लोकांची ये-जा चालू होती. लक्ष्मी वाटसरूंच्या खिशामध्ये आणि सरस्वतीची अस्मिता रिक्षामध्ये सुरक्षित राहिली. भद्रजी आपल्या रिक्षातील सहाशे प्रतींसकट सही सलामत घरी पोचले. दरवाजात बायकोने पुस्तकांचे गठ्ठे बघितले, तेव्हा चकित होऊन भद्रजींना म्हणाली, ‘हाय दय्या! आपण तर म्हणत होतात, एक पुस्तकच लिहलं आहेत आपण, पण इथे तर इतकी सारी पुस्तके दिसताहेत. ही सगळी आपणच लिहिलीत?’ ही पांडित्यपूर्ण प्रशंसा कॅश करत भद्रजींनी संधीचा फायदा उठवला आणि पुस्तक –प्रकाशनासाठी बायकोची परवानगी मिळवली.
तिसर्या दिवशीच एक साधासा पण महत्वाचा, श्रेष्ठ, दर्जेदार कार्यक्रम आयोजित केला गेला. साधासा अशासाठी की तो आर्थिकदृष्ट्या ‘गरिबाची गोधडी’ वाटत होता आणि महत्वाचा, श्रेष्ठ, दर्जेदार अशासाठी, की ज्या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते, ते कवितांचे पुस्तक होते. आणि त्या काळात दर्जेदार हा शब्द कवींच्या कैदेत किंवा कवेत म्हणूयात हवं तर, होता. त्यामुळे तो शब्द ज्याला हवा तेव्हा आणि हवा तसा तो वापरू शकत होता. असो.
भद्रजींना खात्रीच होती की प्रकाशन होताच शे-दोनशे प्रती हातोहात खपतील जसं काही कवितेचं पुस्तक नाही, रिलायन्स कंपनीचा शेअर आहे. म्हणून त्यांनी चालू महिन्याचं सगळं बजेट प्रकाशन समारंभावर कुर्बान केलं होतं. प्रकाशन समारंभाच्या वेळी त्यांनी काही पुस्तके मंचावरील पाहुण्यांना वाटली, तेव्हा उपस्थितांना वाटलं की बत्तासे वाटणं चालू आहे. त्यामुळे प्रत्येकाने हात पुढे केला. एकाच वेळी अनेक हात पुस्तकापुढे होताहेत, हे दिसताच भद्रजी भावविभोर झाले आणि मुक्त हस्ते पुस्तके वाटू लागले. पण थोड्या वेळाने भावनेची तीव्रता कमी झाली आणि ते धरातलावर उतरले, तेव्हा त्यांनी उपस्थितांचे लक्ष पुस्तकाच्या त्या हिश्श्यावर केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला, जिथे पुस्तकाचे मूल्य छापले होते. पण लोक तर असे, पूर्ण पुस्तक समजून घेऊ इच्छित होते, पण त्या किंमत छापलेल्या भागाकडे डोळे उचलून बघायलादेखील तयार नव्हते.
समारंभ संपल्यावर भद्रजींनी हिशेब केला, दोन-अडीचशे प्रती वाटल्या गेल्या होत्या. त्यांनी ही आपली ‘इन्व्हेस्ट्मेंट’ मानली. आणि विचार करू लागले, दोन-अडीचशे लोक माझी ’अमरकृती’ एकदम वाचतील, तेव्हा शहरात अशी काही खळबळ माजेल, प्रत्येकाच्या जिभेवर पुस्तकाची चर्चा असेल. गल्ली-बोळातला प्रत्येक जण मला आदराने नमस्कार करेल आणि त्याचा परिणाम असा होईल, की पुस्तक विक्रेते स्वत:च माझं घर शोधत इथे येतील आणि ’अमरकृती’च्या उरलेल्या प्रती मी म्हणेन त्या रॉयल्टीवर विक्रेते घेऊन जातील. पण हाय रे नशिबा, न खळबळ माजली, न धूळ उडाली. ज्या शहराने मोठमोठ्या योद्ध्यांना त्यांच्या तीरंदाजीसकट पचवलं आणि ढेकरसुद्धा दिली नाही, त्या शहराने ’अमरकृती’च्या दोन-अडीचशे प्रती सहज पचवल्या.
ही घटना भद्रजींनी गंभीरपणे घेतली. त्यांनी प्रथमच आपल्या आतील तथाकथित महान साहित्यकाराच्या देहाची ऊंची खरवडून कमी केली. आणि स्वत: पुस्तक विक्रेत्यांकडे जाऊन त्यांचा अनुनय – विनय करत म्हणाले ‘ आपण माझं अभिनव पुस्तक ’अमरकृती’च्या काही प्रती आपल्या दुकानात ठेवा. विकली गेल्यावर किमतीच्या तीस टक्के आपले आणि सत्तर टक्के माझे. पण इथेदेखील भद्रजींच्या नशिबाने त्यांना साथ दिली नाही. कुठलाही दुकानदार तीस / सत्तरच काय, सत्तर / तीसनेही त्यांची पुस्तके दुकानात ठेवायला तयार झाला नाही.
भद्रजींना आयुष्यात पहिल्यांदाच या शहरात राहिल्याचं दु:ख झालं. त्यांनी विचार केला, मी दिल्लीत, बनारस, अलाहाबाद किंवा लखनौमध्ये असतो तर…. आणि ’अमरकृती’ तिथून प्रकाशित झाली असती तर… आज कुठच्या कुठे गेली असती. माणसाने स्वत: बनवलेली आपली मनोहर प्रतिमा खंडीत होते, तेव्हा तो त्याचा दोष आपल्या आसपासच्या परिवेशावर थोपत असतो. भद्रजींनी हेच केले.
– क्रमश: भाग १
मूळ हिन्दी लेखक – भगवान वैद्य ‘प्रखर’
30, गुरुछाया कालोनी, साईंनगर, अमरावती 444607
संपर्क : मो. 9422856767, 8971063051 * E-mail: vaidyabhagwan23@gmail.com * web-site: http://sites.google.com/view/bhagwan-vaidya
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





