सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ अमरकृती आणि बत्तासा – भाग २ – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆  मराठी अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री भगवान वैद्य `प्रखर’

(मागील भागात आपण पाहिले- भद्रजींना आयुष्यात पहिल्यांदाच या शहरात राहिल्याचं दु:ख झालं. त्यांनी विचार केला, मी दिल्लीत, बनारस, अलाहाबाद किंवा लखनौमध्ये असतो तर…. आणि ’अमरकृती’ तिथून प्रकाशित झाली असती तर… आज कुठच्या कुठे गेली असती. माणसाने स्वत: बनवलेली आपली मनोहर प्रतिमा खंडीत होते, तेव्हा तो त्याचा दोष आपल्या आसपासच्या परिवेशावर थोपत असतो. भद्रजींनी हेच केले.) आता इथून पुढे — 

एक दिवस हताश होऊन त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उरलेल्या पुस्तकांचे गठ्ठे बांधले आणि आपला बेड किंवा दिवाण किंवा सोफा…. तुम्ही काहीही नाव द्या, त्याखाली सरकवून ठेवले आणि दुसर्‍या दिवसापासून हे विसरण्याचा प्रयत्न केला, की त्यांनीही एक पुस्तक प्रकाशित केलय, ज्याच्या चारशे प्रतींचा एक गठ्ठा, त्यांच्या बारा बाय दहा, बाय दहाच्या संसारात, चार बाय चार, बाय तीन फुटाची जागा घेरून आकसून बसलाय. पण भद्रजींची बायको अशी, की ती काही त्यांना पुस्तकांची आठवण करून देण्याची संधी सोडत नव्हती. तिचं दु:ख हे होतं की सकाळ संध्याकाळ झाडू मारताना तो गठ्ठा मधे मधे यायचा. ती काही क्षण त्यांच्याकडे टवकारून बघायची. मग या कोपर्‍यातून त्या कोपर्‍याकडे, त्या कोपर्‍यातून या कोपर्‍याकडे आपटायची. कधी त्यावर बसून बैठ्या स्टुलासारखा त्याचा उपयोग करायची. तर कधी भेटीसाठी घरी येणा-यांच्या लहान मुलांसाठी सिंहासन बनवायची.

भद्र–निवास स्थित या पूर्णत: उपेक्षित वस्तूला (अमरकृतीचा गठ्ठा) अगदी प्रथम बाहेरच्या ज्या व्यक्तीने जवाहर्‍याच्या नजरेने पाहिले, तो एक रद्दीवाला होता. त्याने भद्रजींची एकमात्र साहित्यकृती आपल्या नजरेने तोलली आणि भद्र–निवासवरून जाताना रद्दीच्या वाढलेल्या भावाची घोषणा केली. भद्रजी संध्याकाळी घरी परत आले, तेव्हा त्यांच्या बायकोने अर्थपूर्ण जिज्ञासा प्रगट केली,

‘असं ऐकलं, की रद्दीचे भाव आज-काल वाढलेत. ’

‘तुला कसं कळलं?’

‘आज रद्दी खरीदणारा आला होता. तो म्हणाला. ’

‘रद्दी खरीदणारा इथे कशाला आला होता? ‘अमरकृती’च्या प्रकाशनानंतर तंगीमुळे आपण वर्तमानपत्रसुद्धा विकत घ्यायचं थांबवलय. ’

‘ या मेल्या गठ्ठयाकडे बघून आला होता. सकाळी खोली साफ केली, तेव्हा हा दरवाजाशी उन्हात म्हणून ठेवला होता. वीस…. तीस किलो तरी असेलच. मांजराचा गू लिंपण्यासाठी उपयोगी नाही, ना सरवाण्यासाठी. ’

‘अमरकृती’च्या उरलेल्या प्रतींच्या बाबतीत श्रीमती भद्रचे स्पष्ट मत आणि त्यात लपलेला गठ्ठा-निवृत्ती प्रस्ताव ऐकून भद्रजींचं मन खिन्न झालं. त्यांनी भरल्या गळ्याने पत्नीला म्हंटलं, ‘भानुमती, काय वाटेल ते होऊ दे. मी माझी ‘अमरकृती’ रद्दीच्या भावात कधीच विकणार नाही. माझ्या ‘अमरकृती’च्या बाबतीत समाज जसा वागलाय, तसं प्रत्येक महान साहित्याकाराच्या महान कृतीबाबत होत आलय. त्यामुळे मला आशा आहे की तो दिवस कधी तरी उजाडेल, की ज्या दिवशी लोक मला शोधत या गल्लीत येतील आणि खाटेच्या खाली असलेले ‘अमरकृती’चेगठ्ठे कारमध्ये घालून घेऊन जातील. ’

भानुमतीच्या दृष्टीने भद्रजींच्या बाकीच्या गोष्टी समजण्याच्या पलीकडच्या होत्या, पण ‘काय वाटेल ते होऊ दे’, हा शब्दबंध तिने अगदी घट्ट पकडून ठेवला आणि दुसर्‍या दिवसापासून त्यावर अंमल करायला सुरुवात केली. तिने पुस्तकांच्या गठ्ठयाची घराच्या शेगडीशी ओळख करून दिली. हळू हळू हा परिचय घनिष्ठतेत बदलत गेला आणि लवकरच अमरकृती आणि शेगडी हे एकमेकांची गरज बनले. एक दिवस भद्रजींनी आपल्या डोळ्यांनी, अमरकृतीची पाने अग्नीबाणांप्रमाणे शेगडीत उपयोगात येताना बघितली, तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. त्यांना या कल्पनेने अतिशय दु:ख झालं की त्यांचं अमर साहित्य त्यांच्याच घरात, त्यांच्याच जीवनासाठी, शेगडीत जळत जळत हुतात्मा होतय. याबरोबर अमरकृतीला ‘होम’ होण्यापासून कसं वाचवावं, याचा विचार ते करू लागले.

भद्रजींनी अनेक प्रकारे विचार करून बघितला, पण पुस्तके वाचवायचा कुठलाच मार्ग सापडला नाही. सगळ्यात मोठी अडचण ही होती, की शेगडीला पुस्तकांच्या पानांचं व्यसन लागलं होतं. जोपर्यंत शेगडीला पुस्तकाची चार-पाच पाने चाटवत नाही, तोपर्यंत ती धूर ओकणं चालू ठेवायची.

या दरम्यान भद्रजींच्या परिवारात एक घटना घडली. त्यांना पुत्ररत्न झाले. या पुत्राचं वैशिष्ट्य हे होतं, की त्याला शेगडीत पेटलेली आग खूप आवडायची, पण धूर मात्र आजिबात सहन व्हायचा नाही. त्यामुळे थोडासा जरी धूरउठला, तरी सिंहासन बत्तिशीच्या पुतळीप्रमाणे अमरकृतीची एक प्रत पटकन बाहेर येऊन शेगडीची भक्ष्य बनायची.

आठवडाभर विचार केल्यानंतर भद्रजींच्या मनात आलं, जोपर्यंत शेगडीरूपी शमा आणि पुस्तकरूपी परवाना एकाच जागी असतील, तोपर्यंत परवाने शहीद होत रहाणारच. गृहस्थाच्या घरात शेगडीचं स्थान म्हणजे सुवासिनीच्या कपाळावरील कुंकवासारखं अटळ आहे. भद्रजींनी मग एक अशी अनोखी युक्ती शोधून काढली, की दररोज शेगडीवर बळी चढणारी त्यांची अमरकृती चार भिंतींच्या बाहेर पडून एकाच वेळी अनेक हातात पोहोचेल आणि सामाजिक संपत्ती बनून चिरकाल जीवित राहील.

लगेचच भद्रजींच्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम ठरवला गेला. शेजारी-पाजारी, गल्लीवाले अशा अनेक लोकांना बारशाचे आमंत्रण दिले गेले. त्यावेळी बत्ताशांबरोबर अमरकृतीची एकेक प्रत वितरित करायची योजना ठरवण्यात आली. अजूनही दोन-अडीचशे पुस्तके शिल्लक होती. त्यामुळे खूप लोकांना निमंत्रणे दिली गेली. तेवढेच बत्तासेही मागवण्यात आले.

शेवटी एकदाचा तो क्षण आला. अमरकृतीवर एकेक बत्तासा ठेवून ते वाटण्यात आले. बघता बघता दहा किलो बत्तासे आणि अमरकृतीचा पुरा गठ्ठा वाटला गेला. भानुमती खुश होती. तिच्या वन रूम फ्लॅटमध्ये दोन-चार फुटाची जागा रिकामी झाली. भद्रजी खुश होते, कारण त्यांचं पुस्तक सामान्य माणसांपर्यंत पोचलं, ज्यांच्या भावनांना त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शब्द दिले होते, किंवा असंही म्हणता येईल, की ज्यांचं प्रतिनिधीत्व ते पुस्तक करत होतं.

नामकरणाचा समारंभ संपला. आमंत्रित लोक आपापल्या घरी परतले. जमिनीवर हांतरलेली सतरंजी उचलण्यासाठी भद्रजी वाकले, आणि…. आणि त्यांना दिसलं, त्यांच्या अमरकृतीच्या सगळ्याच्या सगळ्या प्रती सतरंजीवर इथे-तिथे विखरून पडल्या आहेत. बत्ताशाचा मात्र एक तुकडाही नजरेला पडत नव्हता.

– समाप्त –

मूळ हिन्दी लेखक – भगवान वैद्य ‘प्रखर’

30, गुरुछाया कालोनी, साईंनगर, अमरावती  444607

संपर्क : मो. 9422856767, 8971063051 * E-mailvaidyabhagwan23@gmail.com *  web-sitehttp://sites.google.com/view/bhagwan-vaidya

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments