श्री सुनीत मुळे
🌸 जीवनरंग 🌸
☆ ओळख – मूळ रशियन कथाकार : एंतोन चेखव – मराठी अनुवाद : सुश्री मेधा देव ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
ओळख!!! ….
एका शहरात एका आडवळणाच्या बसस्टॉपवर आज मात्र दोघेच होते. एक साधारण सव्वीस – सताव्वीस वर्षांची प्रेग्नंट युवती आणि दुसर्या कोपर्यात एक वयस्कर साठी पासष्ठीकडे झुकलेला इसम. दोघेही बसची वाट पहात बसस्टॉपवर उभे होते.
तो इसम मघापासून त्या प्रेग्नंट युवती कडे नी तिच्या त्या गोल वाढलेल्या पोटाकडे बघत होता अतिशय कुतूहलाने!! ती युवती मात्र थोडीशी विचलित, पण तरीही शांत!
मघापासून बघत असलेल्या त्या वयस्कर इसमानी थोडसं पुढे होत धीरानेच विचारलं, ” अशा स्थितीत किती दिवस झाले तुम्हाला? ” त्या युवतीचं मात्र त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती आपल्याच विचारांत हरवून गेली होती. तिच्या मनावरचा ताण, तणाव तिचं ते फ्रस्ट्रेशन सगळं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत होतं. त्या सगळ्या विचारात ती गढून गेली होती. आधी तिने काहीच उत्तर दिलं नाही, मग एकदम भानावर येत थोड्या शांततेने ती अगदी हळुवार पुटपुटली, ” तेवीस आठवडे झाले. “
त्या माणसाने पुन्हा थोडे कुतूहलाने विचारले,
” पहिलीच वेळ आहे? ”
” हो “, ती इतक्या हळू आवाजात म्हणाली की त्याला जेमतेमच ऐकू गेलं.
” काही काळजी नाही करायची, सगळं छान होईल, ” त्यानी तिला धीर दिला. आपला एक हात अलगद आपल्या पोटावर ठेवत तिने समोर कुठेतरी बघितलं. तिच्या डोळ्यात एकीकडे थोडीशी चमक तर दुसरीकडे येणार्या अश्रूंना थोपवण्याचा निष्फळ प्रयत्न, तरीही ती उत्तरली, “होप सो “.
तिच्याकडे बघत तो माणूस म्हणाला ” कधीकधी आपण आपल्यावरच्या ताण तणावामुळे खूप भारावून जातो, पार दबून जातो त्याच्याखाली, खूप बाऊ करतो त्याचा, खरंतर काहीच गरज नसते त्याची.
” असेलही तसे, ” दुःखी आवाजात ती पुटपुटते. तिचा तो दुःखद स्वर ऐकून त्याला तिची खूप दया वाटली. अतिशय करूण नजरेनी त्याने तिच्याकडे बघितले. ती खूप अस्वस्थ आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो हळुवार बोलला, ” तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. मनावर खूप ताण आलाय तुमच्या. तुम्हाला हे सारं सहन होत नाहीये. तुमचा नवरा तुमच्याजवळ नाही आहे का? ” तिने तितक्याच निर्विकारपणे पण तुटलेल्या स्वरात उत्तर दिले, ” त्याने चार महिन्यांपूर्वीच सोडलंय मला. ” ” का? “, त्याने विचारले. ” ते सांगणं फार क्लिष्ट, काॅप्लीकेटेड आहे”, ती म्हणाली.
” ओह, साॅरी, पण मग तुमच्या कोणी अगदी जवळचं, तुमच्या जिव्हाळ्याचे मित्र, मैत्रीण, कदाचित तुमच्या कुटुंबातील!! कोणीच नाहीये का तुमच्याजवळचं, तुम्हाला सांभाळून घेणारं? ” तो विचारतो.
ती एक खोल श्वास घेते नी म्हणते, ” नाही, मी एकटीच रहाते माझ्या डॅडी.. , साॅरी वडिलांबरोबर. पण ते आजारी असतात.
खरंतर आता ती खूप कंटाळलेली असते. बसलासुद्धा नेमका उशीर. दोघांचंही लक्ष आता बस येण्याकडे. त्यामुळे कोणीच बोलत नाही. काही काळ दोघांमधे शांतता. पण त्या माणसाच्या मनात अनेक प्रश्न??
तो एकदम विचारतो, ” तुम्हाला लहानपणी वाटायचे तसेच आजही तुमचे वडील, डॅडी तुम्हाला तितकेच खमके.. तुम्हाला पूर्णपणे सांभाळणारे, आधार देणारे वाटतात? “.
” हो, ते आजही माझे आधारस्तंभ आहेत, ” ती सांगते.. आणि त्याचवेळी तिच्या अश्रूंचा बांध फुटून ते गालावर ओघळतात. ”
त्यांच्या ह्या अशा आजाराच्या स्थितीतही? “.. तो माणूस आश्चर्याने विचारतो, ” काय झाले आहे त्यांना? “
” त्यांना विस्मरण झालंय. आता काहीच आठवत नाही. ते हे ही विसरलेयत की मी कोण आहे? “.
ती एवढं बोलते तेवढ्यात बस येते. ती त्या बाकावरून उठते. आपल्याच विचारात तीन चार पावलं पुढे जाते नी एकदम आठवून मागे वळते… त्या वयस्कर माणसाच्या अगदी जवळ जाऊन प्रेमाने त्याचा हात आपल्या हातात घेत त्याला उठवत हळुवार म्हणते,
” डॅडी चला, आपली बस आलीय. “…….
☆
मूळ रशियन लेखक : एंतोन चेखव
अनुवाद : सुश्री मेधा देव
प्रस्तुती : सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




