श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? जीवनरंग ?

☆ “गोऽऽड चकली…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

नाॅक नाॅक रेवा…

…. ‘दिवाळी’ रेवाच्या घराचा दरवाजा नाॅक करत होती.

शेवटी आज रेवानं दरवाजा उघडला. काय करणार? प्रोजेक्टची डेडलाईन. रियाच्या एक्झॅम्स.

निखीलच्या टूर्स… कुठल्या तोंडानं ” आली माझ्या घरी ही दिवाळी.. ” म्हणणार?

दुनिया सोचती है, आयटीवाल्यांची काय? रोजच दिवाळी..

जिसकी जलती है जान…. जान दो. आजचा रविवार कारणी लावायचा. तिघांचं अमेझिंग शॉपिंग दोन दिवसांपूर्वीच झालेलं.. अँमेझाॅनवर.. आँनलाईन. हल्ली शाॅपींग काय, दर आठवड्याला चालायचं.

दिवाली तो बहाना है…

कुठल्यातरी कंपनीवाल्या लोकांनी, घराची सफाई करून दिलेली. रियानं तर रेडिमेड किल्लासुद्धा आणून ठेवलाय गॅलरीत. फराळ सुद्धा आँनलाईन आँर्डर करून ठेवलाय. सिर्फ चकली छोड के..

– – खरं रेवा तशी हौशी कलाकार. ही आँनलाईन दिवाळी तिला फारशी आवडायची नाही. सगळं चकचकीत असलं, तरी तो दिवाळीचा आनंद आँफलाईन झालेला.. ईस बार नही.. निदान चकल्या तरी घरी करायच्या. थोडा तरी दिवाळीचा फील यायला हवा.. रेवाला स्वतःची ईनव्हाॅल्व्हमेंट हवी होती, दिवाली सेलीब्रेशनमध्ये. चार दिवस फोनाफोनी चाललेली. निखिलच्या आईनं सांगितलं तसं मिक्श्चर. कालच भाजणी दळून आणलेली.

‘ गुड माॅर्नींऽऽऽग रेवा.. ‘मिशन चकली’ स्टार्टस्. ’ 

स्टीलच्या सोऱ्यातून सहज गोल गोल चकल्या पडू लागल्या… किती सोप्प झालंय…

रेवाला ती लहान असतानाची दिवाळी आठवली. जड लाकडी सोऱ्यातून, दात ओठ खावून चकली पाडणारी, रेवा…, , रिया आणि निखील पण सपोर्टला होतेच. छोटी रिया बटर पेपरवर, गोल गोल चकल्या पाडू लागली… रेवाला लहान झाल्यासारखं वाटलं. रेवा अन् निखिल चकल्या तळू लागल्या. खमंग वास सुटलेला. रेवाच्या हेअरडूवाल्या काही चुकार बटांनी त्यांची जागा सोडलेली. त्या घुंगराली बटांनी, मध्येच रेवाच्या हातांनी, ओल्या भाजणीचं लोशन लावलं. या अवतारात रेवा क्युटच दिसत होती.

.. प्रिन्सेस रियाचंही चकली करतानाचं सेल्फीसेशन झालं. निखिलसे रहा नही गया.. त्यानं पटकन् रेवाचा अन् त्याचा सेल्फी घेतला.

एकंदर प्रोजेक्ट चकलीचं टीम वर्क जोरात चाललेलं… हसत… खिदळत… आत्ता कुठं दिवाली माहौल वाटत होता… टी. व्ही, लॅपटाॅप, सेलफोन सगळे सगळे पडिक झालेले.. खमंग चकलीचा घमघमाट सुटलेला… सऽही दिवाली माहौल क्रियेट झालेला.

बस… रेवाला हेच तर हवं होतं. आता खरं दिवाळी आल्यासारखं, वाटत होतं. निदान चकल्या तरी झाल्या हे बघून, रेवा चकल्यांसारखी खुशखुशीत झालेली.

रियानं पटकन् डिश घेतली. चकल्या ठेवून खायला सुरवात. एकीकडे चकल्या तळणं चाललेलं. दुसरीकडे आँनलाईन चकली खाणं.. बढिया….

जमली.. चकली छानच झालेली. चटक मटक चकली.. रेवा जाम खुश… तिला ही खुशी कोणाबरोबर तरी शेअर करावीशी वाटू लागली. आईची सवय आठवली.

…. तिनं पटकन् एक डिश घेतली. पाच सहा चकल्या ठेवल्या. अन् शेजारच्या फ्लॅटची बेल दाबली.

साठेकाकू… रेवाच्या शेजारच्याच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या… दोघचं दोघं. त्यांचा मुलगा स्टेटस् मध्ये.

गेल्या सात वर्षात सात मिनटंही बोलणं झालं नव्हतं..

रेवाच्या कामाच्या वेळाच… रेवाचं हे असं वागणं.. खरं तर हे फ्लॅटकल्चरमध्ये न शोभणारं… तरीही..

साठेकाकूंनी दार उघडलं. प्रसन्न हसल्या. ‘ हॅपी दिवाली ‘ झालं. काकांनी पटकन् चकलीचा तुकडा मोडत, चकलीचं तोंड भरून कौतुक केलं..

…. रेवा उडत उडत घरी.

चकली गोऽऽड झाल्यासारखी वाटत होती.

पाचच मिनिटात साठे काका- काकू, साजूक तुपातले बेसन लाडू घेवून हजर.

आहाहा… मस्त चव… निखिल, रिया जाम खूष.

“आम्ही पण फार काही करत नाही फराळाचं. रेडिमेडच आणतो. लाडू तेवढे करते. दोघंच दोघं किती खाणार? “

“ पुढच्या वेळी लाडूचं प्राॅडक्शन डबल करा…”.. निखिल हक्कानी नेटवर्कसारखं बोलला.

“ अन् चकलीचंही.. ” साठेकाकांनी टाळी दिली.

मस्त दोन तास गप्पा चाललेल्या. रिया नवीन आजी आजोबांवर जाम खूष. घर भरल्यासारखं वाटत होतं.

आनंदानं ‘दिवाळी’ रेवाच्या घरात शिरली होती.

खरं सेलीब्रेशन. दिवाली का मजा तो ‘सब’के साथ आता है.. अकेलेमें तो सिर्फ फेसबुक पढा जाता है…

रेवानं केलेली चकली.. दिवाळीला गोऽऽड करून गेली… 

!!! हॅप्पी दिवाली!!! सर्वांनाच…

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments