डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? जीवनरंग ?

☆ अद्वैत… भाग – २ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(नकळतच तिने आपले दोन्ही ओठ अंमळ विलग केले. मुलीने त्यात ओतलेले गंगाजलाचे थेंब तिच्या तोंडात गेले. तरीही ते थेंब घशातून गिळायचे त्राण काही तिच्यात शिल्लक नव्हते. आता आपल्या या देहाच्याने झाली तर केवळ एखादीच हालचाल होऊ शकेल याची कल्पना तिला आली.) 

इथून पुढे – – 

जीवाच्या करारावर मोठ्या कष्टाने तिने आपले डोळे उघडायचा प्रयत्न केला तिने. डोळे संपूर्ण तर उघडवेच ना तिला. मोठ्या मुश्किलीने तिने आपले डोळे किलकिले केले. अंधुकपणे का होईना पण तिला समोर लेक, सून, नातू आणि मुलगा दिसले – पण तेही क्षणभरच; दुसऱ्याच क्षणी तुला आपल्या नाभीत काही विचित्र संवेदना जाणवली आणि एकदम हलके हलके जाणवायला लागले. तिने आपले लक्ष्य क्षणभरासाठी जडददेहावर केंद्रित केले.

आता ना तिचे श्वसन होत होते ना इतर काही हालचाल; तिचा रजतरज्जू देखील तिच्या जडदेहापासून पूर्ण विलग झाला होता.

त्याच्या सूक्ष्मदेहाजवळ तिचा सूक्ष्म देह पोहोचला.

‘आ ऽऽऽऽऽ ई ऽऽऽऽऽ, ’ संपूर्ण खोली सगळ्यांच्या वियोग विलापाने आक्रोशून उठली.

‘इथे नको आता, देवघरात जाऊ, ’ त्याच्या सूक्ष्मदेहाची स्पंदने तिला जाणवली. आता तिच्या बरोबरच त्याचा सूक्ष्मदेहातही जांभळट छटा पसरू लागली होती. ‘नाही म्हटले तरी आपल्या अपत्यांचा दुःखाचा आक्रोश विचलित करणारच ना! 

विचारहीन अवस्थेन दोघेही देवघरात संक्रमित झाले. लेकरांच्या टाहो मुळे दोघांच्याही विचारात अंमळ नैराश्य आले आणि त्यांच्या सूक्ष्मदेहावर निळसर छटा झाकोळू लागली.

‘संपलं, ’ क्षणभरात सावरल्याने तिचा सूक्ष्मदेह पुन्हा नारिंगी झाला.

‘काय संपलं?’ त्याचाही सूक्ष्मदेह पुनरपि पूर्ववत झाला.

‘या इहलोकीचे लागेबांधे संपले; आप्तेष्टांचे तर संपलेच, आता आपली ओळख सांगणाऱ्या त्या नश्वर देहाचे देखील संपले. आता जो काय कालखंड या सूक्ष्मपातळीवर काढायचा तेवढाच, ’ तिच्या विचारातील स्पष्टपणा त्याला जाणवू लागला.

‘मुलांवरची माया… ’ तो जरासा चकितच झाला.

‘तेव्हा तू मला – आम्हाला सगळ्यांना सोडून गेलास आणि मला जीवनाचे फार मोठे तत्वज्ञान शिकवून गेलास, तिचा सूक्ष्मदेह आता विलक्षण तोजोम्य झाल्याचे त्याला जाणवले. ‘नश्वर देहात आहोत तोपर्यंत सगळे आपले किंवा परके ; आणि आपण सगळ्यांचे, नातेसंबंध तेवढ्यापुरताच! त्यानंतर कोण कुठे जाणार कोणालाच ठाऊक नसते. मग कशाला या भावनांमध्ये गुंतवून ठेवायचे!? देह सोडतांना आपल्या भावनाही त्या देहबरोबरच सोडून यावे हेच उचित! क्षणभर मलाही आपल्या मुलाबाळांचा वियोग असह्य झाला होता; पण तो केवळ क्षणभरच! तू गेल्यापासून मी माझ्या मनाला याबाबत वरचेवर पढवत आले आहे. खरं सांगायचं तर तुझी अशी आणि ही भेट अपेक्षितच नव्हती मला. ’

‘नाही रुचली आपली ही भेट तुला?’

‘आता गैरसमज करून घ्यायची वेळ नाही; आणि आपल्यापाशी कदाचित तेवढा वेळाही नसेल, ’ तिच्या विचारांतील स्पष्टता कल्पनतीत होती. ‘आपण एकत्वाचे जिणे जगलो; आणि मी देहात होते तोंवर तरी माझ्या मनात तीच भावना होती. ’

‘मग आता… ?’ त्याचे विचार कंपायमान झाले.

‘आता आपल्या हातात काय आहे याची काहीच कल्पना नाही. ’

‘पण एवढ्यासाठी तर मी इतकी वर्षे या सूक्ष्मपातळीवर अजून तग धरून आहे ना!’ आता मात्र त्याने पुढाकार घ्यायचे ठरविले.

‘ते देखील एक आश्चर्यच म्हणावे लागेल! तरीही मला वाटते की ज्या अर्थी तू या अवस्थेत इतकी वर्षे काढलीस त्या अर्थी तुझ्या सगळ्याच भावनांपासून एव्हाना तू मुक्त झाला असावास. अन्यथा तू पुन्हा कुठे तरी जन्म घेतलाच असतास, ’ तिने आपला कयास त्याच्यासमोर उघड केला.

‘खरे आहे, ’ त्याला पुन्हा हुरूप आला. ‘एक भावना सोडून मी यशस्वीपणे सगळ्या भावनांचा, वासनांचा त्याग करू शकलो. ’

‘कोणती भावना?’ या प्रश्नाची आवश्यकता नाही हे समाजात असून देखील तिच्यातून तो उद्भवलाच.

‘तुझ्यावरचं अमाप प्रेम, ’ त्याचे विचार खूप मुलायम झाले. ‘केवळ त्याच्यावरच मी जीवन जगलो आणि मरणही स्वीकारले. त्यापोटीच माझ्या इतर सगळ्या भावना एक एक करत गळून पडत होत्या. केवळ तुझीच प्रतीक्षा होती. ’

‘प्रतीक्षापूर्ती तर झाली; आता काय विचार आहे?’ 

‘आता आपण वेळ घालवायला नको, ’ आपल्या विचारांच्या मार्गावर ती आपोआपच आल्यामुळे तो जरासा सुखावला. ‘लगेचच पुढची कृती करूयात. ’

‘ती कोणती?’

‘सध्या पलीकडच्याच रस्त्यावर दोन जोडपी आहेत, ’ तो आपली योजना समजावून देऊ लागला. ‘शेजारीच आहेत ते एकमेकांचे. त्यांच्या बायका आता गरोदर आहेत; दोघीनाही पाचवा महिना चालू आहे. आपण त्यांच्या गर्भात शिरुयात. मग पुढच्या जन्मातही आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो. ’

‘किती गोष्टी गृहीत धरल्या आहेस तू!’ जडदेहात असती तर ती अगदी खळखळून हसली असती. ‘दोघींच्या गर्भधारणा व्यवस्थित पार पडल्या तर आपण जवळजवळ जन्माला येऊ इतकेच! त्यानंतर आपले लग्न होणे किती तरी कौटुंबिक आणि सामाजिक घटकांवर अवलंबून असणार; त्या आपल्या हातात थोड्याच असणार?!’

‘पुढच्या जन्मात तुला माझ्याबरोबरच नाही रहायाचे?’ तिचा हा इतका व्यवहारी प्रतिसाद त्याला अगदीच अनपेक्षित होता.

‘पुन्हा गैरसमज! आपण एकत्वाचे जिणे जगलो ना रे? तुला सोडायचा विचार माझ्यात उद्भवेलच कसा?!’

‘मग असे का म्हणतेस?’

‘इतकी वर्षे तू या सूक्ष्मपातळीवर यशस्वीपणे तग धरून राहिलास, पुढच्या जन्माची आंस न बाळगता, ’ तिच्या सूक्ष्मदेहाला आता एक वेगळेच तेज प्राप्त झाल्याचे त्याला जाणवले. ‘म्हणजे आता तुझी कोणतीही अतृप्त वासना किंवा इच्छा उरलेली नाही. ’

‘केवळ एकच, ’ त्याने प्रांजळपणे कबुली दिली. ‘तुझ्याखेरीज मला दुसरे काहीच नको आहे. ’

‘आता माझा देह तर मागेच राहिला; अन् थोड्या वेळातच तो भस्मसात देखील होईल. ’ तिने पुन्हा त्याला परिस्थितीची जाणीव करून दिली.

‘आपले प्रेम काय केवळ देहापुरतेच मर्यादित होते – किंबहुना आहे? मी देहात असतांना देखील आपण आत्म्याने एकरूपच झालो होतो ना!’

‘हो ना? मग आता पुनर्जन्माची आंस का?’ तिचे विचार पुन्हा मूळपदावर आले. ‘तू म्हणतोस तसा जन्म घेतल्याने पुन्हा जननमरणाच्या फेऱ्यात अडकायचे, जीवनातील सगळे टप्पेटोणपे खायचे, कधी यश पदरी पडेल तर कधी अपयशाला तोंड द्यावे लागेल. पुन्हा नवे संबंध, नवी नाती! कोण केव्हा सोडून जातील सांगता येत नाही. बाकीच्यांचे तर सोडा, आपले काय? पुन्हा आपल्यातील एकजण आधी जाणार. मागे राहिल्याची काय अवस्था होते ते मी गेली काही वर्षे अनुभवते आहे – मरण जगणे म्हणजे काय ते समजले आहे मला. पुन्हा तसले अनुभव नकोत आता – ना मला, ना तुला. ’

तिच्या मुद्द्यांनी तो स्तंभितच झाला.

‘तुझ्या आता दुसऱ्या काही अतृप्त वासना शिल्लक राहिलेल्या नाहीत, माझ्याही नाहीत. त्यामुळे आता काही कर्मपूर्तीसाठी देह धारण करायचा प्रश्नच उद्भवत नाही. केवळ आपण पुन्हा एकत्र यायच्या हव्यासापोटी पुन्हा जन्म घ्यायचे म्हणजे सगळे जीवन पुन्हा जर-तरच्या भोवर्‍यात गटांगळ्या खायच्या!’

‘म्हणजे आता काही वेळानंतर आपण विलग व्हायचे एकमेकांपासून?’ त्याचे तेजोवलय पुन्हा काळवंडू लागले. ‘इतकी वर्षे तुझ्या प्रतीक्षेत सूक्ष्मपातळीवर ताटकळत राहिलो ते सगळे फोल जाणार?’

‘नाही रे राजा, ’ तिने त्याला उभारी द्यायचा प्रयत्न केला. ‘तथापि आपल्या एकत्र येण्यासाठी आता मला कोणत्याही प्रकारची अनिश्चितता नको आहे; किंवा त्यानंतर पुन्हा असे वियोगाचे जिणे नको आहे. जे काही निर्णय घ्यायचे ते पूर्ण विचारांतीच!’

‘म्हणजे काय करायचे?’ त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता.

‘आपली आत्मीयता केवळ देहांवर नव्हतीच – नाहीच; बरोबर? देह हे केवळ एकत्र येण्यासाठी एक साधन. आत्ता आपल्या दोघांचेही देह नसून देखील आपल्या आपलेपणात कुठे तरी कमतरता जाणवते आहे का आपल्यातील कोणालाही; नाही ना?’ तिला काहीही प्रतीविचार न देता केवळ विचारग्रहण करायचे ठरविले त्याने. ‘मग पुन्हा अवतरण करायच्या ऐवजी उद्धरण का करू नये!?’

‘म्हणजे नक्की काय करायचे आपण?’ तो पूर्णतः भांबावून गेला.

‘सूक्ष्मदेह, जडदेह, आणि आनंददेह या देहाच्या तीन अवस्था आहेत ना!’ आता ती अधिक मोकळी होऊ लागली. तिचे तेजोवलय विलक्षण तेजाने झळकू लागले. ‘सूक्ष्मदेहातून पुनरपि जडदेहात जायचे, पुनश्च जननमरणाच्या फेऱ्यात अडकायचे हे अवतरणच नव्हे तर काय! त्यापेक्षा काही वासना नसतांनाच सूक्ष्मदेहातून आनंददेहाकडे गेलो तर जीवनाच्या अनिश्चिततेपासून सुटका नाही का होणार?’

‘म्हणजे आता आपला शाश्वत वियोग होणार?’ भावनांच्या हिंदोळ्यांवर स्वतःला कसे सावरायचे हेच त्याला उमगेना. त्याच्या तेजोवलयाचे स्वरूप क्षणाक्षणाला बदलत होते.

‘नाही रे; समजून तर घे मला, ’ आता तिला त्याच्या प्रतीविचाराची आवश्यकता वाटेना. ‘या सूक्ष्मदेहातच आपण एकत्र होऊ. हे आपले शाश्वत अद्वैत असेल. अशा अद्वैतातच आपण आनंददेहात प्रवेश करू; तात्पुरताच! त्यानंतर आपण थेट ब्रह्मतत्वाकडे झेपावूयात ना! मग आपल्याला कोणीच विलग करू शकणार नाही. हेच शाश्वत अद्वैत आहे आपले!’

आणि विलक्षण समाधानाने, तृप्तीने त्याचा सूक्ष्मदेह पुन्हा झळाळू लागला.

‘ये’

‘त्याचे विचार जाणवतच, दुसऱ्याच क्षणी तिचा सूक्ष्मदेह त्याच्या सूक्ष्मदेहाच्या दिशेने सरकला. त्या दोन सूक्ष्मदेहाचे मीलन झाले; दोघांनाही वासनाविरहित एकत्वाची अनुभूती आली. आता कोणतीच इच्छा शेष नाही या भावनेने तत्क्षणी त्यांच्या अद्वैती सूक्ष्मदेहाचे आनंददेहात परिवर्तन झाले

अन् दुसऱ्याच क्षणी अद्वैत पावलेला तो आनंददेह निर्विकारपणे ब्रह्मतत्वाकडे झेपावला – अद्वैताच्या शाश्वत आनंदप्राप्तीसाठी – मुक्तीसाठी – मोक्षासाठी !

समाप्त –

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

एरंडवणे, पुणे ४११००४, मो- ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments