डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ आग – भाग २ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(गरम वाळू माझ्या शरीराला खोलवर टोचत होती. मला हेच तर हवे होते. एकाच वेळी जितकी जमेल तितकी उष्णता देऊन टाक म्हणावं. उष्णतेला तोंड देण्यासाठी समुद्राचे जलसिंचन तयार होतेच. पाण्यात डुबकी मारून झाल्यावर ते सुकवण्यासाठी फिरून गरम उन्हात सूर्यस्नान. क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा पाठशिवणीचा खेळ!) इथून पुढे – – 

तेजस्वी सूर्याच्या दाहकतेमुळे आगीचे धूम्रवलय जरा आक्रसलेले वाटत होते. सायंकालीन प्रहराचे रंग गडद होता होता धुराने आकाशाला पुन्हा एकवार कवेत घेतले. रेतीवर पहुडलेल्या उन्हात लोक मनसोक्त लोळत होते. कित्येक महिन्यांच्या निष्ठुर हवामानाला वैतागलेले ते सर्वजण आता सूर्यस्नानाचा मनमुराद उपभोग घेत होते. समुद्र आणि त्याच्याच किनारी तप्त रेती! जळी आणि स्थळी पृथ्वीचीच दोन्ही रूपे दृष्टीस पडत होती.

सागरतीरावर सूर्यस्नान करणारे हे लोक त्याच्या अपार आनंदाचा अनुभव घेण्यात खरंच इतके दंग झाले होते कां की वाळूवर चालताना त्यांचे पाय देखील पोळत नव्हते?  निरभ्र आकाशातून सूर्यदेवाने सर्वदूर फेकलेल्या रवीकिरणांच्या जळजळीत जाळीत अडकून त्यांच्या चेहेऱ्याची गोरीपान त्वचा लालबुंद झाली होती. त्यांच्या पाठी आणि कडा देखील तितक्याच लालेलाल झाल्या होत्या. समुद्रचौपाटीवरील वाळूने व्यापलेली जमीन खडबडीत होती आणि त्यामुळे त्यांच्या अनवाणी पायांना चांगलीच टोचत होती. मात्र त्याची तमा न बाळगता वाळूच्या कणांना आपल्या पायांना मुक्तपणे चिकटण्याची मुभा देण्यासाठी प्रत्येकजण पादत्राणे काढून टाकीत मस्तीत पळत होता.

काही तरुणांनी दोन लाकडांच्या मदतीने नेट लावले होते. तिथे लहान व मोठे सर्वजण एकत्र बॅडमिंटन खेळत होते. दुसरीकडे बास्केटबॉलचा खेळ जोरात सुरू होता. जवळच कुठे तरी काही मुले डिस्क फेकत होती. दोन- चार पाळीव कुत्रे त्यांच्या मालकांसह पाण्यात आणि वाळूमध्ये धमाल मस्ती करीत होते. इतक्या गर्मीत सगळ्यांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. माणसे एकमेकांच्या जवळ आली की त्या घामाचा तीव्र वास एखाद्या पक्ष्यासारखा एका शरीरापासून दुसऱ्या शरीरापर्यंत मुक्त संचार करीत होता. या दर्पाद्वारे एका नाकापासून दुसऱ्या नाकापर्यंतचे अंतर आरामात मोजल्या जात होते.

जेव्हा एखादी व्यक्ती एकाकी पडते तेव्हाच तिचे इतरांकडे लक्ष जाते. तिथल्या प्रचंड गर्दीत देखील मी एकटा होतो. संपूर्णतः एकटा. माझ्यासमोर जलाने तुडुंब भरलेला सागर होता तर माझ्या डोळ्यांतही अश्रूंचा महासागर उसळला होता, राहून राहून त्याला भरती येत होती. मला ओलेत्या डोळ्यांचा पूर्ण तिरस्कार आहे. त्यांच्यासारखा अत्याचारी कोणी नसेल! ते सकळ शरीराचा भार आपल्या नाजूक खांद्यांवर उचलत फिरत असतात. जेव्हां शरीराचे अंगप्रत्यंग जळत असते तेव्हां हेच डोळे ओले होतात. जसजसे डोळे अश्रूंचे सिंचन करतात तसतसे त्या व्यक्तीचे शरीर शीतल होत जाते. किमान समुद्रासमोर तरी माझ्या डोळ्यांत पाणी येऊ नये असे मला वाटत होते, पण नाही, वेगाने बरसणाऱ्या अश्रूंच्या धारा माझी पीडा थेंबाथेंबाने कमी करण्याचा प्रयत्न करत होत्या.

माझ्यासमोरचा समुद्र जणू काही मला समजावत होता, “अरे! डोळ्यात अश्रूंचे दोन थेंब आले की तू दुःखी होतोस. माझ्याकडे बघ, मी तर नेहमीच अंतर्बाह्य पाण्याने काठोकाठ भरलेला असतो. “

निसर्गाशी संवाद साधणे हा देखील माझा एकाकीपणा थोड्या प्रमाणात कमी करण्याचा जणू प्रयत्न होता. मात्र या रम्य निसर्गाच्या सानिध्यातही जन्मजात मानवी स्वभाव निसर्गावर आपले वर्चस्व स्थापित करण्यात गुंग होता. झाले असे की, कोणीतरी कोणा एका स्त्रीचे पाकीट चोरले होते. त्या पाकिटात त्या बिचाऱ्या महिलेचे सर्व क्रेडिट कार्ड आणि रोख रक्कम होती. ती निराश होऊन आपले पाकीट मिळते का हे वाळूत चाचपडून शोधत होती. क्रेडिट कार्ड रद्द होतीलही, पण हरवलेल्या नगदी पैशाचे काय?  ती तर मौजमजा लुटायला सहलीला आली होती, मात्र आता तिचे पाकीट लुटल्या गेले होती. आता जातांना ती रिकाम्या हाताने पण चिंताग्रत मस्तक सोबत घेऊन जाणार होती.

दुसऱ्या बाजूला, एक लहान मूल सतत रडत होते. त्याच्यासाठी, घर आणि घराबाहेर या दोहोंमध्ये कांहीच फरक नव्हता. त्याच्या घराची शीतल छाया किंवा बाहेरील तापलेले ऊन या दोहोंशी त्याला कुठलेच सोयरसुतक नव्हते. इतकंच नव्हे तर त्याला लगटून वाहणारा प्रबळ प्रवाह त्याच्या असहमती दर्शवणाऱ्या रडण्यात आपला सूर मिसळीत होता.

रेतीत अर्धवट पहुडलेल्या अल्पवस्त्रांकित लोकांची तुफान गर्दी. नजर पोहोचेल तिथवर अर्धनग्न लोकांचे जणू जंगल राज, पुरुष आणि स्त्रियांचे! आरामखुर्च्यांवर अस्ताव्यस्त पसरून ते मदमस्त अवस्थेत तप्त रवीकिरणांना जमेल तितके अंगावर झेलत होते. कित्येक महिन्यांच्या बर्फाळ थंडीने आक्रसलेल्या कॅनडासारख्या शीतल देशांमध्ये सूर्यकिरणांचे असे जंगी स्वागत होत असे. लज्जारक्षणापुरती वस्त्रे घातलेले बहुतेक तरुण पुरुष आणि स्त्रियांच्या झुंडीच्या झुंडी सूर्यस्नानामुळे स्वतःच्या शरीराची बदलती लालेलाल त्वचा कौतुकाने न्याहाळत मजा करीत होते, जणू कांही पिकलेल्या फळाचा आस्वाद घेण्याआधी ते त्याचा मधुर सुवास नाकात भरून घेत होते.

जर दुसरा वेळवखत असता तर मी त्या सर्वांना अनिमिष नेत्रांनी बघत राहिलो असतो. मनातल्या वखवखत्या आदिम इच्छा जागृत झाल्या असत्या. एरवी निषिद्ध असलेली वासनापुष्पे माझ्या मनात नकळत फुलण्याचा प्रयत्न करत असती. लख्ख सूर्यप्रकाशाचा झगमगाट आणि त्याची उष्ण धग अचानक मायाविनी वाटत असती. स्वतःच्या बेफाम कामनांवर अंकुश ठेवणे तर अशक्यच झाले असते. पण नाही! त्या वेदनादायक क्षणांमध्ये आयुष्याचे सकल गुलजार रंग हरवले होते. उरली होती ती ती फक्त निशाचरांचे साम्राज्य असलेली कधीही न संपणारी निराशेने ग्रस्त काळीकुट्ट रात्र. वर्षानुवर्षांपासून जपलेल्या अलवार नात्यांची आता उरली होती उसवलेली वीण. काळजाला आरपार छेदणारी असह्य वेदनेची कट्यार, क्षणोक्षणी विलाप करणारे विरहग्रस्त मन! हृदय पिळवटून टाकणारे एका पित्याचे दुःख कसे काय कमी होणार होते?  कायद्याच्या कर्तव्यकठोर साखळ्यांत जखडलेले माझे अपत्यप्रेम! मला किती भयानक शिक्षा मिळाली होती आपल्याच मुलापासून वेगळे राहण्याची.

जवळच एक युगुल होते. बहुदा घरी भांडण केल्यावर इथे आले असावेत. या सुंदर सागरतीरी देखील कलहाचा अध्याय सुरुच होता. विरुद्ध दिशांना तोंडे फिरवून फुरंगटून बसले होते दोघेही! मला अशा सर्व प्रकारच्या वादविवादापासून कायमची मुक्ती मिळालेली होती. निसर्गशोभेत रममाण होण्याकरिता मी एकटाच आलो होतो, घरच्या ताणतणावाने कातावलेल्या त्या खोलीपासून खूप दूर. पण इथे येऊन बघितल्यावर जाणवले की या लाटांच्या तडाख्यांना झुंज देणारा मी एकटाच नव्हतो. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या त्याच्या स्वतंत्र समस्या होत्या.

हळूहळू संध्याकाळच्या लांबसडक सावल्या पडायला सुरुवात झाली. घरी जाण्याची वेळ जवळ जवळ येत चालली होती, मी मात्र त्याच घरकुलापासून दूर पळत होतो. आता कुठले घर?  कोणे एके काळी माझे असलेले ते उबदार घरटे आता माझे राहिले नव्हते. मी संबंधविच्छेद झाल्या क्षणी अनिकेत झालो होतो. आता मला एक नवीन घर शोधावे लागणार होते. आधीच्या माझ्या मालकीच्या घरावर माझा कोणताही अधिकार नव्हता. आतल्या आणि बाहेरच्या उष्णतेची प्रखर झळ एकत्रित होत एका भीषण ज्वालामुखीच्या निर्मितीत गुंतली होती.

विचार करत असतांनाच माझा डोळा लागला. एकाएकी माझ्या माथ्यावर एका कोवळ्या तळहाताचा मृदुल अलवार स्पर्श जाणवला.

मी दचकलो. माझा मुलगा तर माझ्यापासून दूर गेला होता. आता माझ्या कपाळावर कोणाचा कोमल हात होता बरे?  तोच तर आहे हा! कदाचित माझ्या आठवणीने नकळत त्याला माझ्यापर्यंत इथवर खेचून आणले असावे. मी घाबरून डोळे उघडले. वाळूने नखशिखांत माखलेला एक लहानगा मुलगा गुडघ्यावर रांगत माझ्या पर्यंत पोचला होता आणि माझ्या डोक्यापाशी बसला होता व माझ्या माथ्याला कोमल स्पर्श करत होता. तो माझ्या बिट्टूसारखा तर दिसत होता, पण… तो माझा बिट्टू नव्हताच. त्यावेळी मी त्याच्याकडे नीटसे पाहिलेही नव्हते, तोच त्याची आई तडक तिथे आली आणि ‘माफ करा’ असे म्हणत त्याला घेऊन देखील गेली!

किती नाजूक रेशमी स्पर्श होता तो! नाजूक, वत्सल, मुलायम!

मी हतप्रभ झालो, आत्ता कुठे आला होता अन लगेच गेला सुद्धा! अरेरे! त्याचा मृदुल हात माझ्या कपाळावर आणखीन थोडा काळ राहिला असता तर किती बरं झालं असतं. माझ्या अंतर्यामी धगधगणारी आग काही प्रमाणात शांत तरी झाली असती! तो अनोळखी बच्चू गोड आठवणी जाग्या करून गेला. मला क्षणभरासाठी असे वाटले की मी बिट्टूसोबत लपंडावाचा खेळ खेळतोय. तो बिलंदरपणे कुठेही लपून बसायचा. मी शोध शोध शोधायचो तरी बेटा मला गवसायचा नाहीच. मी जेव्हा जेव्हा त्याच्या जवळून जायचो तेव्हां विजयी मुद्रेने तो टाळ्या पिटत खळखळून हसायचा. या उलट मी जेव्हां लपायचो तेव्हा तो मला लगेचच हुडकून काढायचा. तो अजून बोलायला शिकला नव्हता, पण त्याच्या बोलक्या डोळ्यांनी तो माझ्याशी अखंड बोलत असायचा.

या मुलाचे डोळे देखील माझ्या बिट्टूसारखेच बोलके आणि भावस्पर्शी होते. काय हा नियतीचा डाव! कालपर्यंत माझा मुलगा माझ्या निकट होता, पण आज मी इतका असहाय झालो आहे की, एका परक्या बालकात माझ्या स्वतःच्या मुलाचे प्रतिबिंब शोधतोय. मी त्याला माझ्यासोबत ठेवू इच्छित होतो. पण मी काय करू शकत होतो?  महिनोन्महिने अन्यमनस्क होऊन जगलेल्या निरुद्देश आयुष्याचे कमजोर धागे काल पूर्णपणे तुटले. इथे सागरतीरी येऊन माझ्या अस्वस्थ मनाला थोडाफार विरंगुळा देऊ इच्छित होतो. म्हणूनच समुद्रकिनाऱ्यावरही मी माझ्या आयुष्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करीत चक्रीवादळ निर्माण करणाऱ्या लाटा मोजत बसलो होतो.

न्यायालयाने आमचा घटस्फोट मंजूर केला होता आणि अधिकृतपणे मला तात्काळ घर सोडण्याचा आदेश दिला होता. माझ्या नशिबाने नोकरी सुरक्षित होती. आर्थिक अडचणी नव्हत्या. परंतु बायको आणि मुलापासून दूर राहण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी कोर्टाने एक नाही तर अनेक बाबींचे काटेकोरपणे पालन करणे माझ्यासाठी सक्तीचे केले होते.

“तुम्ही आपल्या पत्नीशी अर्थात लिलीशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेऊ नका. “

“मुलगा वयस्क होईपर्यंत तुम्ही त्याला महिन्यातून फक्त दोन तासांसाठी त्याला भेटू शकता”

“अशा भेटी फक्त त्याच्या आईच्या उपस्थितीतच व्हायला हव्यात. ” 

“त्याच्याभोवती कधीही घोटाळत राहण्याचा प्रयत्न करू नका. “

जणू काही मी एक पिता नसून एखादा गुन्हेगार होतो, जो त्याला हानी पोहोचवू शकत होता. मी कल्पनेतही कधी कोणताच गुन्हा केला नव्हता. असे शक्य तरी होते कां की प्रत्यक्ष माझ्या प्रिय मुलाला मी कोणत्याही प्रकारे दुखापत करू शकेन?  

– क्रमशः भाग दुसरा

हिन्दी कथालेखिका : डॉ. हंसा दीप 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments