शोभा जोशी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “काकस्पर्श…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शोभा जोशी ☆

गेल्या आठवड्यात परब आज्जी गेल्या. त्यांनी वयाची नव्वदी पार केली होती. अगदी नातवंडांची मुलेही लग्नाच्या वयाची झालेली होती. सुखीसमाधानी भरल्या गोकुळातून तृप्त मनाने आजी निजधामाला गेल्या होत्या. बाराव्याचे तेराव्याचे विधी व्यवस्थित पार पडले. आता पिंडाला कावळा शिवायची फक्त बाकी होती.. सगळे घराच्या गच्चीवर जमले. तसे दिवस पावसाचे होते. पिंड आणि जेवणाचे ताट थोडे आडोशालाच ठेवलेले होते. सगळेजण आतुरतेने कावळ्यांची वाट पहात होते.

मी परब आज्जींच्या नातवाचा जवळचा मित्र. परबांशी माझे घरोब्याचे संबंध आहेत. रितीप्रमाणे मी तेराव्याला आलो होतो. कावळा लवकर यावा अशी मी मनोमन प्रार्थना करत होतो. जवळपास दुपारचे साडेबारा झाले होते. माझी दोन वाजता एक महत्त्वाची मिटींग होती. मी हाफ डे रजा टाकली होती पण दोन पर्यंत आॉफिसला कसेही करून पोचावेच लागले असते. दहा पंधरा मिनिटे झाली तरी कावळा यायचे लक्षण दिसे ना. तेवढ्यात पावसाची एक मोठी सर आली. सगळ्यांची धावपळ झाली. सगळ्यांची दाणादाण उडवून सर आली तशी पटकन गेली सुद्धा! लांबवर एक दोन कावळे उडताना दिसू लागले. आपल्या सर्वांची गर्दी बघून कावळे बुजले असतील असे वाटून अर्धे जण खाली गेले इतर जण जरा दूर उभे राहिले. तरीही कावळे जवळ येईनात. बहुदा त्यांचे पोट भरलेले असावे आणि भरल्या पोटी जेवायचा हावरटपणा करायला कावळे म्हणजे काही माणसं नव्हेत. घड्याळ्याचा काटा पुढे सरकू लागला तशी वातावरणातली अस्वस्थता वाढू लागली. सोमनाथकाका म्हणजे परब आजींचा मोठा मुलगा. “आई, मी गावच्या घराची काळजी घेईन. ” असे म्हणून नमस्कार करून दूर उभा राहिला. आता मधल्या काकांनी पण “आई, मी घरातल्या सगळ्यांना नीट सांभाळून घेईन”. असे सांगितले. मला गंमत वाटत होती. हेच मोठे काका गावचे घर आणि वाडी विकायची म्हणून हटून बसले होते आणि मधले काका वर्षातून एकदोन वेळा आईला भेटायला येत तेव्हाच त्यांची इतर कुटुंबिंयांशी पण भेट होत होती. इतरवेळी वर्षभरात त्यांच्याशी काही संपर्क नसायचा. या आतल्या गोटातल्या बातम्या मला माहीत होत्या.

त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण एकेक करून येऊन काहीबाही सांगत होता. यात जवळपास पंधरा मिनिटे गेली. आता मात्र बाहेरचे नसले तरी पोटातले कावळे जोरात कावकाव करू लागले होते. त्यांना लवकरात लवकर शांत करायला हवे होते.

पण पिंडाला कावळा शिवणे हा एकदम प्रेस्टिज इश्यू झाला होता. परब कुटुंबीय मागे हटायला तयार नव्हते. परब आजी कावळ्यांच्या रूपात दुरून या साऱ्यांची मजा पहात होत्या की काय असा मला दाट संशय यायला लागला होता. आज त्यांना अचानक एकदम महत्त्व प्राप्त झाले होते ना?

“अहो, तुम्ही जेवल्याशिवाय कधी आई जेवल्या होत्या का? तुम्ही जेऊन घ्या बघा पिंडाला कावळा शिवतो की नाही ते! ” असे माझ्या मित्राची आई म्हणाली. कधी नव्हे ती तीनही भावंडांत आणि जावाजावांमध्ये एकवाक्यता झाली. पिंडाला दर्भाचा कावळा शिववून सगळे जेवायला बसले.

मी या गडबडीत मिटींगला दहा मिनिटे उशिराने पोहोचलो. बॉस मॅडमची बोलणी खाल्ली ती वेगळीच!!

माझ्या मित्राला, स्वानंद चित्रेला मी सकाळपासूनचे सगळे रामायण सांगितले. त्याने त्यावरचा जो तोडगा सांगितला ते ऐकून तर मी तीनताड उडालोच… “काय सांगतोयस काय चित्र्या! असं कसं होईल. काहीपण टेपा लावू नकोस! ” मी त्याला म्हणालो.

“तुझा विश्वास बसत नाही ना? मी तुला त्या गुरूजींचा नंबर देतो. तशी कधी गरज लागू नये पण लागलीच तर मयत झाल्या दिवशीच त्यांना फोन करायचा. ते खूप बिझी असतात ना! त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. दिवसाला चार पेक्षा जास्त कार्य करत नाहीत ते! “

चित्र्याने दिलेला नंबर आणि सांगितलेली गोष्ट मी नंतर विसरून गेलो होतो.

काही दिवसांपूर्वी माझ्या शेजारीच रहाणारे देशपांडे काका गेले. देशपांडे काकांचा मुलगा अमेरिकेत होता आणि त्यांच्या घरात फक्त काकाकाकूच रहात होते. त्यांचा मुलगा भारतात येईपर्यंत त्याच्या विनंतीनुसार मीच पुढाकार घेऊन सारे सोपस्कार पार पाडण्यास मदत केली.

तेव्हा दिवसकार्याकरता कोणी भटजी असतील तर सांग असे जयंता, काकांचा मुलगा मला म्हणाला तेव्हा मला चित्रेने दिलेला नंबर आठवला.

सुदैवाने देशपांडे काकांच्या तेराव्याच्या दिवशी हे गुरूजी मोकळेच होते आणि चित्रेने बजावल्याप्रमाणे मी त्यांच्या मुलालाही तेराव्यासाठी आणा अशी विनंती केली. मुलाला आणायचे एक हजार एक्स्ट्रा होतील असे गुरुजींनी सांगितले तेही मी लगेच मान्य केले.

देशपांडे काकांच्या तेराव्याच्या दिवशी गुरूजी सांगितलेल्या वेळी बरोबर पोचले. मोजून दीड तासात त्यांनी सगळे विधी पार पाडले.

पिंड आणि जेवणाचे ताट घेऊन सगळीजण गच्चीवर गेलो. दहा मिनिटे झाली तरी कावळा शिवेना. मी गुरूजींंना म्हणालो, गुरूजी, तुम्ही मुलाला आणले नाही का? “

गुरुजी म्हणाले, ” आणला आहे तर! पण आम्ही पहिली दहा मिनिटे स्वतःहून एखादा कावळा पिंडाला शिवतोय का? हे पहाण्यासाठी थांबतो. नंतरच मी माझ्या मुलाला बोलावतो.

पिंडाला कावळा शिवत नाही म्हणून सगळेजण अस्वस्थ व्हायला सुरुवात झालीच होती. तेवढ्यात गुरूजींचा तरुण मुलगा पटकन पुढे आला. त्याच्या हातात एक पिंजरा होता. त्यात चक्क दोन कावळे होते. त्याने सर्वांना दूर जाऊन उभे रहायला सांगितले. पिंडाजवळ जाऊन पिंजऱ्याचा दरवाजा हळूच उघडला. त्याबरोबर दोन्हा कावळे बाहेर आले त्यांनी पिंडातला पिठाचा गोळाच काय पण जेवणाच्या ताटातली खीर आणि भजी पण उष्टावली आणि आज्ञाधारक मुलांसारखे पुन्हा पिंजऱ्यात जाऊन बसले.

सगळे अवाक् होऊन हे पहात होते. मला चित्रेने आधीच सांगितले होते पण तरीही प्रत्यक्ष पाहिल्यावर मलाही आश्चर्य वाटले होतेच.

गुरूजी आणि त्यांचा मुलगा एकदम प्रोफेशनल होते. अगदी वेळात आले. चोख काम केले आणि आपण सांगितलेले पैसे घेऊन स्वतःच्या गाडीने पुढच्या घरचे कार्य पार पाडायला गेले सुद्धा!

पिंडाला शिवायला कावळे पाळणाऱ्या त्या अवलिया तरुणाशी गप्पा मारायच्या, त्याला प्रश्न विचारायचेच असे ठरवून मी देशपांडे आजोबांच्या कार्यानंतरच्या शनिवारी पुन्हा गुरूजींना फोन केला. त्यांच्याशी आणि त्यांच्या मुलाशी बोलायचे आहे असे सांगून त्यांच्या सवडीने मी त्यांना भेटायला गेलो. गुरुजींचे मस्त एअरकंडिशन्ड, चकाचक आॉफिस होते

अगदी एक रिसेप्शनिस्ट कम अकाउंटंट सुद्धा होता. शिवाय त्यांचा मुलगा देखील होताच.

सुरुवातीची जुजबी हवापाण्याची बोलणी झाल्यावर मी त्यांना कावळे पाळायचे कसे सुचले ते विचारलेच.

गुरूजी सांगू लागले.

“त्याचे काय झाले. मी लहानपणापासून भिक्षूकी शिकलो होतो. थोडा मोठा झाल्यावर शिक्षणासाठी इथे माझ्या काकांकडे आलो. पण नोकरीपेक्षा यात जास्त पैसे मिळतात हे जाणवल्यावर काकांबरोबर मीपण मुंबईत भिक्षूकी करू लागलो. एक लक्षात आले की मुंबईत वेळ सोडून बाकी सगळे मुबलक प्रमाणात आहे. गावच्यापेक्षा अर्ध्या वेळात पण तरीही व्यवस्थितपणे पुजा सांगता यायला हवी. बारशापासून ते तेराव्यापर्यंतचे सर्व विधी आपल्याला अवगत असायला हवे आणि मुख्य म्हणजे दिलेली वेळ पाळायलाच हवी.

हळूहळू जम बसला. लग्न झाले. एकच मुलगा. तशी व्यावहारिक बुद्धी चांगली असली तरी अभ्यासात फार हुशार नव्हता. तरीही कधीही नापास न होता बीकॉम झाला. तो बारावीत गेल्यापासूनच मी त्याला माझ्या बरोबर नेऊ लागलो होतो. त्यालाही अनेक पुजांचे विधी मंत्र तोंडपाठ झाले. “

” हो पण मग यात कावळे पाळायचा काय संबंध आहे? “त्यांना मध्येच थांबवत मी म्हणालो.

“मी सांगतो काका, ” गुरुजींचा मुलगा म्हणाला.

बाबा तेराव्याचे विधी सांगत. त्याला एखाद दीड तास पुरेसा असायचा पण अनेकदा पिंडाला कावळा शिवेपर्यंत त्यांना एक ते दीड तास ताटकळत थांबावे लागायचे. इतके करून जर कावळा शिवला नाहीच तर सगळ्या नातेवाईकांना खूपच रुखरुख लागायची. अगदी नाईलाजास्तव दर्भाचा कावळा करणे भाग पडायचे.

मग मी विचार केला की कोणी कावळा पाळला तर किती बरं होईल.

बाबांचा वेळ आणि त्रास वाचेल आणि नातेवाईकांनाही किती बरं वाटेल.

शेवटी खरा जिवंत कावळा आणि दर्भाचा कावळा याची काही बरोबरी होऊ शकत नाही. असा विचार मनात आल्यावर मी म्हटले कोणीतरी कशाला आपणच कावळा पाळावा. आधी मी माझा हा विचार घरी सांगितल्यावर सगळ्यांनी मला वेड्यातच काढले. पण मी हार मानली नाही. मला जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी मी मिळवली. चारपाच पक्षी अभयारण्यात जाऊन तिथल्या कावळ्यांचे निरिक्षण व अभ्यास केला.

हैद्राबादला आणि आपल्या साताऱ्यात कोणी कावळा पाळला आहे हे कळल्यावर तिथे गेलो.

तुम्हाला सांगू का? आपण त्या पक्षावर प्रेम करतो आहोत आणि त्याला आपण इजा करणार नाही हे त्या पक्षाला कळले ना की मग ते आपल्याला घाबरत नाहीत. पक्षी कधीही दगा देत नाहीत.

मी मग इथेच घरच्या गच्चीवर कावळ्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. दोन मोठ्ठे पिंजरे तयार केले आणि मग त्यात कावळे पाळले!! दर दोन वर्षांनी मी नवीन कावळ्यांना ट्रेन करतो आणि जुन्या कावळ्यांना मोकळे करतो. आज मी सत्तावीस वर्षांचा आहे. गेली पाच वर्षे मी हा कावळा पाळण्याचा उद्योग करतो आहे.

तुम्ही माझ्याबरोबर समोरच माझे घर आहे त्या घरच्या गच्चीत आलात तर तुम्हाला एक गंमत दाखवतो.

बरोबर थोडे दाणे घेऊन तो आम्हाला घेऊन गच्चीत गेला. तिथे गेल्याबरोबर त्याने एक विशिष्ट आवाज काढायला सुरुवात केली आणि लवकरच दहाबारा कावळे तिथे जमले. त्याच्या हातातून दाणे घेऊ लागले. जवळच दोन पिंजरे होते त्यातल्या एकात दोन कावळे पंख फडफडवत छानपैकी एकमेकांशी खेळत होते.

खाली येताना मी म्हणालो. “काय रे, यातून आर्थिक फायदा किती होतो? “

तुम्हाला म्हणून सांगतो काका, माझ्या वयाच्या एखाद्या नोकरी करणाऱ्या इंजिनियरला पगार मिळतो ना, त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी कमावतो.

माझ्यामुळे बाबांनाही गुरुजी म्हणून बोलावतात. पितृपक्षात तर मला दोनशेच्यावर बोलावणी असतात पण मी आधी व्यवस्थित अपॉइंटमेंट देऊन ठराविक ठिकाणी जातो. शेवटी कावळे तरी किती खाणार नं!! त्यांचे पोट बिघडले तर?? “

” तुला आपण लोकांच्या भावनांची खिल्ली उडवतोय असे नाही का रे वाटत? “

” अजिबात नाही. नागपंचमीला आपण गारुडी घरी घेऊन येतो त्या नागाची पूजा करतोच की! देवळासमोर बांधलेल्या गायीला चारा घालून पुण्य मिळते तर मग पाळलेला कावळा पिंडाला शिवला तर बिघडले कुठे? “

– – मला त्याचे म्हणणे, त्याची कल्पकता आणि त्याचा आगळावेगळा व्यवसाय आवडला. तुम्हाला काय वाटते?

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : शोभा जोशी 

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted