डॉ मकरंद पिंपुटकर
☆ एका veterinary डॉक्टरची दिवाळी पहाट : भाग १ ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆
नमस्कार, मी डॉ. निखिल पाटील. मी एक veterinary डॉक्टर आहे – म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर जनावरांचा – गुरांचा डॉक्टर. मुंबईतील कोंकण कृषी विद्यापीठाच्या पशूवैद्यकीय महाविद्यालयामधून पदवी घेतल्यानंतर मी सांगलीजवळ भिलवडीला माझे सीनिअर – जाधव सर यांच्याकडे नोकरीला लागलो.
जाधव सर गेली अनेक वर्षे इथे प्रॅक्टिस करत आहेत. भिलवडीला चितळ्यांचे दुग्ध संकलन आणि प्रक्रिया केंद्र असल्याने प्रामुख्याने गायी म्हशी याच आमच्या पेशंट असंत.
मला इथे येऊन बघता बघता सहा महिने होत आले होते. वेगवेगळे पेशंट आणि मुख्यत: त्यांचे मालक यांच्या आवडीनिवडी, खोडी, स्वभाव आता हळूहळू मला कळू लागले होते.
उद्या दिवाळी होती. माझी इथली पहिलीच दिवाळी. पहाटे लवकर उठून, शुचिर्भूत होऊन, पायाच्या अंगठ्याने कवठरुपी नरकासुराचा वध करून मस्त फराळ करण्याची स्वप्नं पहात मी आदल्या रात्री झोपी गेलो. इथं थंडीही असतेच आणि शेतात उसाला पाणी सोडले असल्याने गारठा आणखीनच वाढला होता.
सकाळी फटाक्यांच्या अथवा सनई चौघड्यांच्या मंगल आवाजांनी मला जाग येईल अशी स्वप्नं पहात मी झोपलो होतो. पण जाग आली ती टेलिफोनच्या खणखणाटाने. डोळे उघडेनात, आणि जेव्हा प्रयत्नपूर्वक उघडले तेव्हा आजूबाजूला चांगलंच अंधारलेले होते. घड्याळ पाहिलं – पहाटेचे अजून फक्त चारच वाजत होते.
चरफडत फोन उचलला तर फोनवरून “डॉक्टर, मी चोपडेवाडीतून थोपटे बोलतोय. माझ्या गायीला मिल्क फिवर झाला आहे. ताबडतोब निघा.” असा आदेश आला.
इतक्या पहाटे, आणि तेही दिवाळीच्या दिवशी, उठवल्याबद्दल “sorry” वगैरे म्हणणं तर दूरच, हा तर फोनवरून direct ऑर्डरच सोडत होता.
गाडी काढून मी त्याच्या तबेल्यावर पोचलो, तर हा दारात माझीच वाट पहात, येरझाऱ्या घालत उभा. नमस्कार चमत्कार न करताच, एकदा माझ्याकडे आणि नंतर त्याच्या हातातल्या घड्याळाकडे रोखून बघत तो तरातरा चालू लागला. जणू त्याचा फोन संपण्यापूर्वीच मी तिथे अवतीर्ण व्हावं अशीच त्याची अपेक्षा होती.
वासराचा जन्म झाल्यावर चीकदुधातून मोठ्या प्रमाणात कॅल्शियम जाते. जर गायीचा आहार संतुलित नसेल, तर रक्तातील कॅल्शियम कमी होऊन गायीला अशक्तपणा येतो, ती उभी राहू शकत नाही. जरी या रोगाचं नाव milk fever असलं तरी अंगात ताप नसतो.
कॅल्शियमचे इंजेक्शन हा त्वरित करण्याचा उपाय. मी इंजेक्शन देईपर्यंत हे थोपटे घुश्श्यात तिथेच उभे. ना एखादा प्रेमाचा शब्द, ना एखादं स्मितहास्य.
इंजेक्शन देऊन झाल्यावर मी तबेल्यातून बाहेर आलो. गाडीमध्ये सामान ठेवू लागल्यावर मात्र थोपटे माझ्याजवळ आले आणि बोलण्यास सुरुवात केली. मला वाटलं आता तरी हा दोन गोड शब्द बोलेल आणि चहा किंवा इथल्या स्थानिक सवयीनुसार धारोष्ण दूधतरी मला देऊ करेल.
“हल्ली माझ्या बऱ्याच गायींना हा आजार होत आहे. माझ्या शेड्युलमध्ये काही बदल करायला पाहिजे का त्यांच्या खाण्यापिण्यात? “
भोवती थंड वारा सुटला होता, मी कुडकुडत होतो, डोळ्यांवर अजूनही झोप होती आणि हे थोपटे महाराज मला पशू संगोपनावर प्रवचन द्यायला सांगत होते. “तुम्ही जाधव सरांशी चर्चा करा, ते तुम्हाला विस्तृत माहिती देतील, ” मी तो प्रश्न तटवला.
“ठीक आहे, असंही तुमचा अनुभव अजून कमीच आहे म्हणा.” त्याने माझी लायकी काढली.
“रात्रीपर्यंत काय सुधारणा होते ते बघतो, नाहीतर मी तुम्हाला परत बोलावेन.” म्हणजे दिवाळीच्या पहाटे मला साखरझोपेतून उठवून त्याचा आत्मा शांत झाला नव्हता, तो रात्रही बरबाद करण्याची warning देऊन ठेवत होता.
“आणि हो, तुमच्या जाधव सरांना सांगा, उगा भरमसाठ बिलं लावू नका म्हणून.” उंटाच्या पाठीवर शेवटची काडी टाकून तो घरी जाऊ लागला.
दोन पावलं चालल्यावर तो अचानक थबकला, परत वळला, त्याच्या चेहऱ्यावर आता सौम्य – मृदू भाव होते. आणि तो विचारता झाला – “नीरसं धारोष्ण दूध दिलं तर चालेल ना? “
हां. आता जरा माणुसकी दिसत होती. भले, सुरुवातीला तो खत्रुडपणे बोलला असेल, पण त्याच्यात माणुसकी अजून शिल्लक होती. मला बरं वाटलं.
“नको हो, एवढ्या पहाटे तुम्ही माझ्यासाठी कशाला एवढा त्रास घेताय? ” माझा विनयाने प्रश्न.
“तुमच्यासाठी कुठे काय करतोय मी? या गायीला कॅल्शियम मिळावं म्हणून तिला नीरसं धारोष्ण दूध दिलं तर चालेल का? असं विचारतोय.”
माझ्या तोंडून शब्द फुटेनात. लोकं दिवाळी पहाट कशी छान celebrate करतात, छान छान कपडे घालतात आणि माझ्या बाबतीत हे काय चाललं होतं?
एकंदरीतच माझ्या करिअरच्या निवडीला शिव्या घालत मी घरी परतलो. थोडी झोप काढून झोपेची थकबाकी वसूल करण्याचा प्लॅन मनात घोळवत होतो. दरवाजा उघडताच होतो, पुन्हा एकदा फोन खणखणला. मालवाडीच्या भिडे काकांचा फोन आला होता. त्यांच्या दोन वर्षांच्या बकरीच्या घशात काहीतरी अडकलं होतं, ते urgent बोलवत होते.
एकंदरीत काय तर माझ्या दिवाळी पहाटेच्या सुखास्वप्नांचा पुरता चुराडा झाला होता. काय वाढून ठेवलं होतं पुढे, कोण जाणे!
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. मकरंद पिंपुटकर
(कथाबीज – James Herriot)
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





