image_print

सौ राधिका भांडारकर

💜 जीवनरंग ❤️

☆ प्रेम – भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सकाळपासून आईचा हा तिसरा निरोप.

“आज हलवाई येणार आहे ,लाडु बांधायला जरा मदतीला ये..”

सुरेखाचं लग्न आहे .आता काय, पाच सहा दिवसच ऊरले आहेत.सुरेखाचं लग्न ठरल्यापासुन आईची धांदल ऊडाली आहे. लग्नाची खरेदी, मानकरणींच्या याद्या, आमंत्रण पत्रिका, एक ना अनेक. मी समोरच रहात असल्यामुळे माझ्याकडुन हरघडी मदतीची अपेक्षा करणं हे आईच्या दृष्टीने स्वाभाविकच आहे..

आईचा ऊत्साह अगदी ऊतु चालला आहे.येणार्‍या जाणार्‍यांना सुरेखाचं अन् सुरेखाच्या भावी पतीचं कौतुक किती करू न किती नको असं झालय् तिला!?

माणसं अगदी हौशी आणि प्रेमळ आहेत..सुधारलेल्या मतांची आहेत.जावईबापूंचा स्वभावही अगदी मोकळा, खेळकर आहे. नशीब काढलं लेकीनं.

तिच्या या कौतुक करण्यावर माझा आक्षेप मुळीच नाही. सुरेखा तर माझी लाडकी बहीण. तिच्या सुखात मलाही तितकाच आनंद आहे, पण त्या दिवशी, देशमुख काकू आल्या होत्या. आईच्या त्या खास जवळच्या… बोलता बोलता आई त्यांना म्हणाली,

“खरं म्हणजे सुमनच्या लग्नाची माझी सगळी हौस बाकी राहिली. पोरीनं ऐकलच नाही. आता पश्चात्ताप करून काय ऊपयोग? आण्णा तर नुसते विषण्ण झाले होते. त्यांच्या प्रकृतीवरही तेव्हांपासुन किती परिणाम झाला.. पण आता हे लग्न ठरल्यापासून मनावरचं सावट जरा दूर झालंय्…”

आईनं कमीत कमी ,मी तिथेच असताना,मला काय वाटेल याचा विचार करायचा होता… तेव्हढंही भान तिने ठेऊ नये…??

आईकडून संध्याकाळी घरी परतले ती एक वेदना घेऊनच.हजारवेळा मनाला बजावलं,

“आईचं बोलणं ते…इतकं काय मनावर घ्यायचं?

शिवाय आपल्या आईचा स्वभावच आहे तो!

बोल बोल बोलण्याचा.मागाहून तिलाच वाईट वाटेल.. पण नाहीच. त्यादिवशी मनावर घावच बसला होता.

आणि कळत नकळत हे सतत जाणवत होतं की सुरेखाचं लग्न जमल्यापासून आपल्या मनाचा कुणीच विचार करत नाहीय् .आपण स्वत:चं म्हणून जे काही जपत असतो त्यावरच प्रहार होताहेत्….

मी श्रीधरशी लग्न केलं ते आईवडीलांच्या कडक विरोधाला डावलून.. विरोधाला विवीध कारणे होती.

जातीचं कारण दुय्यम असलं तरी रुढीप्रिय मनाला खटकणारं होतच.

श्रीधरची कौटुंबिक पार्श्वभूमी. श्रीधरच्या वडीलांविषयी आण्णांच्या मनात खोलवर रुजलेला अनादर, आकस होता. श्रीधरच्या वडीलांची गावात, एक चमत्कारिक लहरी व्यक्ती म्हणून ख्याती होती. या माणसाने आयुष्यभर नुसत्या बढाया केल्या. वाडवडीलांच्या इस्टेटीवर रूबाब केला.. त्यांच्या ऐदीपणावर आण्णांचा राग होता आणि तशा घरात मी सून म्हणून जावं हे मूळातच त्यांना पसंत नव्हतं… पण श्रीधर आणि मी तारुण्यसुलभ प्रीतीने बांधले गेलो होतो.

माझ्यात आणि श्रीधरच्यात दुरावा निर्माण व्हावा म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले.. धाकदपटशा.. घराबाहेर पडायची बंदी .. वगेरे अनेक.. पण एक दिवस संधी साधून श्रीधरने मला सांगितले,

“आहे त्या स्थितीत, जशी असशील तशी, माझ्याबरोबर येण्याची तयारी असेल तर चल. आपण लग्न करु. मी तुला अंतर देणार नाही……”

श्रीधरच आणि माझं एक भावविश्व होतं संसाराचे मनोरे आम्ही बांधले होते.

आम्ही वेळ, संकेतस्थळ ठरवून कुणाला नसांगता घराबाहेर पडून लग्न केलं… शिस्तीत संस्कारात वाढलेली मी… कसं केलं हे धाडस…

श्रीधरच्या नोकरीच्या गावी एका खोलीत संसार थाटला.. श्रीधरने आई आण्णांना एक जुजबी पत्र टाकलं.

आशिर्वाद मागण्यासाठी. पण माघारी ऊत्तर आले नाही.. आमचा संसार सुरू झाला.

 

क्रमश:——

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments