image_print

सौ. नीलम माणगावे

🥳 आत्मसाक्षात्कार – स्वतः स्वतःची घेतलेली मुलाखत – भाग – 2 🥳 सौ. नीलम माणगावे 🥳

त्या आधी मला सांग, एका वर्षात दोन कादंबऱ्या लिहिल्यास, त्या अशा एकदम कशा काय सुचल्या?

एकदम कशा सुचतील? खूप दिवसापासून विषय मनात होते. मुद्दे सुद्धा लिहून ठेवले होते. वेळेअभावी लिहायचं राहून गेलं होतं. आता हाताशी भरपूर वेळ असल्यामुळे लिहून काढले एवढच..

आता सांग, लिहिण्याची सुरुवात कधीपासून झाली?

कदाचित तुला खोटं वाटेल पण वयाच्या 39 व्या वर्षी मी लिहायला सुरुवात केली. आणि आता माझी 62 पुस्तके प्रकाशित झाली. आताही तुला आश्चर्य वाटेल, एवढं सुचलं कसं? लिहिलस कधी? प्रकाशक कसे मिळत गेले? आणि हे सगळं लिहिलस का? लिहिण्यामागचा हेतू काय..?

बरोबर. मला हे सगळं विचारायचं होतं. आता सांग सविस्तर..

हो सांगते, वयाच्या 39 वर्षापर्यंत मी काही लिहू शकते हेच मला माहित नव्हतं. तशी शाळेत, कॉलेजमध्ये निबंध छान लिहायची.. निबंधाचं कौतुक व्हायचं, एवढंच. लग्नापर्यंत शालेय पुस्तक सोडून अवांतर वाचन काही नव्हतं. माझ्या घरी माहेरी पुस्तकच काय वर्तमान पेपर सुद्धा येत नव्हता. अवांतर वाचन सुरू झालं ते लग्नानंतर. लिहायला लागले ते त्यानंतर. त्याची पण एक गंमत आहे. गंमत म्हणजे, जयसिंगपुरात होणारे साहित्य संमेलन ऐकून ऐकून मी लिहायला लागले. म्हणजे साहित्य संमेलनातून निर्माण झालेली मी लेखिका आहे, हे सांगताना मला आनंद वाटतो. लग्नापर्यंत च्या आयुष्यात पुस्तकं वगैरे वाचली नव्हती. पण माणसं खूप वाचली होती. माणसं फक्त वाचलीच नाहीत तर ती अनुभवली आणि पचवली सुद्धा त्याचा उपयोग लिहिण्यासाठी झाला. आता, पचवली म्हणजे काय? असं तुला वाटेल.. थोडक्यात सांगते, माझ्या वडिलांनी .. माझ्या आईच्या लग्नाअगोदर.. म्हणजे माझी आई वडिलांची दुसरी बायको. तर, माझ्या आईच्या लग्नाअगोदर ची गोष्ट..  माझ्या वडिलांनी त्यांच्या सासूचा खून केला होता. ते सापडले. जेलमध्ये गेले. शिक्षा झाली… वगैरे. तत्कालीन राजाला मुलगा झाला म्हणून काही कैद्यांना सोडले. त्यात माझे वडील सुटले.. त्यानंतर त्यांचे दुसरे लग्न  झाले. दुसरी बायको म्हणजे माझी आई.. तिने तीन मुलीच देण्याचा गुन्हा केला.. आणि तिच्याबरोबर आम्हा बहिणींचीही  फरफट झाली.. खूप त्रास झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ बंदानी खूप त्रास दिला.. लैंगिक शोषणा पर्यंतचा! माझ्या जाणत्या वयात या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा त्यातून मोकळं होण्यासाठी मी माझं आत्मकथन लिहिलं.. जसं घडलं तसं.. हे आत्मकथनाचे नाव! (मुंबई विद्यापीठाच्या बीए भाग 2 साठी हे आत्मकथन अभ्यासक्रमासाठी लावलेले आहे..)

माझ्या लेखनाला असा अनुभवातून आलेला आणि ग्रामीण जीवनाचा संबंध जिव्हाळ्याचा आहे.

कथा, कविता, कादंबरी, ललित,सामाजिक, वैचारिक.. वगैरे साहित्य प्रकारांमधून लेखन करत गेले. प्रकाशक भेटत गेले. त्यातून पुस्तके प्रकाशित झाली. अनेक पुरस्कार मिळाले. अभ्यासक्रमामध्ये कथा कवितांचा समावेश झाला.. वगैरे वगैरे

बापरे! अंगावर काटाच आला ऐकून. खरं लेखन अनुभवातून येतं म्हणतात, ते खरंच आहे..

खूप त्रास होतो गं. आजही समाजात बघताना माणसं अशी का वागतात? असा प्रश्न पडतो.. स्वातंत्र्योत्तर काळात माणसं शिकली पण शहाणी झाली का? विज्ञान शिकणारी माणसं विज्ञानवादी झाली का? विवेकी झाली का? याची उत्तरं तुलाही माहिती आहेत..

तुझं.. माजघरातील हुंदके.. असं एक पुस्तक आहे. त्याबद्दल सांग..

सांगते

क्रमशः …

 

©  सुश्री नीलम माणगावे

जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर

मो  9421200421

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

0Shares
0
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments