image_print

 🌸 जीवनरंग 🌸

☆ सापळा…भाग 4 ☆ श्री आनंदहरी

मिलला रशियाची अठ्ठेचाळीस लाख मीटर कापडाची ऑर्डर मिळाल्याने कंपनीत आनंदाचे वातावरण होते.. ऑर्डर वेळेत पूर्ण करायची असल्याने कामाचा झपाटा वाढविला होता.. कामगारही खुशीने ज्यादा काम करत होते..

अठठाविस लाख मीटर कापडाचा पहिला लॉट पोहोचवायचा होता. असिस्टंट मॅनेजरनी त्याला बोलावले आणि मालाच्या ट्रकसोबत जाऊन मुंबईच्या बंदरात माल जहाजावर चढवण्यासाठी पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. सोबत दोन सहाय्यकही दिले. वरिष्ठांनी विश्वासाने जबाबदारीचे काम सोपवल्यामुळे तो मनोमम खुश झाला होता.

माल बंदरात पोहोचेपर्यंत वाटेत वाहतुकीचा खोळंबा झाल्याने खूपच उशीर झाला होता. पोहोचायला उशीर झाल्यानं तिथली कार्यालयीन वेळ संपली होती. माल दुसऱ्यादिवशी जहाजावर चढवण्यात येणार होता त्यामुळे थांबणे भागच होते. तिथे पोहोचल्यावर तिथल्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला आपला माल येणार आहे हे माहिती असावं आणि तो त्यांची वाटच पाहत असावा असे का कुणास ठाऊक पण राहून राहून त्याला वाटू लागलं होतं आणि त्यामुळे तो आश्चर्यचकीत झाला होता.  तो त्याबद्दल  अगदी आपल्या सहकाऱ्यांना काहीच बोलला नसला तरी मनात मात्र काहीसा चिंताक्रांत झाला होता.

एखादा जुना, जवळचा आप्त किंवा मित्र भेटावा आणि त्याने आपुलकीने स्वागत करावं, चौकशी करावी, पाहुणचार करावा तसा तिथला कर्मचारी त्यांच्याशी वागत होता.. बोलता बोलता त्याने सहजतेनं बोलण्याच्या ओघात असिस्टंट मॅनेजर साहेबांचं नावही घेतलं होतं. आपल्या साहेबांनी त्याला आपली व्यवस्था करायला सांगितली असावी असं त्याला आधी वाटलं पण नंतर मात्र त्याला वाटू लागलं की साहेबांनी आपली व्यवस्था केली असती तर तसे साहेबांनी आपल्याला निघतावेळी स्वतःहून सांगितलं असते. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली होती.

“आता उद्याशिवाय माल काही जहाजावर चढत नाही.. मुंबईला आलाय तर या जावा जीवाची मुंबई करून… मराठा मंदिरला एखादा पिक्चर टाकून, मस्तपैकी चिकन-बिकन खाऊन.. झोपायला इकडंच या बरं का… ऑफिसात रेस्टरूम आहे तिथं केलीय तुमची झोपायची सोय..”

त्या कर्मचाऱ्याने ‘जीवाची मुंबई ‘चं वर्णन आणि आग्रह असा काही केला की त्याचे जोडीदार एका पायावर जायला तयार झाले होते.. त्याला जावं असं वाटत नव्हतं पण तो नाईलाजाने गेला.

रात्री उशिरा परत आले तेंव्हा त्यांच्या डोळ्यांत झोप मावत नव्हती. रेस्टरुम मध्ये जाऊन गुडूप झोपले. त्यांना सकाळी जाग आली ती पोलिसांनी जागं केल्यावरंच. डोळे चोळत ते उठले. समोर पोलीस पाहून त्यांना काहीच समजेना. ते मनातून खूप घाबरले होते. पोलिसांनी त्यांना गाडीत टाकलं आणि पोलिस स्टेशनला घेऊन गेले होते.

पोलिसांनी प्रश्न विचारायला सुरवात केली तेंव्हा त्यांना कळलं होते की रशियाला पाठवण्यासाठी त्यांनी आणलेलं अठठावीस लाख मीटर कापड जहाजावर चढवायच्या आधीच लंपास झालं होतं, चोरीला गेलं होतं. ते ऐकूनच त्याला आणि त्याच्या सोबत्यांना प्रचंड धक्काच बसला होता. थोडावेळ प्रश्न विचारून त्यांना बाकड्यावर बसवले होते. ते तिघंही स्वतःच्याच विचारात गर्क होते. ते रात्री पिक्चर बघायला गेले होते तेव्हा तर कापड ट्रकमध्येच होते.. ’ सकाळी माल जहाजावर चढवण्यात आल्यावर पोहोच मिळेल ‘ असेही त्याला सांगण्यात आलं होतं. ‘ ते कापड म्हणजे कुणाला दिसू न देता लपवून लंपास करायची, खिशातून न्यायची छोटीशी वस्तू किंवा गोष्ट नव्हे, मग ते गेलं कसे ? आणि नेलं कुणी ? ‘ त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ घोंघावू लागलं होतं.

तो विचारात गर्क असतानाच पोलीस स्टेशन मध्ये कापडमिलचे मालक, मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर आले. खरंतर तातडीने  मुंबईला जायचं आहे असे मॅनेजरसाहेबांनी म्हणल्यावरच  असिस्टंट मॅनेजर वाडेकरांना काहीसा धक्काच बसला होता.. पण चेहऱ्यावर काहीच दिसू न देता ते शांत बसले होते. गाडीत मॅनेजरसाहेब मागे मालकांशेजारी बसले होते त्यामुळे काहीही न बोलता, न विचारता असिस्टंट मॅनेजर गप्प बसले होते. .मुंबईत आल्यानंतर गाडी थांबली ती थेट पोलीस स्टेशनच्या आवारात. पोलीस स्टेशन समोर उतरताना त्यांच्या मनात खळबळ माजली होती पण त्यांनी प्रयत्नपूर्वक चेहरा नेहमीसारखा ठेवत विचारलं,

“साहेब, इथं ?”

“हो, काल रात्री रशियाला पाठवायचा सगळा माल चोरीला गेलाय..”

“क्काsय ?”

स्वतःच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत धक्का बसल्यासारखे असिस्टंट मॅनेजर वाडेकर म्हणाले आणि मालकांच्या पाठोपाठ पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढू लागले.

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

0Shares
0
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments