सुश्री गौरी गाडेकर
पुस्तकांवर बोलू काही
☆ “यश अपयश आणि मी” – लेखिका : डॉ. विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत ☆ परिचय – सुश्री गौरी गाडेकर ☆
पुस्तक : यश अपयश आणि मी
…. असाध्य ते साध्य.
लेखक: डॉ. विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत
प्रकाशक: माय मिरर पब्लिशिंग हाऊस
प्रथमावृत्ती: नोव्हेंबर २०१७
पृष्ठे:१९२
किंमत:₹१९५/-
‘यश अपयश आणि मी’ हे डॉ. विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत यांनी लिहिलेलं पुस्तक. आत्महत्येला प्रवृत्त झालेल्या आईला पुन्हा जीवनोत्सुक बनवण्याच्या प्रयत्नांची ही अनुभवगाथा आहे.
आईंच्या शेजारीच राहणाऱ्या विठ्ठल सरांच्या भावाने ‘तू दोन तास आईबरोबर काढून दाखव, ‘ या शब्दांत आईंची हेटाळणी केली. त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या वागण्यामुळे आईंच्या आत्मसन्मानावर आघात झाला आणि त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. त्यातूनच अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सनचा उद्भव झाला.
यावर काहीही उपाय नाही, असं डॉक्टरांनी सांगूनही विठ्ठल सरांनी हार मानली नाही. आपल्या कर्तृत्ववान, खंबीर आईला यातून बरं करण्यासाठी त्यांनी जिवाचं रान केलं.
एकेक प्रयोग करत पायरीपायरीने सरांनी आपल्या आईला या रोगांच्या विळख्यातून कसं मुक्त केलं, यांची ही कहाणी आहे. त्यांच्या मते, यामागचं रहस्य म्हणजे ट्रिपल Aकॅप्सूल – Attention, Affection & Appreciation. यातून त्यांनी दिलेला अत्यंत महत्त्वाचा धडा म्हणजे ‘If you take care of your parents, your children will take care of their parents. ‘
या अनुषंगाने आपण, अपयशाचे रूपांतर यशात कसं केलं, याची इतरही अनेक उदाहरणं सरांनी दिली आहेत.
तसेच सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतरही पैलू, त्याविषयीचे संदर्भ या पुस्तकात वाचावयास मिळतात. उदाहरणार्थ, पर्यावरणप्रेमी सरांनी पक्ष्यांसाठी केलेली व्यवस्था, ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई’ या गीतावरून स्फुरलेलं ‘A child gives birth to a mother’ हे शिल्प, हे बांद्रा, मुंबई येथील ज्या बागेत आहे, तशा तऱ्हेने जोपासलेल्या अनेक बागा वगैरे.
सौ. वर्षा बेटावदकर यांच्या लेखनसहाय्यामुळे हे पुस्तक अतिशय परिणामकारक झाले आहे.
आईचा उसवलेला चेहरा विणून पूर्ववत करणारे विठ्ठलसर दर्शवणारे मुखपृष्ठ हे या पुस्तकाचे सार आहे. ही कल्पकता श्री. सतीश भावसारांची.
एकंदरीत, ‘यश अपयश आणि मी…. असाध्य ते साध्य’ हे पुस्तक नुसतंच वाचनीय नाही, तर संग्रहणीय आहे. एवढंच नव्हे, तर किशोरवयीन मुलांवर चांगले संस्कार घडावेत, यासाठी त्यांना भेट म्हणून देण्यासारखं आहे.
परिचय – सुश्री गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







पुस्तकाचं रसग्रहण छान केलं आहे.