image_print

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ निसर्ग माझा, मी निसर्गाचा  – प्रा. विजय जंगम ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

पुस्तकाचे नाव: निसर्ग माझा, मी निसर्गाचा

लेखक: प्रा. विजय जंगम

प्रकाशक: अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर.

किंमत: रू.260/.

प्रा. विजय जंगम लिखित ‘निसर्ग माझा,मी निसर्गाचा हे अलिकडेच प्रकाशित झालेले पुस्तक नुकतेच वाचनात आले.सारे काही निसर्गाविषयीच असेल असे गृहीत धरून पुस्तक वाचायला सुरुवात केली.काही पाने वाचून झाली आणि असे वाटू लागले की आपण वर्गात बसलो आहोत आणि आपले सर आपल्याला एक एक विषय व्यवस्थित समजावून सांगत आहेत.पुस्तकाच्या नावात जरी निसर्ग हा शब्द असला तरी या पुस्तकाचा विषय फक्त निसर्गापुरता मर्यादीत नाही.कारण अमर्याद निसर्गाचा विचारही संकुचितपणे करता येणार नाही.त्यामुळे निसर्ग आणि मानव यांचा विचार करताना लेखकाला अध्यात्म,विज्ञान आणि तत्त्वज्ञान या शास्त्रांचाही विचार करावा लागला आहे.प्रथमदर्शनी अवघड वाटणारे हे विषय लेखकात लपलेल्या शिक्षकाने अतिशय सोपे करून सांगितले आहेत.

पुस्तकाची विभागणी छोट्या छोट्या बत्तीस प्रकरणांमध्ये केलेली असल्यामुळे एक एक मुद्दा समजून घेणे सोपे झाले आहे.सृष्टीची निर्मिती कशी झाली,त्यामागचा  वैज्ञानिक सिद्धांत काय आहे हे सुरूवातीला स्पष्ट करत एकेका प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.विश्वनिर्मिती मागील अध्यात्मिक दृष्टीकोन विषद करतानाच विश्वाची निर्मिती होण्याआधी काय होते याचाही शोध ते घेतात. पंचमहाभूते, सप्तसिंधू , ब्रह्मांड,जन्म मरणाचा फेरा, ब्रह्म, मूळमाया असे अनेक शब्द आपल्या कानावर पडत असतात. त्या सर्वांचे साध्या,सोप्या भाषेतील स्पष्टीकरण आपल्याला येथे वाचायला मिळते. पंचमहाभूतांची निर्मिती, त्यांचा मानवी  शरीराशी असणारा संबंध, मानवाची गर्भावस्था, त्याची ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, अंतरेंद्रिये, मन आणि चित्त यातील फरक, पंचप्राण अशा अनेक विषयांवर सहजपणे भाष्य केले आहे.याशिवाय मानवाचा अहंकार,प्राकृतिक गुण,त्रिगुणी मनुष्यप्राणी, त्याचे सात्विक गुण, दुःख, सुख आणि आनंद यातील फरक यासारख्या अनेक विषयांसंबंधी असणार्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. अंतिम आणि अटळ असा मृत्यू, मृत्यूचे प्रकार याविषयी लिहीताना चिरंजीवित्व ही एक कल्पना आहे असे ते म्हणतात.

माणूस आणि निसर्ग यांच्यातील दुरावत चाललेल्या नात्यासंबंधी चिंता व्यक्त करून निसर्गाच्या पुनर्जन्माचीच आवश्यकता असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.

श्री श्रीकांत वडियार यांनी चित्रित केलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे. निसर्गाचे मानवाशी असलेले अतूट नाते, पुढील पिढ्यांसाठीही त्याची असलेली आवश्यकता आणि निखळ नैसर्गिक आनंदाचे दर्शन घडवणारे हे मुखपृष्ठ योग्य रंगसंगती मुळे आकर्षक ठरले आहे.

पुस्तकात अनेक ठिकाणी येणारी संतवचने, संदर्भ, गीता,दासबोध, चाणक्य नीती,अशा ग्रंथातील दाखले हे लेखकाच्या वाचनसमृद्धीचे द्योतक आहेत.अनेक ठिकाणी त्यांच्या लेखणीतून उतरलेली वाक्ये ही सुवचनाप्रमाणे वाटतात.उदाहरण म्हणून, ‘उपाशीपण हे नेहमी भरकटलेलं असतं’, आनंद हा कधीच परावलंबी नसतो’, ‘माणसाला अंतर्मुख व्हायला दुःख ही एक संधी असते’, ‘वेदनाच खरं बोलते’ अशा काही वाक्यांचा उल्लेख करता येईल.

मला तर वाटते की निसर्गाच्या माध्यमातून अध्यात्माच्या दारापर्यंत नेऊन पोचवणारा विज्ञाननिष्ठित भक्तीमार्ग या पुस्तकाने दाखवून दिला आहे.

 

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shankar N Kulkarni

प्रा.विजय जंगम यांचे “निसर्ग माझा,मी निसर्गाचा” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्या पुस्तकााचे परिक्षण श्री.पंडितानी मोजक्या शब्दात छाान प्रकाारे केले अाहे.थोडक्यात त्यानी पुस्तकााची अाम्हाला ओळखच करून दिली.