image_print

सौ. कल्पना मंगेश कुंभार

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆ प्रकाशवाटा – डॉ. प्रकाश आमटे ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆ 

पुस्तकाचे नाव: प्रकाशवाटा

 लेखक : डॉ. प्रकाश आमटे

शब्दांकन : सीमा भानू

प्रकाशक : समकालीन प्रकाशन 

पृष्ठ संख्या : १५६ 

किंमत : रु. २००/-

परीक्षण :  सौ कल्पना कुंभार.

आजपर्यंत अनेक समाजसुधारक पाहिले..पण मनात अगदी खोलवर घर करून राहिले ते बाबा आमटे व डॉ .प्रकाश आमटे..त्यांनी आदिवासींच्या जीवनात आनंद तर निर्माण केलाच पण त्या आनंदाला भरारी मारण्याचे पंखही दिले…त्यांच्या पुस्तकाचे परीक्षण करण्याइतकी मी नक्कीच तेवढी जाणकार  नाही..पण जे भावलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न करत आहे..

डॉ. प्रकाश आमटे यांचे सीमा भानू यांनी शब्दबद्ध केलेले ” प्रकाशवाटा ” हे आत्मचरित्र वाचनात आलं आणि मी भारावल्यासारखी हेमलकशात  जाऊन पोहचले..पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कंदील घेऊन डॉ. प्रकाश आमटे उभे असलेले आपल्याला दिसतात..जणू  ” कितीही अंधार असुदे..खाचखळगे असुदे..या कंदिलाच्या उजेडात ही वाट चालणारच आहे ” असे सांगत आहेत..तर मलपृष्ठावर बाबांसोबत व ताईसोबत  उभयंताचा फोटो आहे ..तो पहाताना त्यांचा साधेपणा मनाला भावतो..त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाच तेज ..व निस्वार्थी प्रेम  पाहून आपोआपच आपण नतमस्तक होतो त्यांच्यापुढे ….

प्रकाशाची वाट..

खडतर

          अवघड..

डोंगरदऱ्यांची

             वळणावळणाची

खाचखळग्याची..

तरीही बाबांचा विश्वास

 व ताईंची माया..   मंदाताई व प्रकाश दादांचा आत्मनिर्धार …

यामुळेच कुष्ठरोगी व आदिवासी समाज आज मानाने जगतोय..

ज्या वाक्यामुळे माझ्या बकेट लिस्ट मध्ये उर्वरित आयुष्य हेमलकशात  व्यतीत करायचे ही इच्छा मी लिहून ठेवली ते  म्हणजे.. डॉ .प्रकाश आमटे म्हणतात, ” हेमकशात आम्ही ज्या विपरीत परिस्थितीत काम करत होतो ते पाहून लोक आम्हाला वनवासातल्या राम सीतेची उपमा द्यायचे.पण मी तर म्हणतो , की सीतेला सोनेरी हरणाच्या कातड्याचा तरी मोह झाला.मंदाला मात्र कसलाच मोह कधीही झाला नाही ..अबोलपणे पण खंबीरपणे ती आयुष्यभर काम करत राहिली.” किती ही विरक्ती.. किती निरपेक्ष, निस्वार्थी भावना..मी क्षणांत नतमस्तक झाले त्या कुटुंबापुढे…” हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे..माणसाने माणसाशी माणसासम वागणे…”असा सेवाभाव नसानसांत भिनलेले हे आमटे कुटुंब..आजही तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहे..

आपला जीवनप्रवास उलगडताना अगदी प्रांजळपणे मनातले सगळे विचार ,भावना ,इच्छा ,स्वप्ने डॉ .प्रकाश आमटे आपल्यापुढे एकेक करून खोलत जातात…

‘मॅगसेसे ‘ चा आनंद  मध्ये ‘ अंधाराकडून उजेडाकडे ‘ वाटचाल चालू असताना ‘आशियाच नोबेल ‘ म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार डॉ प्रकाश व मंदा आमटे या उभयतांना जाहीर झाला आणि लोकबिरादरी प्रकल्पाला बळ मिळालं.. याबद्दल सविस्तर लिहिलं आहे..१७ वर्षे ज्या भागात वीजच नव्हती तेथे आज ४० खाटांचं हॉस्पिटल आहे तिथे उपचार करून घ्यायला लांबून लांबून लोक येतात हे अभिमानास्पदच.  

 ‘आनंदवनातले दिवस ‘ मध्ये त्यांनी त्यांचं व त्यांचा भाऊ विकास यांच्यासाठी बाबा ‘ रोल मॉडेल ‘ कसे बनले? कळत नकळत कसे संस्कार रुजवले गेले..आणि कुष्ठरोग्यांवर उपचार करायला डॉक्टर जेंव्हा यायचे नाहीत तेंव्हा बाबा स्वतः त्यांच्यावर उपचार करत हे बघून डॉक्टर व्हायची इच्छा कशी निर्माण झाली.. याचे चित्रच  डोळ्यासमोर उभे केले आहे..

‘आनंदवनाबाहेरच्या जगात ‘ या भागात डॉ प्रकाश आमटे यांच्या शिक्षण..नागपूर मधील वास्तव्य.. मंदा ताईंची भेट..मेडिकल कॉलेज मध्ये त्यांची जुळलेली वेव्हलेंग्थ.. आणि दोघांचा आगळा वेगळा विवाह याबद्दल वाचताना आपणही त्या काळात पोहचतो..आणि मंदा ताईंबद्दल चा अभिमान डोळ्यात दाटून येतो..

यानंतर मुक्काम हेमलकसा, कसोटीचे प्रसंग ,विस्तारती वैद्यकीय सेवा, जीवावरचे प्रसंग, शाळेची सुरुवात , अनोखे प्रयोग ,प्राण्यांचं गोकुळ,पुढची पिढी,समाजमान्यता जगन्नाथाचा रथ असे विविध भाग वाचता वाचता आपण कधी हेमलकसातीलच एक होऊन जातो हे समजतच नाही..कसोटीचे व जिवावरचे प्रसंग वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा रहातो तर फोटो पाहताना अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जे स्वप्न साकार केले त्याचा निश्चितच खूप अभिमान ही वाटतो…हेमलकसाचा प्रकल्प प्रत्यक्षात यावा यासाठी अनेक अनामिक कार्यकर्ते,कुष्ठरोगी देणगीदार ,स्नेही यांनी सहकार्य केले आहे.. आणि म्हणूनच हा ” जगन्नाथाचा रथ ” चाललेला आहे अशी प्रांजळ कबुली देणारे..अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे… आदिवासींच्या उन्नतीसाठी झटणारे..डॉ प्रकाश आमटे मला तर माणसाच्या रुपात असलेले देव च वाटतात..

काही माणसं 

वेड लावून जातात

गाभाऱ्यातल्या नंदादीपासारखी सतत हृदयात तेवत रहातात..

त्यांच हसणं ,त्यांच बोलणं

हृदयात कोराव वाटतं

साकार झालेल्या प्रतिमांशी 

जीवन जगावं वाटतं..

अशीच

काही माणसं . ..

आपलं आयुष्यच बदलून टाकतात…

माझं आयुष्य बदलणारे ..मला सकारात्मक दिशेला नेणारे ..माझ्या सामाजिक जाणिवा जागृत करणारे..आणि माझ्या मनातील हेमलकसा मध्ये जाऊन तिथे समाजकार्य करण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी  मनात भावना निर्माण करणारे हे पुस्तक ” प्रकाशवाटा ” सर्वांनी अगदी नक्की वाचा.

© सौ. कल्पना मंगेश कुंभार

इचलकरंजी

मोबाईल नंबर:9822038378

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments