? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “मी येतोय बरं!.. ” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

श्री नंदकुमार पंडित वडेर

“… मगं काय दशावतराची दिवसरात्र रंगीत तालमी जोरात चालू आहेत वाटतं!…. गणपती बाप्पाचा काॅस्च्युम घालूनच चहाला आलात ते!… बाकी या बाप्पाच्या काॅस्च्युम

 मधे तुम्ही तर खरचं बाप्पाच चहा प्यायला टपरीवर आल्यासारखाच वाटतोय!… आपले बाकीचे सहकलाकार कुठे आलेले दिसत नाहीत!… का ते आधीच चहा पिऊन तालमी साठी परत गेलेत?… हो तेही खरचं असणार म्हणा!… तुम्हाला या सोंडेतून चहा प्यायची कसरत करावी लागत असल्याने निश्चितच वेळ नाही का लागणार?… मगं थोडा वेळ तो बाप्पाचा मुखवटा काढून ठेवला असतात तरी चाललं असतं… आज पावसाने तर सकाळपासून दमदार बॅटींग सुरू केलीय!.. मी गणपतीला रत्नागिरीला घरी जाण्यासाठी रेल्वेचं तिकिट काढायला म्हणून स्टेशनवर येतो काय?.. नशिबाने मला हवं असलेल्या तारखेचं कन्फर्म तिकिट लगेच मिळतय काय?… कधी नव्हे ती रेल्वेची कृपा झाली.. होय हो, एक वेळ तुमचीच म्हणजे गणपती बाप्पाची मर्जी, आपलं कृपा सहजगत्या होईल पण रेल्वेचं हवं तेव्हाचं रिझर्वेशन मिळायची कृपा कधीच होत नाही!… ती आज झाली नि आनंद माझ्या पोटात माईना माईना….. असल्या पावसात गरमागरम चहा पिण्याची तलफ आली म्हणून मी इकडे आलो तो. तर तुमचं प्रत्यक्ष बाप्पाच्या रूपात दर्शनच झालं… अगदी देव साक्षात भेटीला आल्यासारखे वाटते… काय योगायोग असतो नाही का!… तुमचं काय म्हणणं यावर?. “

“.. हो! हो. !. वत्सा थोडा धीर धरं. !.. त्या मशिनगनमधून धाड धाड गोळ्यांच्या फैरी झाडव्यात तश्या मुखातून एका पाठोपाठ एक प्रश्नांच्या फैरीवर फैरी सोडल्यास कि माझ्या वर!… मला वाटलं तूच बोलत राहणार आणि मी फक्त ऐकायचं काम करायचं!… पण शेवटी तू दमलास आणि मला बोलायची संधी दिलीस त्याबद्दल तुझे थँक्स.. हं तर वत्सा! मी कोणी कुठल्या दशावतारातील नाटकातील गणपती बाप्पाची भूमिका करणारा कलावंत नसून मी खराच गणपती आपलं तुमचा लाडका देवबाप्पा आहे बरं!.. आणि मी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आधी महिनाभर इथं या स्टेशनवर नुसता संचार करत असतो… कारण याच वेळेपासून तुमचं कोकण रेल्वेचं आरक्षण सुरू होणार असतं… आणि मुंबईतला चाकरमानी कोकणातला माणूस इकडचं जग तिकडं उलथल़ं तरी गणपतीच्या सणाला गावाकडे जाणार म्हणजे जाणारच… कामावरून मंजूर रजा मिळो वा न मिळो.. रेल्वे बसची तिकिटा मिळो वा न मिळो पण मिळेल त्या वाहनाने गणपतीला घरं गाठणार म्हणजे गाठणारंच!… अशी माझ्यावर निस्सीम भक्ती करणारी मंडळी फक्त कोकणातच बघितली बरं… पण मी संपूर्ण देवाच्या वेषभूषेत न येता तुम्हा मानवांच्या नित्याच्या वेशभूषेत इथं या स्टेशनवर फिरत असतो… ती गणपतीची सगळ्या दिवसाची रेल्वे तिकिटा खिडकी उघडता उघडताच संपून गेलेली असतात… याचं दरवर्षी मला ना कोडं पडतं.. सकल विद्येचा मी दाता हा स्थायीगुण माझाच असला तरी या तिकिट रिझर्व्हेशनच्या बाबतीत माझी मतीच गुंग होते… देव असून मला तिथे कुठलाच चमत्कार वगैरे दाखवता येत नाही याचं मात्र दुख होतं.. ती रात्रभर लाईनीत उभी राहीलेली माझ्या भक्त मंडळींचा भ्रमनिरास मला पाहवत नाही.. आणि तो तिकडच्या दूरच्या कोपऱ्यातला पांढरा पायजमा कुरता वाला आपल्या डोक्यावरची गोल टोपी सारखी फिरवत… रत्नागिरी अडीच हजार, कुडाळ चार हजार सावंतवाडी पाच हजार.. भावाचे मुलमंत्र घोकत असतो… माझ्या प्रमाणे तो ही दरवर्षी न चुकता या ठिकाणी या वेळेलाच मला दिसतो… रेल्वे नाही तर नाही बस तर नक्कीच कोकणी माणूस प्रयत्न करणार आणि गणपतीला जाताना आकाशाला भिडलेली कितीही भाडेवाढ झालेली असली तरी त्याच्या भक्तीच्या विशाल हृदयात श्रद्धेची फुलंच फुलं उमलेली असतात तिला कुठल्याही काट्यांनी कमीपणा येत नाही.. दलाल लोकांना अडलेल्या गरजूला नाडून घेतल्याशिवाय त्यांना लक्ष्मी प्रसन्न होत नाही त्यांच्या ही दिवसागणिक चढतीभाजणीचा खेळ सुरू असतोच… रस्ते तर खड्याने अडवलेले असतात.. जागोजागी टोलनाके दरडोखोरांसारखे भाविकांच्या वाहनावर अव्वाच्या सव्वा टोलधाड घालत असतात… कोकणातील माणूस अनेक आपत्तींना तोंड देत देत आपलं जेव्हा गावं गाठतो तेव्हा अत्युच्च आनंद होतो… चतुर्थी पासून ते अनंतापर्यंत दहा दिवस सकाळ संध्याकाळ आरती महाआरती, पूजाअर्चा, गौराईचं आगमनाची तयारी.. रोज रात्री भजन, भारूड, डब्बल बारी… दशावताराचा एखाद्या भाग… गावातल्या हौशी तरुणांनी बसवलेले नाटक… एक ना अनेक करमणुकीचे आनंदवर्धक भरघोस कार्यक्रम.. मी मखरात बसून बघत असतो. शेवटी कर्ता करवीता तो मीच असल्याने जे जसं होईल ते तसंच मला अर्पण करत असतात.. मग मला कुठे बरी असावी ती आवड निवड.. पण खेड्यातल्या या भक्ती ला स्पर्धाचे ग्रहण लागले.. भक्ती तोलणारा तराजू वगर्णीच्या रककमेवरच तोलला जाऊ लागलाय… सावंतांच्या गल्लीचा राजा तर काळसेकरांच्या गललीतला महाराजा.. एकमेंकावर कुरघोडी करू लागलाय… पवित्र आणि निर्मळ मनाने केलेली पूजेला पावणारा बुद्दीदेवाचे.. आता आपल्याच बुद्धीचे दिवाळे वाजवून नवसाला पावणारा महागणपती म्हणून गावोगावी जाहिरात बाजीचं धंदेवाईक मार्केटिंग करू लागलेत… चुकून माकून बोला फुलाला गाठ पडावी तसा एखाद्याचं किरकोळ मागणं सत्यात उतरलं गेलं कि… गणपती पेक्षा गुरवाचाच गोरक्ष धंदा जोमात चालतो… आणी मी मात्र डोळे कान, मन सगळं सगळं उघडे ठेवून निर्विकारपणे एकही शब्द न बोलता बघत बसतो… दहावा दिवस कधी उजाडेल नि मी परत माझ्या गावाला कधी परत जातोय याचीच वाट पहात असतो… ते दहा दिवस अक्षरश झिट आणून सोडतात.. कोकणात आलेला चाकरमानी अकराव्या दिवशी मिळेल ती गाडी पकडून मुंबईला कामधंद्यावर हजर होतो… ती त्याला मिळालेली त्या दहा दिवसातली उर्जा पुढच्या वर्षीच्या माझ्या आगमनापर्यंत पुरते… आणि गणपती बाप्पा मोरय्या पुढच्या वर्षी लवकर या… या आरोळीच्या नादाच्या गुंजनात स्वताला हरवून बसतो… आता अलिकडे मला देखील दर वर्षी या दहा दिवसाच्या आगमनाची ओढ लागून राहिलेली असते… या दिवसातच मी प्रत्येकाला त्याच्या नकळत चांगलाच ओळखत असतो… आता मनी नसतो भाव श्रद्धाळूचा बडा दिखाव… सणांचं पारंपरिक माहात्म्य लोपलंय तिथं सणाचं इव्हेंटमध्ये सोनंच सोनं चमकतयं… समाजप्रबोधनाचे विचारांचे व्यासपीठ छचोर, सवंग तद्दन कलाविष्काराचं पीठ दळतयं… देशाभिमान, समाजाभिभान, धर्माभिमान, भाषाभिमान, आणि आणि स्वाभिमान या पोकळ अर्थहीन शब्दांचे बुडबुडे झाले… आणि राजकीय स्वार्थासाठी त्यांचेच वाद निर्माण करून लोकमानसाची दिशाभूल करून अराजकता निर्माण करून अस्थिरता आणलीय… पूर्वी पॅकेट सिस्टीम होती आता सगळीकडे पॅकेजचाच बोलबाला आहे.. मधुबालाचं निखळ सोज्वळ सौंदर्य तिच्याबरोबरच अस्तंगत झालयं आणि बारबालाचं भडक मादक बेगडी सौंदर्य उदयाला आलयं.. भजन, कीर्तनातले गाता गळ्याचे बुवा जाऊन त्या ठिकाणी शिंदळकी करणारी बुवाबाजी आलीय… संत मंहत, थोरा मोठ्यांच्या विधायक कार्याने घडलेल्या इतिहासाच्या वारसा असलेला हा देश आता त्यांच्याच नावावर आणि प्रतिमांच्या चौकटी ठिक ठिकाणी भिंतीवर लावून आपलचं चोरांचचं राज्य करु लागलाय.. विद्यावंताला बटीक आणि खुशमस्करेनां मलिदेचा खाटीक केला गेलाय… हा सगळा हैदोस मी जसा पाहतो तसा माझे असंख्य भक्त ही पाहतात अनुभवत आहेत… आणि दरवर्षी माझ्या आगमनाच्या वेळी हे गणराया या हैदोसाला आता तुझ्या शिवाय पायबंद कोण घालेल बरं.. असं साकडं घालतात.. तूच कर्ता आणि करविता आहेस असं म्हणतात… पण वत्सा माझं असं म्हणणं आहे की हे तर सगळंच तुमचकचं कतृत्व आहे… यात मी कशी ढवळाढवळ करणार… मी फक्त सामर्थ्य देऊ शकतो.. लढाई तर तुम्हालाच लढावी लागणार आहे… बुद्धीच वरदान तर मी तुम्हांला कधीच दिलयं पण ते वापरायचं असतं की नसतं हे तुम्हीच ठरवायचं रे… नाहीतर शोभेच्या डोक्यावर पगडी, टोपी, नि फेटा बांधताहातच कि तुम्ही आता तर माझ्याही डोक्यावर तुम्ही मुकूट असताना फेटा बांधयला कमी करत नाही… मला तर वाटतं हे फेट्याचंच जग आहे आणि सगळं विधायक विचारांना फेटाळून लावत विघातक विचारांची नि कृत्यांची फक्त फेटे उडवाउडवी चालेली दिसतेय… खऱ्याला कुणी ओळखत नाही कारण खरं ओळखायची निर्भेळ, निरक्षीरविवेक दृष्टी कुठे आहे… खोट्याची झगमती दुनियेपुढे डोळे तर दिपून जातातच पण मती देखिल गुंग होऊन जाते… कालाय तस्मै नम: म्हणून सोडून द्यायचं!… आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे गणपती बाप्पा मोर्या म्हणत राहायचं… माझा चहा पिऊन झालाय तेव्हा मी आता इथंनं निघावं म्हणतो… बघं तुला माझं काही पटलं असेल तर यावेळी आचरणात आणता येतयं काय ते! आग्रह नाही माझा पण लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देश्याने हा उत्सव सुरू केला होता त्याला थोडासा न्याय दिल्यासारखे होईल… ! “

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments