श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “बरसात में हमसे मिले तुम सजन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
.. त्यावेळी पण हा पाऊस असाच पडत होता… आभाळाने तर आपल्या पांढऱ्या ढगाची कात टाकली होती आणि नवी कोवळी काळी सावळी चंद्रकळा अंगभर पांघरून लपेटून घेतली होती आभाळानं.. जसा तिनं साडीचा पूर्ण पदर आपल्या अंगा भोवती लपेटून घेतलेला होता तसा… सकाळचे वाजले किती असावेत सांगणारं घड्याळ आज थंडीनं गारठलं होतं अन बाराच्या आकड्यावरच विसावलं होतं… जसं तास काट्याला मिनिट काट्यानं गाढ आलिंगनात घेऊन आपल्या प्रेमाची उबेची देवाणघेवाण करत होता… त्यांचे तसे ते प्रीती च्या पावसात एकरूप होण्याने सेंकद काट्याची चिलबिचल वाढली होती… काय करू कसं करू म्हणजे मलाही त्या तास काट्याला असचं मिठीत घेता येईल… असा कोणता निवांत एकांतपणा देणारा एक ते बारा मधला कुठला तास बरं असेल कि त्या ठिकाणी माझं मनोवांछित बिनधोकपणे पूर्ण होईल.. त्या तासाच्या शोधात बिचारा सेंकद काटा आपल्या चंचल स्वभावानुसार एकाही ठिकाणी जराही स्थिर न होता आपला शोध जारी ठेवत राहीला… मधे मधे त्याला तास काटा एकटा असताना भेटतही होता पण सेंकद काट्याला ती क्षणभंगुर भेटीचं सुख नको होते.. अन दिर्घ भेटीची स्वप्नं त्याला खुणावत खुणावत पुढे पुढे खेचून नेत होती. फुलपाखरा सारखं उडत उडत घेतलेल्या सुखात मधाची गोडी मनात न उतरता कुठेतरी पायाला, पंखाला लागून एका फुलावरून लगेच दुसऱ्या फुलावर जायचं इतकं का बेगडी प्रेम आहे का आपलं सेंकद मनाला समावत राहिला… तास काट्याला वाटायचं सेंकदाला कळत कसं नाही.. इतकं का झुरतं कोणी प्रेमात एखाद्याच्या जे माणूस आपलं कधीच होणार नाही हे सत्य वज्रलेप असताना. शब्दाने दोन गोष्टी त्याच्याशी बोलायला जावं तर तो आता नको आता नको बोलूस काही असं नकाराची मानं सतत हलवत हलवत पुढे पुढे सरकत जातो… आता पळणाऱ्याच्या मागे मागे पळतं का कुणी… आणि तसं त्याला ठाऊक नसेल का ज्याने मला या बारा आकड्यांच्या पिंजऱ्यात आणून ठेवलयं तो दर तासाला एकदा तरी वेगवेगळ्या पिंजऱ्यात मला भेटूनच जात नसेल… मला ठेवलयं त्यानं आपल्या संसारात गु़तंवून आणि आपण जातो हिंडत बारा गावं पालथं करीत संसाराचा चरितार्थ चालविण्याचा पुरूषार्थ करायला… आणि तसं त्याचंही बरोबरच आहे म्हणा त्याच्याशिवाय दुसरं आहे कोण मला असा भक्कम आधार नि विश्वासनं प्रेमाची काळजी घेणारा… आणि मलाही कुठं त्याच्यासारखं नि त्याच्याबरोबरीनं इतकं भरभर कुठ पळायला जमणारं होतं.. मंदगतीच्या चालीची मी.. मी कुठल्याही तासाच्या घरात असले तरी उरलेल्या अकरा तासाच्यां कुठल्याही घरात तो असला तरी त्याचं लक्ष टेहळणी केल्यासारखं माझ्याकडेच असते…. असावा का कुठला शंकेचा किंतू माझ्याबद्दल त्याच्या मनात असं काही वेळा माझ्या मनात सुई टोचत राहते संशयाची… माझंही आहेच कि त्याच्यावर निस्सीम प्रेम त्या दिवसापासून ज्या वेळी आमची पहीली भेट झाली होती तेव्हा पासून… मग मी कधी दाखवला का माझ्या प्रेमातला दुजाभाव… नाही तसं माझ्याकडुन कदापिही होणं शक्य नाही.. एकदा आपला मानला, झाला कि तो अखेर पर्यंत तोच एकमेव… कपाळीचं कुंकू नि गळ्यातलं मणी मंगळसूत्र अक्षय सौभाग्याचं लेणं जीवापाड जपणं हाच धर्म पाळत आलेय मी… पण तो सेंकद काटा जेव्हा जेव्हा त्याच्या जवळून जात असतो तेव्हा तेव्हा मिनिट काट्याचा रागाने अहंकार फुलून येतो काही क्षणाचीं दोघांची नजरानजर नि बोलाचाली नक्कीच होत असणार आणि मिनिट काटा त्याला ठणकावून, धमकावत असणार तू इथून चालता हो… फिरून या ठिकाणी जर मला दिसलास पाय टाकलास तर तुझं तंगडचं तोडून टाकीन… जो आता तू तुरूतुरू मजनू सारखा चालत प्रेयसीच्या मागे मागे लागला आहेस ना तोच तुला एका पायाने लंगडत चालत जावे लागेल कायमचे… आणि तसं या जगात भले भले चांगल्या धडधाकटांची डाळ जिथे शिजत नाही तिथं तुझ्यासारख्या लंगड्याला कोणी भिकही घालणार नाही… घाबरलेला, भेदरलेला सेंकद काटा त्त्वरेने पुढे सरकत राहतो… आणि आपली प्रिया आता तरी एकटीच कुठल्या तरी तासाच्या पिंजऱ्यात नक्कीच भेटेल अशी आशा ठेवून मनात भेटीत काय काय करायचे… किती किती बोलायचे नि शेवटी आपल्या प्रेमाचा विश्वास दाखवताना तिला एकच सांगायचं,. तू आहेस तिथेच थांब कायमची, लवकरच मी येतोय ना तुझ्या सोबतीला कायमचा लवकरच… अजून माझी वेळ आलेली नाही… कारण सध्या पडणारा हा पाऊस मला धार्जिणा नाही.. हा मला हवा असणारा पाऊस तो हा नाही… त्यामुळे माझ्या छत्रीचा आवाकाच तुटपुंज्या असल्याने तुला मी कसे बरे पाऊस पडत असताना माझ्या छत्रीत घेऊ शकणार… पण पण नेमकं मला त्यावेळी काय असं होतं सांगता येत नाही.. जे मनात ठरवलेलं असतं ते एकाही शब्दानं तिच्या जवळ बोलताच येत नाही.. आणि डोळे फक्त तिच्याशी काही वेगळाच शब्दाविनाचा संवाद साधत जात असतात आणि सेंकद काटा भान हरपून पुढे पुढे सरकत जातो… त्याला तिला काही सांगायचयं हे ही तिला कळते… मनात त्यालाच हवे असलेलेच असणारे असावे ते… आणि सेंकद काटा तिची समजूत काढत काढत सा़गतो आता या वेळेला नको.. हि माझी वेळ नाही.. अजून माझी वेळ यायची आहे… ती आली कि तेव्हा… कारण आता पडणारा हा पाऊस माझा नाही… माझा पाऊस पडायला अजूनही अवकाश आहे… म्हणून तू तरी सध्या पडणाऱ्या पावसतात न भिजलेलं बरं असं मला वाटतं.. म्हणून तू तरी सध्या पडणाऱ्या पावसतात न भिजलेलं बरं असं मला वाटतं… हम इंतजार करेंगे कयामत तक….
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







