श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “सामान्यत्व…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
स्वत:चं सामान्यत्व फार छळू लागलं की म्हातारीच्या पिसाकडे बघावे. स्वच्छंदपणे कसे उडत असते हवेत.
आपल्याला कोणी गरूड म्हणत नाही याची त्याला खंत नसते.
बळकट पंख नसल्याचा खेद नसतो. आकाशाचा अंत गाठण्याचा हव्यास नसतो.
अन पृथ्वीचा ठिपका होऊन जाण्याइतकी उंची गाठण्याचा मोहही नसतो.
आपल्या मस्तीत भिरभिरत, हवेशी जुळवून घेत,
आपल्या हलक्या अस्तित्वाला सहजपणे स्विकारत, ते मजेत जगून घेते.
उंचावर गेल्यावर त्याला जमिनीची भीती नसते.
अन् जमिनीवर उतरल्यावर नसतो आकाशाचा मोह.
हवेची हलकीशी झुळूक येवो वा सोसाट्याचा वारा आपलं काम फक्त त्याच्यासोबत तरंगत जायचं.. हसतहसत पुढे पुढे… वाटेत जर का कशाला नि कशात अडकून पडलो तर… आपला प्रवास इथवरचं होता असं समजायचं आणि जे सभोवताली असेल त्यावर आपली आनंद मुद्रेचा जमेल तितका ठसा उमटवयाचा.. हिच आपली जनमानसातील पुसटशी ओळख… मी जाता मागे राहील काय याचं वैषम्य उगाचच वाटून का घ्यायचं… आणि समजा प्रवासाच्या वाटेवर पावसाची सर वा धो धो पाऊसच आला आणि त्यानं जर आपल्याला पाण्याच्या सपकाऱ्याने खाली चिखलात मिसळंवलं तर.. आयुष्याचा चिखल झाला म्हणून वाईट वाटून का बरं घ्यायचं… तुज घडवीशी तूच फोडीशी… न कळे यातून काय साधशी… त्याच्या त्या अनाकलनीय योजनेचा आपल्याला कधी अंत ना पार लागावा कसा… पण पण आपल्या जिवीत्वाचा अंश एका नव्या सृजनाच्या निर्मीतीत अणू रेणूतला अंश झाला हे समाधान नाही का मिळणार… हे आपल्यातले दडलेले असामान्यत्व आपल्याला कधीच ओळखता येत नाही… आणि दुसऱ्यांना ते दिसतं असले तरी ते दाखवत नाहीत… इतका सामान्यत्वाची घट्ट सांगड आपल्याला बांधून असते…
म्हणूनच स्वत:चे सामान्यत्व छळू लागलं की बघावे
नि:संग भिरभिरणाऱ्या म्हातारीच्या पिसाकडे…
#
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






