श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “मा फलेषु कदाचन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

असं कसं म्हणू शकतोस तू मला! ..

ये तूला ना मी ओळखंत नाहीऐ.. जा फूट..

तू कुणाचा तरी राग माझ्यावर का काढतोयेस? ..

अरे मी कोण तू कोण? .. हे जरा आठवून पहाना..

युगा युगांची.. नव्हे नव्हे कल्पांतांची ओळख आहे आपली…

तुझ्यासारखा मी चल नाही रे! ..

उष:कालाला पूर्वेला उगवून येतोस आणि मावळतीला जातोस!

मीच ठेवत असतो दिवसभर तूझ्यावर लक्षं… आणि जसजसा दिवस भरभर सरकत जातो, तेव्हा तुझा विनाकारण रागाचा पारा चढत्या भाजणी प्रमाणे वाढत जातो… मला कळतं तेव्हा तुझ्या मनासारखी एकही गोष्ट इथे घडत नसते, आणि नाही नाही तेच तूला तुझ्या उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं! … तुला सांगायचं असतं त्यांना कि, ‘बाबानू रे नका करू आपल्या क्षणभंगुर जीवनाची अशी अविचाराने माती! .. किती म्हणून कराल स्वार्थासाठी विघातक कृत्यांच्या राशी! .. अरे हा मानव जन्म तुम्हाला मिळायला हे केव्हढं मोठ्ठं भाग्य लाभलयं तुम्हाला… जीवाचा मोक्षाचं दार उघडण्याची हीच शेवटची संधी मिळालीय तुम्हाला. मग त्याचं सोनं करण्या ऐवजी अशी माती का करताहात? … हेच तुला पदोपदी त्यांना सांगायच असतं पण ते सांगण्यासाठी तुझ्याकडे शब्दाचं सामर्थ्य कुठं असतयं? … मग डोळे खदिरांगारासारखे आग आग ओकत राहतात.. त्यांच्या जीवाची लाही लाही करून सोडतोस.. पण खरं सांगू इथल्या मानवाला शब्दानं सांगून देखील जिथं कळतं नाही, किंवा कळलंअसून आपल्या स्वार्थापोटी त्याला वळवून घ्यायचचं नसतं, त्याला तुझ्या या कृतीतला अर्थ कसा कळणार? … पण असतोही बरं त्यात लाखात एक विलक्षण बुद्धिमतेचा एक मेंदू! तो सांगत सुटतो आपल्या जातभाईनां अरे वेड्यांनो वेळीच जागे व्हा हि आहे ग्लोबल वार्मिंगची धोक्याची घंटा… वातावरणाला जपायला हवं.. त्याचं नीट संवर्धन करायला हवं.. तर आणि तरच आपला पुढचा येणारा मानववंश टिकेल… पण त्याच्याकडे कुणी ढुंकूनही बघत नाही… एक मानसिक संतुलन हरवलेला वेडा म्हणून त्याला ओळखतात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात त्याला ढकलून देतात.. आलाय मोठ्ठा ज्ञान सांगणारा, आम्हाला अक्कल शिकवणारा.. वातावरण वाचवा… आमचा काहीही संबंध त्याच्याशी नसताना… आणि आम्ही तरी कुठे एव्हढे मोठे आहोत.. आहेत त्या पंच महाभूतांच्यापासून बनलेलो एक घटक तर आहोत… मग त्या निर्मात्यानेच आमच्या प्रमाणे त्या वातावरणाची काळजी घ्यावी… आधीच आमच्या आयुष्याला काळजीने काय कमी घेरलयं, त्या एकेक कमी करत करत सगळं आयुष्य संपून जातं तरी काळजी संपत नाही.. मग आणखी कुठली जादाची काळजी उरावर लादून घ्या… तुला हे काय सांगतोय, तुला तर रोजचाच अनुभव येतोय ना माझ्यासारखा… पण तूझ्या त्या दिवसभराच्या प्रयत्नाला काही यश येतं नाही हे पाहून मावळतीला तर तू रागाने तांबडा लाल होतोस.. चिडचिड होतेय तुझ्या मनाची आता तुमचं तोंड देखील पाहू नये कधी असं मनाशी ठरवतोस आणि शेवटी शिक्षा म्हणून त्यांना अंधाराचा बागुलबुवा त्यांच्यावर सोडून जातोस… उद्याच्या भविष्याची गोड सुंदर स्वप्नं तुझ्या त्या हूशार सेरसेनापती चंद्र आणि चांदण्यांना माणसांना भूरळ घालण्यास सांगतोस.. हा एक तुझा छुपा प्रयत्न असतो… विघातक विचारांपासून विधायक विचाराकडे वळविण्याचा… पण माणसं कसली त्या भ्रामक कवि कल्पनेच्या स्वप्नाला भुलत नाही.. त्यांना प्रतिक्षा असते उद्या उगवणारी सोनेरी सकाळाची… आणि मग कालच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याची पुर्णता करण्याची.. मागच्या पानावरून पुढच्या पानावर तेच ते आणि तसंच्या तसं चालू ठेवण्याची… गांधारीच्या पट्टी सारखी स्वार्थाची झापडं डोळ्यावर ओढून घेतलेली असतात… आणि बाकी सगळे तन मन त्याला गुलामसारखं जुंपलेलं असतं.. तारतम्य, साधकबाधक, हित अहिताचे अणू रेणू कस्पटासारखे वाऱ्यावर ऊधळले जातात… संध्याकाळी रागावून गेलेला तू उद्या सकाळी पुन्हा उगवूच नये असा निर्णय घेतोस… पण पहाटेचं उषास्तवन तुला तुझं कर्तव्याची जाणीव देतं… कर्मण्ये….. मा फलेषु कदाचन… गीतेचं अमृत वचन तुला सेवन करायला लावतं… आपला कर्ममार्ग कुठल्याही परिस्थितीत सोडू नकोस… ते तुझं विधिलिखित आहे ते तुला टाळता येणार नाही.. असं समजावून परत सकाळी तू उदईक येतोस… सगळी सृष्टी, चराचर तुझ्या प्रतिक्षेत असतं… आणि तू निदान आजतरी एखादी गोष्ट माझ्यामनासारखी होईल आणि मी संध्याकाळी हसत हसत निरोप घेईन अशी अंधुकशा आशेचा उमला अंकुर मनी घेऊन अवतरतोस…. आणि आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्नचा अनुभव घेऊनच ऊदास निराश मनाने परत जातोस…

मी एक तुझा बालमित्र असल्याने या सगळ्या गोष्टी मला समजतात… पण मला भौतिक मर्यादा असल्याने इथून हलता येत नाही तुला मदत करता येत नाही… इतकचं काय तुझ्यासारखचं मलाही त्यांना शब्दाने या भावना कळवता येत नाहीत… मग मी ही जमेल तसं माझ्या सामर्थाचा वापर करत भरती ओहोटीच्या अक्राळविक्राळ लाटांच्या तडाख्याने सांगू पाहतो… तर काही जमेल ते पोटात ओढूनही घेत असतो… तरीही त्यांना काहीही अर्थबोध होतच नाही… उलट मला त्यांनी त्यांच्या टाकाऊ वस्तूंचं गोडाऊनच केलयं… एकेकाळी माझं मंथन केलं होतं त्यावेळी माझ्या पोटी दडलेली चौदा रत्ने बाहेर काढली आणि तिथून पुढे तर रोजचं माझ्या तळागाळात जाऊन उत्खनन करून, जाळं टाकून माझ्याकडे असली नसलेली दौलत मात्र लुबाडून घेतात… किती म्हणून त्यांचे अपराध पोटात घालावेत… पर्यावरणाचा र्हास कसा केला जातो याचा जीता जागता साक्षीदार आहे मी… मावळतीच्या उतरणीच्या उन्हाला माणसं येतात थंड हवा खाण्यासाठी या किनाऱ्यावर… पण त्यांना माझा कोलाहल कुठे कळतो… ते शोधत असतात अंधारातला एकांत मनाची घटकाभर रूंजी करण्यासाठी… विसावा हवा असतो त्यांना त्यांच्या थकल्या भागल्या तनाला नि मनाला… पण त्यावेळेला त्यांना तुझ्या काय नि माझ्या काय मनातल्या चिलबिचलते कडे लक्ष द्यायला वेळ कुठे असतो… मगं आपल्या मनाला होणारा त्रास तु माझ्या जवळ नि मी तुझ्या जवळ बोलणारं कि नाही… दुसरं कोणं असणार आहे आपलं हे दुख ऐकायला…. मला कल्पना आहे सगळ्याचाच होतो काही वेळेला भयंकर त्रास… मन उद्विग्न होऊन जातं… आपणं सोडून आपलं कुणीच नाही असं वाटून जातं… तोडून टाकावेत जे असतील नसतील पाश सगळे.. सोडून द्यावं सगळं आणि जावं कुठंतरी दूर दूर क्षितिजाच्या पल्याड… एकटचं एकांतात… पण मित्रा हे रागावणं चिडणं… असतं ना त्याचं आपल्याला स्वातंत्र्य नाही… त्या जगतनियंत्यानं आपल्याला अक्षय दोरीने बांधून ठेवलयं.. तू आणि मी अक्षर आहोत आणि ती बाकी मंडळी मात्र क्षर आहेत…

म्हणून मी संतापलो, खवळलो तरी शेवटी रागही पोटात गिळतो… नाईलाज होतो…

मला आजं तू असं

ये तूला ना मी ओळखंत नाहीऐ.. जा फूट.. म्हटलसं त्याचं काहीही वाटलं नाही याचं कारण हेच आहे बरं…

…. मा फलेषु कदाचन…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments