श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “सेल सेल चा व्हायरल फिव्हर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… “डॉक्टर काका या वर्षाचा पाऊस थांबला, तसा गेले दहा पंधरा दिवस हिला बरंच वाटत नाहीए! … सारखी या बेडवर झोपूनच असते.. काही खाणं नाही कि पिणं नाही! .. सारखं सारखं अस्वस्थ वाटतयं! कश्यातही मन रमत नाही! उत्साह वाटत नाही! मरगळल्यागत वाटतयं! शून्यात कुठंतरी नजर लावून हेच मला वारंवार सांगत असते… तरी बरं ही कुठं नोकरीबिकरी करत नाही ते! .. पण माझ्या मात्र हिच्या या आजारपणामुळे एक एक करून सगळ्या सिक लिव्ह कधीच संपून गेल्या की… त्यात माझ्या बाॅसने मला तंबी दिलीय पुढचा रजेचा अर्ज न पाठवता राजीनामा पत्र पाठवून द्या.. नाहीतरी कंपनीला अश्या दांडीबहाद्दरांची आवश्यकताच नाही समजलं… मला तर काहीच समजना झालयं! … असं झालंय तरी काय हिला? .. बरं आपल्या पहिल्या व्हिजीटला सांगितल्याप्रमाणे तिच्या आवश्यक त्या सगळ्या चाचण्या वगैरे करून घेतल्या.. त्याचाही एकंदरीत सगळे रिपोर्टपण नाॅर्मल आले… तरीही आजाराचं निदान लागेना म्हणजे कमालच झाली म्हणायची! … डॉक्टर काका आता तुम्हीच सांगा बरं मी काय करू ते? हि अशी आजारी पडल्यामुळे घरभर उदासीनता पसरलीय.. माझंही कशाकशात लक्ष लागेनासं झालयं… आणि कधी कधी मीच आजारी पडलोय काय असंच वाटंतय! … आतातर शारदीय नवरात्र, दसरा- दिवाळी सारखे सणासुदीचे दिवस जवळ येतायेत.. मला माझ्या ऑफीसमधून सुट्टी मिळणं तर आता शक्यच नाही.. म्हणून तर माझे आईबाबा, ताई नि दादा वहिनी गावाहून इकडे येताहेत आणि या गावातलीच इथली तिच्या घरची मंडळीही एक एकदा येऊन भेटायला येणार आहेत आम्हाला.. आणि त्यात हिची ही अशी नरमगरम तब्येत राहीली तर कसं होणार… आईबाबांना आयत्या वेळी तुम्ही येण्याचं रद्द करावं सांगावं तर तिकिट रद्द करण्याचा नाहक भुर्दंड पडेल… बरं हिलाच हवापालट करण्यासाठी तिकडे पाठवून द्यायचं म्हटलं तरी या स्थितीत तिला प्रवासाची दगदग झेपणार नाही आणि आजार अजून जास्त बळावेल याची जास्त शक्यता संभवते असाच सल्ला तुम्ही मला दिलात… डाॅक्टर काका तुम्ही आमचे फक्त जुने फॅमिली डॉक्टर नव्हे तर तुमचा आमचा तितकाच जुना नि जिव्हाळ्याचाही घरोब्याचा संबंध आहे… तेव्हा काका मला नेमकं काय केलं पाहिजे ते सांगा म्हणजे हिचा आजार जाऊन पहिल्या सारखी खडखडीत बरी होऊन घरात वावरू लागली म्हणजे घराचं आनंदवन होईल…. सांगा काका सांगा! .. आता अधिक विलंब लावू नका! … माझा जीव कसा टांगणीला लागलाय तुम्हाला दिसतोय ना? तुमचं असं हे चिंतायुक्त तिच्या कडे मौन होऊन पाहणं मला अधिकच काळजी लागून गेल्यासारखं आहे… तेव्हा बोला काका! बोला काका! … “
“अरे अविनाश! का बरं असा पॅनिक होतोस? … काहीही काळजी करण्यासारखं अलकाला झालेलं नाही… पावसाळा संपता संपता आणि हे सणासुदीचे दिवस ऐन तोंडावर आले की हा व्हायरल जिकडे तिकडे पसरतोच पसरतो आणि मुख्य म्हणजे त्याची लागण हि फक्त घरच्या स्त्रियांना होते… असा हा स्त्री आजार आहे… मी इतकी वर्षे डॉक्टरकी करतोय आणि सुदैवाने माझ्या वैद्यकीय सेवेला चांगली लोकमान्यताही मिळालेली आहे हे तर तू जाणतोसच अरे मीच काय पण आमच्या वैद्यकीय व्यवसायातले भले भले डॉक्टर सुध्दा या सिझनल नि सिलेक्टेड पर्सनलाच लागण करणाऱ्या व्हायरल सिंड्रोमवर औषधोपचार करू शकलो नाही… हे आमचं अपयश आहे असं हवं तर तू म्हणू शकतोस… पण आम्ही त्यावर इतकं संशोधन केलयं आणि त्यावरून हा स्त्रियांना त्या विशिष्ट काळातच का बरं आणि कसा बरं संसर्ग होत असणार हे शोधून काढले आहे… कुठल्याही स्त्रीवर्गाला तिच्या नैसर्गिक स्वभावधर्मानुसार बाजारहाट करण्याचा मुलभूत जन्मजात(वाईट्ट) गुण असतो. त्यानुसार ती जेव्हा जेव्हा म्हणून या बाजारात येनकेन कारणाने जात असते तेव्हा सराफाच्या दुकानावरून, साडी, ड्रेसेच्या शोरूम वरून, मोठ्या माॅलमधून आणि टूकार सेल सेलच्या मेळ्यावरून तर कधी आत फिरून त्यांचे जाणे हे होते आणि मग तिथल्या त्या प्रचंड अवाढव्य गर्दीमुळे हा संसर्ग तिथे त्यांना होतो… त्याची कळत नकळत झालेली बाधा इतकी जालीम असते कि सगळ्यात प्रथम त्यांच्या मनावर तर याचाच पगडा बसतो… ध्यानीमनी त्याचं चित्त तिथं गुंतले गेयलयं हे त्यांच्याही लक्षात येत नाही.. मग त्या अशा विमनस्क होऊन वागत जातात… बरं हि लागण आणि त्याचे पिडीत स्त्री वर्ग हा काही ठराविक असत नाही तो सगळ्या घराघरात पोहचलेला असतो… अगदी मी डॉक्टर असून माझ्याघरी सुद्धा हि लागण झालेली आहे.. माझ्याबायको बरोबर माझी आई, दोन्ही मुलींना देखील हा संसर्ग झालेला आहे बरं… हे तू लक्षात घे… या आजारावर आमचं वैद्यकीय औषधाची मात्रा कुचकामी ठरली आहे… आणि त्यासाठी फक्त त्यांनी बाजारात कुठल्या दुकानावरून वा दुकानातून, सेल मधून, माॅलमधून हा संसर्ग आणला आहे त्याचा शोध घेणे हे महत्त्वाचे आणि त्याप्रमाणे त्यांच्या समाधानाची परिपूर्तता तेथूनच करून घेण्यातच हा झालेल्या संसर्गाची बाधा नाहीशी होते.. तेव्हाच तो ते आजारी माणूस खडखडीत बरा होतं.. आपल्या खिश्याला भला मोठा भसका पडतो त्यावेळी, पण त्यांना मिळालेल्या विजयाचा आनंदापुढे त्याची चिंता आपण करायची नाही… आणि समजा हा उपायच जर अमलात आणायचा नाही असं जरं का वेडंवाकडं तुझ्या मनात येत असेल तर तर… घराचं रणकंदनच झालं म्हणून समजं… तेव्हा अविनाश अलकाला माझ्या औषधाची गरज नाही… तिला झालेला हा सेल सेल चा व्हायरल फिव्हर आहे… तूला मी यावरचा उपाय सांगितला आहेच… मग बघ तुझा दसरा दिवाळीसण कसा जोमात नि आनंदात जाईल तो… तर मी आता निघतो कारण माझ्या घरची मंडळी माझी वाट बघत असतीलच… किती वेळ गेलेत पेशंटला बघायला.. यांना आपल्या स्वताच्या घरचं भानं ही नसतं आपल्या ही घरी आपली बायको मुली नि आई आजारी आहेत त्यांच्या तब्येतीकडेपण पाहायचं असते ते.. असा माझा नामघोष चालला असणार… काय करणार अविनाश आपण बिचारी पुरूष मंडळी पडलोना! .. सगळ्यांना पुरून उरणारे. असलो तरीही.. फक्त या सेल सेल चा व्हायरल फिव्हरला आपल्याला शरण गेल्याशिवाय पर्याय तेव्हढा नाही समजलं…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







