सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

📚📖 अ भि नं द न 📖 📚

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सांगली यांनी आयोजित केलेल्या २०२५ च्या सांगली जिल्हा ग्रंथोत्सवात आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिक श्री नंदकुमार पंडित वडेर यांना सुजाण वाचक सन्मानपत्र बहाल करण्यात आले आहे.

श्री. वडेर यांचे ई-अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे मन: पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

– संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

आजच्या अंकात वाचूया त्यांचे एक आलेख – “पाव मण लाकडे…”

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # पाव मण लाकडे… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“आता चुल पेटावयाला एक लाकूड शिल्लक नाही घरात.. स्वयंपाक, चहापाणी, आंघोळीचं गरम पाणी इतकी कामं कधीची खोळंबली आहेत.. चूलच पेटली नाही तर झाला की बट्ट्याबोळ… आणि मोळीवाल्याकडून जर जळणासाठी सरपणच मिळाले नाही तर काय मी आता या चुलीत माझी हाडं टाकावीत कि काय? तुम्ही त्या गॅस एजन्सी च्या दुकानात कामाला जाता आणि रोज शंभर घरा घरातून तो गॅसचा सिलेंडर पोहचता करता… त्यांच्या चुलीची एवढी काळजी घेता पण स्वत:च्या घरची काही काळजी असते का तुम्हाला? … त्या तुमच्या एजन्सी मालकाला सांगून एक गॅस कनेक्शन तरी आपल्य घरी आणायचं होतं तेव्हा… बाई गं सांगून सांगून थकले पण तुम्ही कसले जुन्या परंपरावादीला चिकटून बसलेले… श्रीमंतीचे चोचले गरीबांना परवडणारे नसतात आणि आधुनिक सोयी सुविधांच्या विरोधात कायम तुम्ही उभे… बाकीचे तुमचे सहकारी बघा. टू व्हिलर वरून सगळीकडे गॅस पोहचवतात आणि तुम्ही अजूनही त्या बाबा आदम च्या जमान्यातील जुन्या एटलास सायकल वरून पायाचे तुकडे पर्यंत पॅडल मार मारून एकेक गॅस सिलेंडर पोहचवत राहता.. अश्या दगदगीने किती थकून जायला होतयं तुम्हाला… आम्ही घरातली माणसं तुम्हाला दाताच्या कण्या करून सांगून थकलो पण तुम्ही काही बदलायला तयार नाही… तुमचं आपलं संत तुकारामांच्या सारखं एकच पालुपद.. सगळ्यांच्या भुका भागविण्यासाठी आपण कष्ट घेतले तर त्याचं मोठं पुण्य मिळतं.. भुकेलेल्याला अन्नदान केल्यासारखे… पण त्याची त्यांना त्यावेळी काही होती का कदर… सिंलेडरची डिलिव्हरी करणारा दारात दिसला रे दिसला तर त्याच्यावरच तोंडसुख घ्यायला तयार… काय तर गॅस नोंदवून महिना उलटून गेला आणि आता आणताय होय… काहीतरी मध्ये बरेच काळाबाजार करून वरकड कमाई झाल्यावर तुम्ही नंबराचा द्यायला आलात… आणि आता वर ‘चायपानीची’ अपेक्षा ही असणारच… इकडे आमच्या घरात पोरंबाळं, म्हातारे कोतारे भूकबळीचं तेव्हढे होयाचे राहिले होते… दिवसभर सारखी अशी पळापळ करून सगळ्यांना जर गॅस डिलीवरी वेळ द्यायला काय होतं तुमचं… पण तुमचे नखरे फार वाढलेत… जो वरती ज्यादा ची चिरीमिरी देतो त्याच्या दारी पहिला गॅस जातो… हो का नाही.. अशी शिव्याशापाची बिना कारणाची बोलणी खाऊन मन तुमचं खट्टू होतं. तरीही तुम्ही तुमचं कर्तव्य करायचं सोडत नाही…

आणि आता तर ते आखाती युद्धाचा भडका उडाला. त्यात तेल गॅसचा पुरवठ्यावर बंधन आल्यावर दिस ताच इकडे नफेखोरी करणारी सगळी सावजं मंडळीनीं परिस्थितीचा फायदा उचलला नाही तरच नवल… पांढरे बगळे नि खाकी ससाणे बेरक्या जातीची. स्वार्थ नि संधीसाधू गिधाडे सामान्य जनतेला ओरबाडून खायला बसली नाही तरच नवल.. याने त्याच्या नावाने बोंब मारायची आणि त्याने याच्या. तेही फक्त मिडीयासमोर… आणि गरीब बिचारा तो गॅस डिलिव्हरी करणारा मात्र सगळ्यांच्या रोषाला सामोरा गेल्याने उद्रेकाचा बळी होतो… त्याला वेठीस धरून काय साधणार म्हणा.. तो पोटार्थी प्रापंचिक माणूस… लोकांच्या झुंबडी त्या गॅस च्या दुकानी बसते.. मला पाहिजे गॅस आधी अश्या हमरीतुमरी होतात.. डिलिव्हरी मॅनला मध्यला मध्ये चढ्या बक्षिसाची लालूच दाखवून तो गॅस आपल्या घराकडे पळवतात… तेव्हा इतर नाराज आपली निराशेची आरोळी ठोकत राहतात.. पण त्या डिलिव्हरी मॅनचा एक माणूस म्हणून कोणीच कसला विचार करत नाहीत… तहानभूक विसरून तो एकटाच मात्र आपलं प्रामाणिकपणे देशसेवेचे कर्तव्य करतो…

आणि रात्री उशिरा ने जेव्हा तो आपल्या घराकडे निघतो तेव्हा त्याला आपलं घरदारं बायका पोरं सकाळ पासून उपाशी तपाशी राहून आपण वखारीतून पाव मण लाकडाची मोळी कधी घरी घेऊन येतोय याच्याकडे डोळे लावून वाट पाहत असलेले कोमेजलेले चेहरे दिसत असतात.. चारदोन रूपयाची वरकड कमाईतूंन त्यानं शेव फरसाणाचा पुडा सोबत घेतलेला असतो… त्यामुळे जरा तरी घरदार हसतं खेळतं राहील आणि ते बघून आजचा आपला थकवा दूर पळून जाईन… आजचा दिवस तर पार पडला… उद्याचं उद्या काय ते बघता येईल… ज्यानं चोच दिलीय त्यानं त्याच्या चाऱ्याची पण काही ना काही सोय केलेली असती.. तो काळजी घेणारा बसला असताना आपण का म्हणून काळजी करत बसायचं नाही का? हे वचन रोज रात्री झोपताना आपल्या कुटुंबाला ऐकवून दाखवलं कि त्याला शांत झोप लागते…

*

© नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments