सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ कंटाळा येतो पण कंटाळायचं नाही… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
उन्हाळ्यामध्ये उन्हाचा कंटाळा येतो.. आपण म्हणतो, ‘ कधी एकदा पाऊस येईल. ‘ पाऊस सुरू झाला आणि चार आठ दिवस झाले की आपल्याला पावसाचाही कंटाळा येतो! माणसाच्या मनाचं ही असंच आहे, जे असतं ते थोड्याच दिवसात नको वाटायला लागतं!
‘कंटाळा’ हा शब्द माणसाच्या वागण्या बोलण्यात नेहमी असतो. लहानपणापासून ‘कंटाळा आला तरी कंटाळायचं नाही’ हे आमच्या आईने मनावर बिंबवले होते. एखादे काम कंटाळवाणे वाटले तर कामात बदल करायचा, पण कंटाळायचं नाही अशी मनोवृत्ती त्यामुळे आपोआपच बनत गेली होती. लहानपणी शाळा, अभ्यास हे कंटाळायचे विषय! कधी एकदा परीक्षा संपते आणि खेळायला, झोपायला मिळतं असं वाटत असायचं, पण एकदा का परीक्षा संपली की झोप मुळीच यायची नाही! चार दिवस भटकून, पिक्चर वगैरे बघून झाले की आमच्या कंटाळा येण्याला सुरुवात व्हायची!
मग आई नवनवीन उद्योग लावायची. घरातील काही कामे, भरत काम, शिवणकाम आणि जोडीला दुपारी घरात बसून बैठे खेळ खेळणे तसेच संध्याकाळी फिरणे असं रुटीन लागायचं! जमलं तर कधी चार दिवस गावाला जाऊन येणे आणि या सगळ्यात मग सुट्टी कधी संपायची ते कळायचंच नाही!
शाळेत पुन्हा जायला मिळाल्यावर खूप आनंद व्हायचा! मैत्रिणी भेटायच्या, नवीन पुस्तकं वाचायला मिळायची, अभ्यासाला तर अजून सुरुवात नसायची, पण शाळेमध्ये गेले की मन प्रसन्न व्हायचं! पण थोड्या दिवसात ते रुटीन झालं की आमची कंटाळा यायला सुरुवात व्हायची!
माणसाला सतत बदल हवा असतो. त्याच त्या रुटीनचा कंटाळा येत असतो. विद्यार्थी दशा असताना सारखं वाटायचं की, आई बाबांना किती बरं आहे, अभ्यास नाही, काही नाही! आणि आजी आजोबांना तर फारच छान! नोकरी नाही, काम नाही, टीव्ही बघायचा, गप्पा मारायच्या आणि फिरायचं! आपणही मोठं झाल्यावर असंच करायचं असा विचार मनामध्ये येत असे. कॉलेजला असताना एकदाचा तो अभ्यास संपला.. डिग्री मिळाली. आता नोकरी धंद्याला लागलं की हातात पैसा खेळायला लागेल ही कल्पना च मस्त वाटायची! आता काय मज्जाच मज्जा! मनाला येईल तसं खर्च करायला मिळेल, पण हे नावीन्य लवकरच संपायचं आणि रोज रोज त्याच त्या चाकोरी बद्ध जीवनाचा कंटाळा येऊ लागायचा! ठराविक वेळी उठणे, आवरणे आणि डबा घेऊन कामावर जाणे.. घरी आल्यावर पुन्हा तीच तीच कामं! कंटाळा येऊ नये, बदल हवा म्हणून मग ट्रिप आखायच्या. फिरायला जायचं. चार आठ दिवस ट्रिप ची मजा अनुभवून आलं की पुन्हा कंटाळा येतो! घरी जाऊ या आता असं वाटतं! हा कंटाळा आहे तरी काय? अधून मधून तो येतच असतो. अशा वेळेला पुन्हा आठवतं, ‘ कंटाळा येतो पण कंटाळायचं नाहीं! ‘
सामान्यपणे बायकांची तक्रार असते की, रोज रोज स्वयंपाक घरातील तीच तीच कामे करून कंटाळा येतो! एखादा दिवस तरी पुरुषांनी स्वयंपाक घर सांभाळावे. आमच्या घरी एकदा मे महिन्यात असा प्रयोग केला होता. सुट्टीच्या दिवसात आमच्या घरी दीर, जावा, नणंदा, भाचे, पुतणे अशी सर्व मंडळी जमत असत. मग दिवसभर घरातल्या बायका नाश्ता, जेवण, चहा पाणी करून करून कंटाळून जात असत. तेव्हा एक दिवस पुरुषांनी सर्व सांभाळावं असं ठरलं!
सकाळचा चहा आयता मिळाला. नाश्त्याला कांदेपोहे मिळाले. स्वयंपाकाची वाटणी पण पुरुषांनी करून घेतली. फक्त पोळ्या तेवढ्या सासुबाईंकडे वशिला लावून करून घेतल्या. जेवणाची तयारी करणं, सर्वांना वाढणं आणि जेवण झाल्यावर मागचं आवरणं सुद्धा पुरुषांनी केलं! आम्ही बायका कौतुकानं सर्व बघत होतो, पण स्वस्थ बसायचा पण कंटाळा आला!
मग दुपारी मात्र आम्ही चहाबरोबरच पुन्हा स्वयंपाक घराची सूत्रे हातात घेतली आणि पुरुषांना’ हुश्श ‘ झालं! एक दिवस ठीक आहे, पण सतत हेच करत राहणं कंटाळवाणे आहे हे पुरुषांनी मान्य करून टाकलं!
‘कंटाळा आला तरी कंटाळायचं नाही’ या जीवनातील सूत्रामुळे खूप फायदे झाले. आयुष्यात संयम वाढला, चिकाटी वाढली, आपल्याला जर हे करायचंच आहे तर आनंदाने करायचं याची सवय लागली. घरात कोणाचा आजारपण असो वा आर्थिक संकट असो न कंटाळता त्याला तोंड देणं आम्हाला जमू लागलं! कारण ‘ये भी दिन जायेंगे’ असा आशावाद मनाला कंटाळा येऊ द्यायचा नाही!
आयुष्यात कितीतरी वेळा तडजोडीचे प्रसंग येतात. मनाची उमेद खचू न देता काम करत राहावे लागते, चिडचिड होते, पण ‘कंटाळायचं नाही’ हा सोपा मंत्र जपला तर खूप गोष्टी सुसह्य होऊन जातात. कंटाळयाचं मूळ शोधायचं तर ते बरेचदा आळसात असतं! हा आळस कंटाळयाला स्कोप देतो. अलीकडच्या कित्येक लहान मुलांच्या तोंडात “बोअर झालंय” हा शब्द येतो. इतक्या लहान वयात यांना बोअर कसं होतं हे आपल्याला कळत नाही, पण आजची जीवनशैली बघता आपणच या सगळ्याला कारणीभूत आहोत असं वाटू लागतं! मुलांना त्यांचे शाळा, अभ्यास, क्लास यातून खेळायला, स्वतःच म्हणून काही करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या शाळा, अभ्यास या ऍक्टिव्हिटीज बंद झाल्या तर काय करायचं हेच त्यांना समजत नाही! त्यासाठी लहानपणापासूनच त्यांना वेगळं काही करण्याची, छंद जोपासण्याची संधी दिली पाहिजे. म्हणजे कंटाळवाणे होणार नाही आणि पुढेही आयुष्यात संकटांना, अडचणींना तोंड देताना एखादी गोष्ट ‘लाईटली’ कशी घ्यावी आणि त्यातून मार्ग कसा काढावा हे कळेल!
कोरोनाच्या काळात जेव्हा घराबाहेर पडता येत नव्हते, त्यावेळेला घरातील कुटुंबीय आपोआपच एकत्रितपणे घरातील कामं करत आणि आपला वेळ कंटाळवाणा न घालवता चांगल्या मार्गांनी जावा यासाठी खूप काही उपक्रम करत असत. कोणत्याही कठीण गोष्टीला, प्रसंगाला धीराने तोंड देऊ शकण्याची क्षमता यामुळे वाढते आणि संकटातून आपण बाहेर येणार हा आत्मविश्वास वाढीला लागतो. तसेच कंटाळा आला तरी कंटाळायचं नाही या तत्त्वावर आपण आपला वेळ चांगल्या तऱ्हेने घालवायचा प्रयत्न करतो. निराशेचे काळे ढग येतात पण ते पुढच्या चंदेरी, सोनेरी दिवसांची चाहूल देत असतात. कोणतीही एकच स्थिती टिकून राहत नसते, कधी दुःख तर कधी आनंद, कधी आशा तर कधी निराशा, अशी बदलती स्थिती माणसाच्या जीवनात येते. या परिस्थितीला संयमाने, चिकाटीने तोंड दिले पाहिजे. अशावेळी ‘कंटाळा येतो पण कंटाळायचं नाही’ हे तत्व प्रत्येकाने अवलंबिले तर जीवन कंटाळवाणे वाटणार नाही!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





