श्री दिवाकर बुरसे
✦ असेन मी.. नसेन मी… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆
☆
गुणी लेकरे, नाचरी पाखरे
येवढं पुरे, नको काही दुसरे
प्रस्तावना
काही गोष्टी माणूस जन्मतःच सोबत घेऊन येतो.
देश, गाव, कुळ, घर, माती, नाती – गोती, आणि…
काही ऋणं — जी कधीच फिटत नाहीत.
ज्या गावानं आपल्याला आश्रय दिला, चालायला शिकवलं,
जिथल्या वाटांनी स्वप्नांना दिशा दिली,
जिथल्या मातीनं पोटभर अन्न दिलं,
त्या गावाला आपण काय देऊ शकतो?
ही गोष्ट आहे एका गावाची,
काही माणसांची,
आणि निसर्गाशी अजूनही तुटू न दिलेल्या नात्याची.
गुणी लेकरे, नाचरी पाखरे
येवढं पुरे, नको काही दुसरे
☆ अध्याय १ – माझा गाव ☆
पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात, सासवडपासून वीस आणि पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर वसलेलं माळशिरस (भुलेश्वर) हे माझं मूळ गाव. सुमारे पाच हजार लोकसंख्येचं, तालुक्यातल्या मोठ्या कृषिक्षेत्रांपैकी एक असलेलं हे गाव शांत, सुसंस्कृत आणि सलोख्याचं उत्तम उदाहरण आहे.
गावात हिंदू-मुस्लीम, सवर्ण-दलित असले कोणतेही ताणतणाव नाहीत. गावगुंडगिरी किंवा दहशतीचा मागमूसही नाही. ग्रामस्थ परस्परांचा आदर राखत, सण-उत्सव, जत्रा एकत्र साजऱ्या करतात. ग्रामदैवत श्री भुलेश्वर यांच्यावर सर्वांची नितांत श्रद्धा आहे.
किंचित इतिहास
भुलेश्वर मंदिर यादवकालीन असून गावातली बहुतेक कुटुंबं शतकानुशतकं इथं नांदत आहेत. ते सगळे ‘यादव’ असून देवगिरीच्या यादवांची ते रयत आहेत. इथल्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे. इतिहास, परंपरा आणि श्रम यांचं सुंदर नातं इथं आजही जाणवतं
गावाची रचना
गावाची रचना पारंपरिक पद्धतीची आहे. मंदिरं, वेशी, मुख्य मार्ग, बाजारपेठ, शाळा, स्मशानभूमी — सगळं नियोजनबद्ध आणि परस्परपूरक आहे. ओढा ही गावाची नैसर्गिक पश्चिम सीमा असून त्यानं गावाला एक वेगळी ओळख दिली आहे.
ब्राह्मण परिवार आणि आमची भूमिका
गावात पाच ब्राह्मण कुटुंबं आहेत. त्यापैकी बुरसे आणि काळे हे ग्रामोपाध्याय. पंचक्रोशीतले सर्व धार्मिक विधी, संस्कार, लग्नकार्य, इ. कार्यं करून देणे ही जबाबदारी परंपरेनं आमच्याकडे या दोन कुटुंबांची.
आमच्या बुरसे कुटुंबाची ओळख केवळ उपाध्येपणापुरती नाही, तर कीर्तन, साहित्य, संगीत, वक्तृत्व अशा ललितकलांशी घट्ट नातं असलेली आहे. नारदीय कीर्तनाची परंपरा आमच्या घराण्यात पिढ्यान्पिढ्या जपली गेली आहे. त्यामुळं ललितकला, शब्द, स्वर, भाव हे आमच्या रक्तातच आहेत.
भटमळा — आमची ओळख
गावाच्या पश्चिमेला ओढ्यालगत आमची वडिलोपार्जित सुमारे सात-आठ एकर जमीन, जिला ‘भटमळा’ म्हणून ओळखतात. इथली गोड्या पाण्याची विहीर एकेकाळी अर्ध्या गावाची तहान भागवत असे. दुष्काळातही ती क्वचितच आटत नसे.
कृतज्ञतेतून जन्मलेली शाळा
माझे वडील स्व. धुंडिराज लक्ष्मण बुरसे (आप्पा) यांनी एक विचार मांडला —
“ज्या गावानं आपल्याला गेली तेराशे वर्षं, पिढ्यान्पिढ्या आश्रय दिला, त्या गावाचं ऋण कसं मानायचं? त्या ऋणातून उतराई कसे व्हायचं? ”
यातूनच सुमारे पस्तीस – चाळीस वर्षांपूर्वी भटमळा आणि विहीर, गावातल्या ‘भुलेश्वर विद्यालया’ला दान करण्याचा निर्णय झाला.
आमच्या या कृतीनं प्रेरित होऊन इतर दोन ब्राह्मण कुटुंबांनीही त्यांच्या मालकीची मंदिरं आणि जागा शाळेसाठी दिल्या. गावानं श्रमदान केलं, शासनाचं साहाय्य मिळालं आणि पाहता पाहता चौथीपर्यंतची शाळा दहावीपर्यंतच्या माध्यमिक विद्यालयात रूपांतरित झाली!
आज ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणकशाळा, क्रीडांगण, सभागृह अशा सर्व सुविधा इथं उपलब्ध आहेत. पंचक्रोशीतली शेकडो मुलंमुली याचा लाभ घेत आहेत.
लेकरं आणि पाखरं
पूर्वी श्रमदानातून रोपलेले विविध वृक्ष आता ‘प्रौढ’ झाले आहेत. सारा परिसर हिरवागार झाला आहे.
वर्गांमधून मुलांचा आणि झाडांवरून पाखरांचा चिवचिवाट ऐकताना मन समाधानानं भरून येतं.
कर्तव्यपूर्तीचं सात्त्विक समाधान आम्हा सर्वांना मिळतं.
☆ अध्याय २ – परिवर्तन ☆
पुरंदर जलउपसा योजनेमुळं गावाचं स्वरूप झपाट्यानं बदललंय. पारंपरिक तृणधान्यांची जागा ऊस, भाजीपाला, फळशेती यांनी घेतलीय. रासायनिक खतं, कीटकनाशकं वाढली. उत्पादन वाढलं, पैसा आला — पण निसर्ग मात्र अस्वस्थ झाला, मागे पडला!
आज गावातलां शेतकरी स्वतःच्या जेवणासाठी लागणारं धान्य स्वतः न पिकवता विकत घेतो.
गावात पाणी आहे, पण अन्नसाखळी विस्कळीत झालीय.
पर्यावरणाची हाक
कीटक, फुलपाखरं, सरपटणारे जीव नाहीसे झाले.
त्यांच्यावर अवलंबून असलेली रानपाखरं, साप, ससे, हरणं उपाशी राहू लागलीयेत.
पर्यावरणाचा समतोल ढासळू लागलाय.
माझा निर्णय
या पार्श्वभूमीवर मी ठरवलं —
माझ्या शेतातली चार-सहा एकर जागा जाणीवपूर्वक अविकसित ठेवायची.
- केवळ पारंपरिक तृणधान्यं
- अरंकरित, गावरान बियाणं
- रासायनिक खतं व औषधं नाही
- पिकांची राखण नाही
पाखरांना, प्राण्यांना मोकळा वावर करू द्यायचा
त्यांना हवं तेवढं खाऊ द्यायचं,
उरेल ते माझं.
अशी पाखरे येती
विस्थापित झालेली, दूर गेलेली हरणं, ससे, पाखरांचे थवे सुगीच्या दिवसांत परत येतात.
किलबिलाट-किचकिचाट, उड्या-सुरकांड्या, धुडगूस – दंगा — सगळं सुरू होतं.
रानजिवांची पोटं तट्ट फुगतात.
त्यांच्या मुखातून
उरलेलं धान्य मला वर्षभर पुरतं.
असेन मी, नसेन मी
गावाजवळ विमानतळ होतोय. रिंगरोड, बुलेट ट्रेन धावणार आहेत. विकासाचा रेटा थांबणार नाहीये.
मला माहीत आहे —
एक दिवस मला माघार घ्यावीच लागेल.
पण तो दिवस येईपर्यंत
माझं वावर सगळ्या जीवांसाठी खुलं असेल.
मी असेन… नसेन!
☆
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





