पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘अवघा रंग एक झाला…’  लेखिका : उषा फेणाणी पाठक ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर 

” अवघा रंग एक झाला…! “

बाहेर माध्यान्हीचं रखरखीत ऊन… घरात प्रवेश केल्यावर मात्र शीतल चंद्रकिरणांचा शिडकावाच झाला जणू… ‘गानतपस्विनी’ मोगूबाईंच्या दर्शनानं!

… एक ‘सौम्य’ तरीही तितकंच करारी व्यक्तिमत्त्व! शुभ्र फुलांची ज्वाळाच जणू काही! त्यांना प्रणाम करून मी समोरच्या भिंतीवरचं त्यांचं तैलचित्र न्याहाळू लागले. तेवढ्यात, मागून किशोरीताई आल्या.

“ही माई! ” तैलचित्राकडे निर्देश करत त्या म्हणाल्या. मी मानेनेच होकार देत ताईंना अभिवादन केलं. “तू खूप चांगलं पोर्ट्रेट करतेस असं ऐकलंय”… ताईंच्या चेहर्‍यावर कौतुक होतं.

मग मिष्किलपणे हसत त्या म्हणाल्या, “तुला एक सांगू?  मला वाटतं, मला चित्रात पकडणं मात्र तितकंसं सोपं नाही हं! आणि म्हटलं तर कठीणही नसावं कदाचित! कारण माझं पोर्ट्रेट करायचं, म्हणजे माझ्या आत जगणाऱ्या गाण्याला, त्यातल्या सुरांना चित्रात बंदिस्त करायला हवं! बाकी… नाकाच्या बाबतीत म्हणशील तर, आम्ही अगदी शिवाजी महाराजांच्या वंशातले बरं का…! ” असं म्हणत किशोरीताई खळखळून हसल्या.

… ‘पोर्ट्रेट’ रंगवायचं तर केवळ बाह्यरूपच नव्हे तर ‘अंतरंग’ चितारायला हवं, हे ताईंनी किती अचूक हेरलं होतं!

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये होणार्‍या त्यांच्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांच्या घरी मुलाखतीसाठी आले होते. गप्पांच्या ओघात या विदुषीच्या प्रज्ञा कोषातली एक एक पाकळी हलकेच उमलत गेली, मला विस्मयचकित करीत! कृष्णमय मीरेविषयी बोलताना अचानक ताईंची स्वरसमाधी लागली. काय अलौकिक सूर तो! त्या दैवी सुरांचं सामर्थ्य, माझ्या समक्ष, आत्मा आणि देहाचं अद्वैत साधून एक तेजोशलाका उजळवून गेलं!

माझ्या अंतरंगाच्या तारा हळूवार छेडीत मग ताईंच्या सहवासात, पुढल्या तीन चार तास चाललेल्या सूर-संवादांच्या बंदिशरुपी मैफिलीत माझे किशोरीताईंशी जे सूर जुळले ते कायमचेच!

मुलाखत संपल्यावर मी घरी निघतेवेळी त्यांनी मला अगदी हक्काने बजावलं… “हे बघ, कार्यक्रमाच्या ठिकाणी तू मला तुझ्या गाडीतून घेऊन जायचंस आणि परत आणायचंस. तू माझ्यासोबत असायला हवीस. ” माझ्यासाठी खरंतर हा एक अतुल्य आनंदाचा योग होता. पण… विधिलिखित वेगळंच होतं.

कार्यक्रमाच्या केवळ काही दिवस आधी मला Renal colic चा जबरदस्त अटॅक आला. तीव्र वेदनेनं मी हैराण झाले. ताईंना तसं कळवलं. तशा त्या खूप अस्वस्थ झाल्या. हे समजताच मला राहवेना आणि माझ्या त्याही अवस्थेत मी ताईंना माझ्याबरोबर घेऊन जायचा निर्णय घेतला. सोबत ताई, त्यांचे तानपुरे आणि दोन शिष्य यांना दाटीवाटीने माझ्या गाडीत घेऊन मी कॉलेजच्या प्रांगणात पोहोचले.

ताई खूप खुशीत होत्या. त्यांनी मला आज्ञा केली… “माझ्या समोर बैस! ” 

मैफिल ऐन रंगात आली होती… आणि अचानक मला पुन्हा वेदना जाणवू लागल्या. मैफिलीची सांगता होईस्तोवर तिथं थांबणं शक्य होईल, असं मला वाटेना. पुन्हा ताईंना सोबत घेऊन जायचीही जबाबदारी होती. ताईंचा हिरमोड होईल ही चिंता ग्रासून राहिली. मन दृढ करूनही माझा धीर खचत चालला.

अखेर डोळे मिटून ताई ध्यानमग्न गाताहेत, ही संधी साधून मी एकटीच कशीबशी घरी परतले. माझं मन खूप अपराधी झालं!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे थोड्याच वेळानंतर, ताईंचा घरी फोन आला काळजीपोटी. त्यांच्या चाणाक्ष नजरेला मी समोर नसल्याचं लक्षात आलं होतं.

 ”तू आता ठीक आहेस ऐकून बरं वाटलं. का कुणास ठाऊक, पण मध्यंतरानंतर आज मैफिल काही मनासारखी जमली नाही, रंगली नाही. “.. ताईंचा सूर नाराजीचा होता.

मला गलबलून आलं.

माझी अपराधीपणाची भावना लक्षात येताच मला समजावत त्या म्हणाल्या,

“तू का उदास होतेस?  यात तुझा काही दोष नाही! मला आत्मिक समाधान मिळालं नाही म्हणून, मीच मग आयोजकांना पुन्हा कार्यक्रम करीन, म्हणून आश्वासन दिलंय. तू का काळजी करतेस? आता लवकर बरी हो. ” 

त्यांच्या स्वरात, प्रेम, जिव्हाळा होता. आईचं ममत्त्व होतं.

आता मात्र माझ्या डोळ्यांना धारा लागल्या.

‘का बरं एवढा जीव लावावा या असामान्य, अलौकिक कर्तृत्त्वाच्या कलावंताने, माझ्यासारख्या वयाने, मानाने छोट्या कलाकारावर? ‘ ही ऋणानुबंधाची किमया म्हणावी काय?  

ताईंनी आयोजकांना दिलेला शब्द पाळला आणि काही दिवसातच एक अभूतपूर्व मैफिल रसिकांना अनुभवता आली. सर जे. जे. च्या वास्तूतलीही ती एक चिरस्मरणीय मैफिल ठरली!

याच दरम्यान चित्र प्रदर्शनासाठी मी लंडनला प्रयाण केलं. दोन वर्षांनी मुंबईत परतल्यावर ताईंना वचन दिल्याप्रमाणे, त्यांच्या आवडीचं अत्तर घेऊन मी त्यांच्या भेटीला गेले. ताई खूप आनंदल्या. माझ्या लंडन वास्तव्याचा वृत्तांत आणि सांगितिक, अशा खूप गप्पा रंगल्या आमच्या. ताई मला खूप excited वाटल्या. काही दिवसांनी मला अचानक त्यांचा फोन आला. म्हणाल्या, “भेटायला ये, आणि हो, पद्मजाला माझ्याकडे गाणं शिकायला पाठव. ” मी चमकलेच!

संगीत क्षेत्रातले दोन महान शिरोमणी! एकीकडे गानसरस्वती किशोरीताई तर दुसरीकडे संगीत मार्तंड (तेजोनिधी संगीतसूर्य) पंडित जसराजजी… दोघांनीही आपणहून पद्मजाला स्वतःच्या शिष्येचा मान द्यावा हे पद्मजाचं परमभाग्यच!

संगीतातल्या या दोन्ही अद्भुत किमयागारांच्या सुरमयी सहवासात संमोहित झालेले कितीतरी तृप्त क्षण माझ्या परदेशातल्या वास्तव्यात मला सदैव साथ करत राहिले.

कित्येकदा एखादी बंदिश ऐकताना किशोरीताईंच्या स्वरमंदिरातल्या मंजुळ घंटेच्या आवर्तनांचा नाद, मनाच्या गाभाऱ्यात हळूवार आंदोलत राही अन् त्याच्या घुमार्‍यातून त्यांचं एक वलयांकित सतेज रूप मन उजळवून जाई.

तसं पाहिलं तर किशोरीताईंच्या सहवासाचा योग हा केवळ काही काळापुरताच, पण आमच्यातल्या स्नेहबंधाला जणू ‘अवघा रंग एक झाला! ‘… हेच रूप आलं.

मध्यंतरी बराच काळ मी परदेशात असल्याने ताईंशी माझा संपर्क तुटला. मी पुन्हा भारतात आल्यावेळी त्यांना फोन केला. वाटलं, ताईंना जगभरात माझ्यासारखे त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे हजारो भक्त, चाहते, स्नेही असणार. मला कदाचित त्या आत्तापर्यंत विसरल्याही असतील! मी तसं त्याना विचारलंही!

तशा त्या हसत हसत म्हणाल्या, “विसरेन बरी मी तुला! तू प्रेमानं भेट दिलेलं अत्तर देतंय ना मला तुझी आठवण करून नेहमी! ” 

मला ठाऊक होतं, अत्तर हे केवळ ‘निमित्त! ‘

किशोरीताई जेंव्हा एखाद्याला आपलं म्हणतात, तेव्हां त्या त्याच्यावर जिवापाड प्रेम करतात. मी खरंच त्या भाग्यवंतांपैकीच एक!

‘त्या’ अत्तराच्या कुपीतलं अत्तर उडून भलेही ती कुपी कधीचीच रिती झाली असेल… पण किशोरीताईंसोबतचं माझं ‘सखीपण’ प्रेमभरे मिरवताना, आजही त्या आठवणींचा मदमत्त गंध, माझं चित्त ‘हर्षधुंद’ करत राहतो!

लेखिका : उषा फेणाणी पाठक 

प्रस्तुती : पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments