कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
☆ “पाशवी ?” ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆
अमानवी, अमानुष किंवा पाशवी हे शब्द अनेकदा माणसांनी केलेल्या कृत्यांसाठी वापरले जातात. बऱ्याच काळापासून ते शब्द मला खटकत आले आहेत. विशेषतः ‘पाशवी’ हा शब्द तर फारच त्रास देतो. ते शब्द अप्रस्तुत वाटण्यामागे माझी काही कारणेही आहेत.
आज त्याबद्दल लिहावेसे वाटण्यासाठी तात्कालिक कारण म्हणावे, तर नुकतीच घडलेली एक घटना वाचनात आली.
पण मुळात, ते शब्द मला का खटकतात?
मनुष्यप्राण्याच्या हातून घडणाऱ्या काही कृत्यांच्या संदर्भात हे शब्द सर्रास वापरले जातात. उदाहरणार्थ, कुठेतरी कौटुंबिक वादामुळे, किंवा व्यावसायिक शत्रुत्वातून उद्भवलेल्या कडाक्याच्या भांडणानंतर एका गटाचे लोक दुसऱ्या गटातल्या निरपराध व्यक्तींनाही जीवे मारतात. अशा घटनेनंतर ‘अमानुष नरसंहार’ अशा मथळ्याखाली ती बातमी छापून येते.
बलात्काराच्या घटनांमध्येही अमानवी, पाशवी अशी विशेषणे नेहमी वाचनात येतात. पुण्याजवळ नसरापूर येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेचेही वृत्तांकन करताना, ‘पाशवी अत्याचार’, ‘माणुसकीला काळिमा’ अशी विशेषणे वाचनात आली.
एका बाबतीत कोणाचेही दुमत असणार नाही की, मी उदाहरणादाखल दिलेल्या सर्वच घटना निंदनीय आहेत, आणि कोणाच्याही हातून कुठेही त्या घडल्या तरी मनात चीड उत्पन्न होतेच. अगदी दूर कुठेतरी युरोपीय देशांमधल्या ज्यू-धर्मियांवर, ८०-८५ वर्षांपूर्वी हिटलरच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांबद्दल आपल्याला आजही घृणाच वाटते.
आपण या अत्याचारांसाठी ‘अमानवी’ हा शब्द जेंव्हा वापरतो तेंव्हा त्या शब्दात असाही अर्थ गर्भित असतो का, की मानवजातीच्या प्राण्यांच्या हातून अपेक्षित नसली तरी, इतर जातीच्या प्राण्यांकडून तशी कृत्ये घडू शकतात? माझा नेमका आक्षेप त्याच गर्भित अर्थाला आहे. ‘पाशवी’ हा शब्द वापरताना तर तो अर्थ गर्भितदेखील नसतो. आपण सरळ-सरळ असेच म्हणत असतो की ते कृत्य पशूकडून घडले तर काही नवल नाही!
पण हे तर सर्वमान्य आहे की कधीकधी एखादा प्राणी किंवा पक्षी, निव्वळ भीतीपोटी आणि स्वसंरक्षणार्थ दुसऱ्या प्राण्या-पक्ष्यावर हल्ला करतो. तसेच एखाद्या पशूला जर भूक लागली तर आणि तरच तो दुसऱ्या प्राण्याची हत्या करून आपली भूक भागवतो. पण त्यातदेखील एक विलक्षण सत्य दडलेले आहे. सर्वसाधारणपणे, कितीही भूक लागलेली असली तरी पशू भक्ष्य शोधत रानोमाळ हिंडतो, पण सहसा आपल्या जातीच्या प्राण्याला मारून खात नाही. अपवादात्मक परिस्थितीत कदाचित तसेही घडतही असेल.
त्याचप्रमाणे, लैंगिक भूक भागवण्यासाठी एखाद्या पशूने बलात्कार केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. त्यासाठीही पशूजातीतल्या नराकडून मादीची, किंवा मादीकडून नराची मनधरणी केली जाते आणि त्यानंतरच त्यांचा समागम होतो असे मी ऐकले-वाचले-पाहिले आहे.
परंतु, मनुष्य हा एकमेव प्राणी असेल जो भुकेपोटी नव्हे तर इतर भावनांच्या प्रभावाखाली चोरी, दरोडे किंवा हत्या करतो. केवळ मनुष्यप्राणीच आपली लैंगिक भूक भागवण्यासाठी बलात्कार करतो. मग त्याच्या कृत्यांना ‘पाशवी’ म्हणणे कितपत सयुक्तिक आहे?
आता, हे सगळे विचार आजच लिहावेसे मला का वाटले?
… आजच वर्तमानपत्रात फोटोसह आलेली एक बातमी वाचली. गुजरातमध्ये पालिताना तालुक्यातल्या गरजिया नावाच्या गावी, काळू परमार नावाचा एक माणूस गुरे चारण्यासाठी रानात गेला होता. अचानक एका सिंहिणीने त्याच्यावर झेप घेऊन त्याला खाली पाडले. त्यानंतर ती सिंहीण त्या माणसाच्या पायावर आपले वजन ठेवून बसून राहिली. त्याच्या नरडीचा घोट ती अगदी सहज घेऊ शकली असती. पण तिने तसे केले नाही. त्या बिचाऱ्या माणसाला फारसे काहीच करता येत नव्हते. पण तिथे जमलेल्या गावकऱ्यांनी दगड मारून त्या सिंहिणीला पळवून लावायचे प्रयत्न सुरु ठेवले. बऱ्याच प्रयत्नांती, ती सिंहीण उठून रानात पळून गेली आणि काळू परमारचा जीव वाचला.
अधिक माहिती अशी समोर आली की त्या सिंहिणीने नुकतीच एक शिकार केलेली होती. कदाचित ती भुकेजलेली नसेलच. आणि म्हणूनच तिने काळूला जीवे मारले नाही!
आता या घटनेला लोक असेही म्हणण्याची शक्यता आहे की, “त्या सिंहिणीने काळूला जिवंत सोडून अक्षरशः ‘माणुसकी’ चा प्रत्यय दिला!”
खरे पाहता, इतकेच म्हणता येईल की त्या सिंहिणीने केवळ ‘पशुधर्म’ पाळला !
© कर्नल आनंद बापट ( निवृत्त )
मो 9422870294
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





