संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “दिवाळी सण..“ ☆ संध्या बेडेकर ☆
हे दोन तीन दिवस वेगळ्याच वातावरणात गेले. सगळीकडे आली दिवाळी आली ची धामधूम होती. सुट्टी असल्यामुळे तशीही मुल मस्तीत होतीच. त्यात किल्ला बनवण. म्हणजे नुसती गडबड. बहुतेक मुलांना हळु बोलता येतच नाही. उत्साह भरपूर. आयडियाज भरपूर. आणि एनर्जी तर विचारायलाच नको. त्यांच्याकडे बघून अस वाटत..
जीवन तर हीच मुल जगतायेय. Best period of their life.
आम्ही फ्लॅटमध्ये रहात असल्यामुळे या दरम्यान.. एकेक सुगंध बिल्डिंग मध्ये दरवळत होता. अरे!! … कोणाकडे तरी गोड शंकरपाळे करतायेत. तर चकली. रवा नारळाचा भाजताना तो गोड वास म्हणजे आमच्यासारखे जेष्ठ त्या सुगंधातच तृप्त होत होते. (बरय कोणीही या सुगंध घेण्याचे पैसे मागत नाही… Jokes apart)
ज्या घरी दोघे जेष्ठ आहेत… त्या घरी काय करायच? करायच की नाही? किती लागत आपल्याला? एकतर संपत नाही. तुम्हाला चकली आवडत नाही.. मला अनारसा तर पाहिजेच. पण तो जमेल का फसेल? याची शाश्वती नसते… अशी अनेक वेळेस चर्चा होऊन शेवटी विकतच आणुया यावर चर्चा थांबली.
या दरम्यान जून्या भरपूर आठवणी जाग्या झाल्या. सर्व पदार्थ कसे डबे भरभरून करत होते. आता मुल जवळ नाहीत. त्यांनी यावेळेस फराळ पाठवू नका इथे सगळ मिळत… अस सांगितल्यावर… तर मग आमचा उत्साह तसाच मावळला.
फराळा बाबतीत मैत्रिणींमध्ये गप्पा मात्र खूप रंगल्या. यावर्षी आपले सुगरणतेचे कौशल्य बहुतेक मैत्रीणींनी बोलण्यातून दाखवले. त्यातल्या त्यात एकीने मी तर बाई सगळ घरीच करते. अस म्हणून बाजी मारलीच. बरे असो…
करंजी सारण. करंजीचा पापुद्रा खुसखुशीत करायला मैदा रव्याचे प्रमाण असो. नाहीतर तळण करताना तेलात थोडे मीठ टाकले तर पदार्थ तेलकट होत नाही. लसूण मीरची घालून चकली तर कांदा घालून केलेली चकली लोणी / दही बरोबर कशी मस्त लागते. एवढच नव्हे तर करंजीच्या सारणाच खोबर किसायची खास पद्धतही एका मैत्रीणीने सांगितली.
ही चर्चा तर खूप रंगली. आता आम्ही पदार्थ घरी करत नसलो तरी… आम्हाला सर्व येत… असे भाव अनेक जणींच्या चेहऱ्यावर होते.
एक म्हणाली… अग! फराळ करायचा प्रश्न नाही ग. अग! संपतच नाही. खर सांगू का आम्हा दोघांना चार चकल्या. चार करंज्या. चार अनारसे. थोडे शंकरपाळे खूप होतात ग. जोपर्यंत जमल तोपर्यंत सर्व केल. घरी फराळाचे पदार्थ करण म्हणजेच संस्कृती जपण अस नाही. सद्य परिस्थितीचा विचार करण ही आवश्यक असत. नाही का?
अग! आता जेष्ठ झालो असलो. तरी वेगवेगळे पदार्थ खायला आवडतातच ना. शेवटी बाहेर पदार्थ उत्तम क्वालिटीचे मिळतातच. हाच पर्याय आता बरा वाटतो.
फटाके नाही. घरी केलेला फराळ नाही. जरीच्या मोठ्या काठ पदराच्या साडीचे वजन आता झेपत नाही. धनतेरसला नवीन वस्तू काय घ्यावी कळत नाही. आता घरातली सर्व कार्य झाली… मग एवढ महागड सोन घ्यायची गरजच नाही. फटाक्याचा आवाज सहन होत नाही… वगैरे वगैरे..
असे सर्व विचार वाढत्या वयाबरोबर मनात येणारच. हे नॅचरल आहे.
आम्ही दोघे बाल्कनीत बसलो. फटाके उडवताना मुलांना बघीतल. त्यांचे नवीन पद्धतीचे ड्रेसेस. त्याचा उत्साह बघून आमच्या मुलांच्या जून्या गोष्टी आठवल्या. छान वाटल. थोडावेळ जून्या गोड आठवणीत रमलो. त्यानंतर फटाक्यांचे आवाज. गंधकाचा वास वाढल्यावर आत आलो. शेजारच्या सूपर जेष्ठ काका काकूंना भेटायला गेलो. नमस्कार केला. गप्पा मारल्या. एकत्र बसून थोडा लाडू चिवडा खाल्ला.
पुन्हा त्याच गप्पा आमच्या वेळेस / तुमच्या वेळेस गप्पा झाल्याच.
वयानुसार परिस्थितीत बदल होतो. मन मानायला तयार नसत आणि शरीर करायला धजत नाही. या कशमकश मध्ये मनात विचारांच द्वंद्व सुरू असत.
परिस्थिती स्विकारून मी योग्य तो निर्णय आत्मविश्वासाने घेतला.
आणि…
आम्ही दिवाळी छान मजेत आनंदात सेलेब्रेट केली.
खरतर शांत मनाने वर्तमान परिस्थितीचा विचार केला तर अनेक गोष्टींबद्दल मनात येणार्या अनावश्यक विचारांना महत्व देण्या ऐवजी आपण कोण आहोत? आपल वय काय? आपल्याला काय साध्य / सिद्ध करायच आहे? मी काय करू शकते? किंवा करायला पाहिजे या विचारांची स्पष्टता असणे आवश्यक आहे. तरच वर्तमान परिस्थितीचा आनंद घेता येतो.
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





